कुत्र्यांचे चावे कि ‘प्रशासकीय’ लचके ?
लहान मुलांच्या तस्करीच्या घटनांचा वाढता आलेख पहाता पाल्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांचे पालक अधिक सतर्क होत असले, तरी भटक्या कुत्र्यांची डोकेदुखीही ‘आ’वासून उभी आहे, हे आपणास ठाऊक आहे काय ? राजस्थानच्या सिरोही येथे नुकतीच घडलेली ही हृदयद्रावक जीवघेणी घटना त्याचे प्रातिनिधिक उदाहरण ! एका व्यक्तीला सिरोहीच्या एका रुग्णालयात क्षयरोगाच्या कक्षात भरती करण्यात आले होते. तिची पत्नी आणि एक मासाचे लहान मूल रुग्णालयातच कक्षाबाहेर निजलेले असतांना एक कुत्रा तिथे आला अन् त्याने बाळाला तोंडात धरून तेथून पळ काढला. आईला लक्षात येताच ती कुत्र्यामागे धावली; परंतु तोपर्यंत त्याने बाळाला फाडून खाल्ले होते. आपले स्वप्न स्वत:च्या डोळ्यांदेखत नष्ट होत असल्याचे पहाणार्या त्या दुर्दैवी आईच्या काळजाची स्थिती काय झाली असेल ? याची कल्पनातरी कुणाला करता येईल का ? ऑक्टोबर २०२२ मध्ये उत्तरप्रदेशच्या नोएडा येथे अशीच एक घटना घडली. यामध्ये एका कुत्र्याने ७ मासांच्या बाळावर आक्रमण करत त्याचे आतडे बाहेर काढले. अनेक घंटे शस्त्रक्रिया करूनही त्या इवल्याशा जिवाला वाचवण्यात डॉक्टरांच्या हाती अपयशच आले.
संतापजनक आघाडी !
भारतात सर्वत्रच कुत्र्यांची समस्या भयावह होत चालली आहे. त्यांचा त्रास केवळ लहान मुलांनाच नव्हे, तर सर्व वयोगटातील लोकांना भेडसावतो. एप्रिल २०२२ मध्ये श्रीनगरच्या दालगेट परिसरात भटक्या कुत्र्यांनी १७ पर्यटकांसह तब्बल ३९ लोकांचा चावा घेतला. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे लागले. ‘जागतिक आरोग्य संघटने’नुसार वर्ष २०२१ मध्ये भारतात ६ कोटी २० लाख भटकी कुत्री होती. त्यावर्षी ‘रेबिज’मुळे मृत्यूमुखी पडलेल्या भारतियांची संख्या २१ सहस्र २४० एवढी होती. ही संख्या जगातील एकूण संख्येच्या तब्बल ३६ टक्के आहे. यातून भटक्या कुत्र्यांची विल्हेवाट लावण्याच्या सरकारी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. ‘कुत्र्यांचे चावे अधिक घातक कि प्रशासकीय लचके ?’, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे, असा सात्त्विक संताप कुणी व्यक्त केल्यास त्यात चूक ते काय ?
मध्यंतरी नोएडा येथे ‘पाळीव कुत्र्यांनी कुणाचा चावा घेतला, तर १० सहस्र रुपये दंड भरण्यासमवेत पीडिताच्या औषधोपचाराचा सर्व खर्च उचलण्याचे दायित्व कुत्र्याच्या मालकाचे असेल’, असा नियमच नोएडा महानगरपालिकेने बनवला. पाळीव कुत्र्यांच्या डोकेदुखीवर आळा घालण्यासाठी राबवलेली ही मोहीम स्वागतार्ह असली, तरी भटक्या जनावरांचे काय ? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
जनतेविषयी अनास्था !
