तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या नियोजित ठिकाणी आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून भूमीची खरेदी !
मुंबई, १ मार्च (वार्ता.) – सरकारकडून अधिक पटीने पैसा मिळावा, यासाठी अनिलकुमार गायकवाड या सरकारी अधिकार्याची तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या नियोजित ठिकाणी सहस्रो एकर भूमी आहे. काही आमदारांनी तेथे भूमी खरेदी केल्या आहेत. काही पत्रकारांनाही भूमी देण्यात आल्या आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या वेळी केला. शशिकांत वारिशे यांची हत्या राजकीय असल्याचा गंभीर आरोपही या वेळी आव्हाड यांनी केला.
यावर उत्तर देतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जमीन कुणी खरेदी केल्या आहेत, त्याची माहिती घेतली जाईल. यामध्ये सरकारी अधिकारी असतील, तर त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला ? याचे अन्वेषण केले जाईल. कुणी विरोधात बोलले म्हणून महाराष्ट्रात कारवाई होणार नाही’, असे सांगितले.