आमदार टी. राजासिंह यांच्या विरोधात लातूर येथे गुन्हा नोंद !
लातूर – येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे आमदार टी. राजासिंह यांच्या विरोधात २८ फेब्रुवारीच्या पहाटे गुन्हा नोंद करण्यात आला. १९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने दुचाकी फेरी काढण्यात आली होती. या फेरीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमात टी. राजासिंह यांनी आक्षेपार्ह भाषण केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी येथील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
याविषयी साहाय्यक संचालक आणि सरकारी अभियोक्ता संचालनालयाचा अभिप्राय २७ फेब्रुवारी या दिवशी प्राप्त झाला. त्यामध्ये ‘टी. राजासिंह यांनी जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा होईल’, असे वक्तव्य केल्याचे म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पंकज नीळकंठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार टी. राजासिंह यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.