या जटील विषयाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय कायद्यामध्ये भटक्या प्राण्यांसंदर्भातील धोरण समजून घेणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेतील ‘मूलभूत कर्तव्ये ५१ ए (जी)’ यामध्ये ‘जीवित प्राण्यांविषयी करुणा दाखवणे’, हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य असल्याचे सांगण्यात आले असून ‘प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा १९६०’अन्वये प्राणीहिंसा करणार्याला दंड भरण्यासह कारावास भोगण्याचे प्रावधानही आहे. याच कायद्याच्या अंतर्गत वर्ष १९६२ मध्ये ‘भारतीय जीव जंतू कल्याण बोर्डा’ची स्थापना प्राण्यांच्या रक्षणासाठी आणि त्यांच्यावर झालेल्या हिंसेच्या विरोधात कार्य करण्यासाठी करण्यात आली. यांसह वेळोवेळी देशातील सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये यांनीही प्राण्यांच्या रक्षणार्थ निवाडे दिले आहेत.
‘प्राण्यांविषयी आस्था असणे आवश्यक आहे’, हे सूत्र कोणताही सूज्ञ नि उत्तरदायी नागरिक अस्वीकृत करणार नाही. हिंदु धर्माने ‘भूतदया ही ईश्वरसेवा आहे’ असे प्रतिपादिले आहे. दुसर्या बाजूला अतीप्राणीप्रेमामुळे जनतेच्या होत असलेल्या घाताकडे किंबहुना अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, हेसुद्धा नाकारता येणार नाही. श्वानप्रेमी, विविध प्राणीप्रेमी संघटना अंतर्मुख होऊन यासंदर्भात विचार करतांना सहसा दिसत नाहीत, हे जनतेचे दुर्दैव आहे. भारतीय कायदा हा प्राण्यांच्या रक्षणासाठी कार्यरत असला, तरी त्याआडून त्यांचा जाच सर्वसामान्य जनतेला होऊ नये, यासाठीही स्थानिक स्वराज्य संस्थांना काही नियम बनवून देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात होते काय, तर कुणा पीडित व्यक्तीने महानगरपालिकांत संपर्क साधून त्यांच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांना घेऊन जाण्याची विनंती केली, तर ‘तुमच्या येथील कुत्री नेतो; परंतु आमच्याकडे असलेली अन्य काही कुत्री तुमच्याकडे आणून सोडतो’, अशी संतापजनक उत्तरे दिली जातात. कुत्र्यांच्या चाव्यापेक्षा सरकारी अनास्थेचे हे विषच जनतेस अधिक वेदनादायी आहे. एका अहवालानुसार भारतातील ६ महानगरांमध्ये होणार्या एकूण अपघातांमागे भटक्या प्राण्यांचे कारण दुसर्या क्रमांकावर आहे. त्यातही ५८ टक्के अपघात हे भटक्या कुत्र्यांमुळे झाले आहेत. यातून या समस्येची व्याप्ती अधिक भयावह असल्याचे निदर्शनास येते.
वेदनाविना हत्या !
अमेरिका आणि ऑस्टे्रलिया यांसारख्या प्रगत देशांत भटकी कुत्री सापडल्यास त्यांना सरकारी आश्रयस्थानांत नेण्यात येते. अमेरिकेत अशी साडेतीन सहस्र आश्रयस्थाने असून त्यांवर प्रतिवर्षी तब्बल २ अब्ज डॉलर खर्च करण्यात येत आहेत.
७२ घंट्यांत कुणी आश्रयस्थानांतील कुत्र्यांना पाळण्यासाठी नेले नाही, तर त्या कुत्र्यांची वेदनाविना चक्क हत्या करण्यात येते. एका अंदाजानुसार, अमेरिका एका वर्षात साधारण ४ लाख कुत्र्यांना अशा प्रकारे मारते, तर ऑस्ट्रेलियात हा आकडा २ लाख आहे.
भारत सरकारनेही जनतेला भेडसावणार्या या समस्येवर प्राण्यांसह जनतेविषयीही संवेदनशीलता दाखवून कायमस्वरूपी तोडगा काढणे काळाची आवश्यकता आहे. प्राण्यांप्रतीची ‘दिशाहीन दया’ जर मनुष्याच्या जिवावर बेतत असेल, तर ती काय कामाची ? हे लक्षात घेतले, तरच त्या सिरोहीच्या दुर्दैवी आईच्या डोळ्यांतील पाणी पुसण्याचे पुण्य आपल्याला लाभेल !
भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवू न शकणारी शासकीय यंत्रणा जनहितकारी कारभार काय करणार ? |