रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर पुणे येथील सौ. शीतल स्वामी यांना आलेल्या अनुभूती
१. साधिकेने कुलदेवी श्री विद्याचौडेश्वरी देवीच्या चरणी ‘रामनाथी आश्रमात तुझे दर्शन व्हावे’, अशी प्रार्थना करणे
‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येण्यासाठी निघतांना आमची कुलदेवी बदामी (कर्नाटक) येथील श्री विद्याचौडेश्वरीदेवी (श्री बनशंकरीदेवी) हिला प्रार्थना केली, ‘हे माते, रामनाथी आश्रम भूतलावरील वैकुंठ आहे. तेथे देवीदेवतांचा सतत वास असतो. ‘चैतन्याने भारित झालेल्या या आश्रमात मला तुझे दर्शन व्हावे’, अशी माझी इच्छा आहे.’
२. ‘रामनाथी आश्रमात श्री विद्याचौडेश्वरीदेवीचे वास्तव्य आहे’, याची साधिकेला आलेली प्रचीती !
मी आश्रमात आल्यावर मला आश्रम दाखवत असतांना एका साधकाने सांगितले, ‘‘कर्नाटक येथील श्री विद्याचौडेश्वरीदेवी आश्रमात आली आहे. तिचे आशीर्वादरूपी हस्ताक्षर आश्रमात अनेक ठिकाणी आहे. (साधकाने आम्हाला आश्रमातील भिंतींवर कन्नड भाषेतून कोरलेले लिखाण दाखवले. श्री विद्याचौडेश्वरी देवीचे रामनाथी आश्रमात आगमन झाल्यावर तिच्या मुकुटाच्या टोकदार भागाने आश्रमाच्या भिंतींवर आपोआप हे लिखाण उमटले होते.) माझ्याकडून तिच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली आणि मला तिच्याविषयी आत्मीयता अनुभवता आली. ‘कुलदेवीची कृपा आणि गुरुदेवांचे नियोजन यांमुळे हा सुवर्णयोग माझ्या भाग्यात लिहिला गेला असावा’, असे मला वाटले.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आनंददायी भेट !
३ अ. ‘माझ्यात सहसाधकांइतका भाव नाही, तर भगवंत (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला कसा भेटेल ?’, असे वाटणे, ‘सहसाधकांच्या भावामुळे भगवंताचे दर्शन होईल’, असे वाटणे आणि तसेच घडणे : माझ्या समवेतचे सर्व सहसाधक वयाने लहान होते, तरी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) भेटीची इच्छा व्यक्त करतांना त्या सर्वांच्या डोळ्यांतील भावाश्रू अनावर झाल्याचे मी कित्येक वेळा पाहिले होते. खरेतर माझ्या मनातही ही इच्छा असायची; परंतु इतर साधकांकडे पाहिल्यावर ‘माझ्यात अजून इतका भाव नाही. माझे अंतःकरण शुद्ध नाही, तर भगवंत मला कसा भेटेल ?’, असे प्रश्न माझ्या मनात यायचे.
‘या सहसाधकांमुळे भगवंताचे दर्शन होणार आहे’, असे संकेत मला मिळत होते आणि तसेच झाले. त्यामुळे मला सहसाधकांविषयी कृतज्ञता वाटली.
३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन : माझी गुरुदेवांशी भेट झाल्यावर मी त्यांना विचारले, ‘‘गुरुदेव, आपण देत असलेले ज्ञान अफाट आहे. काही वेळा मला ते ज्ञान आकलन झालेले असते; परंतु मी ते कृतीत आणण्यास न्यून पडते. काही वेळा ते ज्ञान माझ्या आकलनाच्या पलीकडचे असते, तसेच समष्टी सेवा करतांना ते ज्ञान समोरील व्यक्तीपर्यंत पोचवण्यास मी असमर्थ ठरते.’’ तेव्हा गुरुदेव म्हणाले, ‘‘ज्ञान हे अनंत आहे. ते सीमित नसते. आकलन झालेले ज्ञान जेव्हा समष्टी सेवा करतांना समोरील व्यक्तीस दिले जाते, तेव्हा तिथे कोणतीही इच्छा नसावी. स्वेच्छेचा त्याग करून ईश्वरेच्छेपर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यास साधनेत प्रगती होते. त्यामुळे ‘मी न्यून पडतो’, असा विचार न करता ‘ती ईश्वरेच्छा होती’, असा भाव ठेवावा.’’
४. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘हे गुरुमाऊली, ‘तुझी अगाध कृपा अनुभवण्यास आणि अनुभवलेली कृपा शब्दांत मांडण्यास मी न्यून पडले’, याबद्दल मला क्षमा कर. ‘क्षणोक्षणी मला तुला अपेक्षित असेच घडता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. शीतल स्वामी, हडपसर, पुणे.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |