वात, पित्त आणि कफ यांचे स्वभाव किवा गुण अन् त्यांचे कार्य !
आपले आरोग्य चांगले रहावे, यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करणे पुष्कळ लाभदायी ठरते. आयुर्वेदात सांगितलेले वात, पित्त आणि कफ आणि त्यांचे कार्य जाणून घेतल्यास आपण कसे आचरण करायला हवे, हे सहज समजू शकेल. प्रत्येक व्यक्तीने याचा बारकाईने अभ्यास केल्यास आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने निश्चितच प्रयत्न होतील.
१. शरीर निरोगी रहाण्यासाठी वात, पित्त आणि कफ यांच्या संतुलनाचे महत्व
‘स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणं आतुरस्य विकारप्रशमनं च ।’ – चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय ३०, श्लोक २६
अर्थ : आयुर्वेदशास्त्राचे उद्दिष्ट निरोगी व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि एखाद्या व्यक्तीमध्ये रोग उत्पन्न होऊ लागला असेल, तर त्यावर उपाय करणे हे आहे.
मनुष्याला निरोगी रहाण्यासाठी आधी त्याला त्याच्या शरिराची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. महर्षि वाग्भट म्हणतात,
‘दोषधातुमला मूलं सदा देहस्य तं चलः ।’ – अष्टाङ्गहृदय, सूत्रस्थान, अध्याय ११, श्लोक १
अर्थ : दोष, धातू आणि मल हे आपल्या शरिरातील मूलभूत घटक आहेत. यांच्यामुळेच आपले शरीर चालते.
शरिरातील वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष सर्वांच्याच परिचयाचे आहेत. कुणाचे पोट फुगले किंवा सांधे दुखले की, ‘मला वाताचा त्रास आहे’; छातीत जळजळले, तर ‘मला पित्ताचा त्रास आहे’; सर्दी खोकला झाला, तर ‘मला कफाचा त्रास आहे’, असे अनेक जण म्हणत असतात. वाढलेल्या दोषांची केवळ एवढीच लक्षणे नाहीत, तर अजूनही बरीच लक्षणे आहेत. त्यामुळे शरिरात वाढलेले दोष कसे ओळखायचे, हे शिकणे आवश्यक आहे.
हे तिन्ही दोष अगदी गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत आपल्या शरिरात अस्तित्वात असतात. हे विकृत होतात, तेव्हा त्यांचे प्रमाण बिघडते आणि ते इतर घटकांना दूषित करतात. इतरांना दूषित करण्याचा यांचा स्वभाव असल्याने त्यांना ‘दोष’ असे म्हटले जाते. या दोषांची शरिरातील मुख्य स्थाने सांगताना महर्षि वाग्भट म्हणतात,
‘ते व्यापिनोऽपि हृन्नाभ्योरधोमध्योर्ध्वसंश्रय: ।’ – अष्टाङ्गहृदय, सूत्रस्थान, अध्याय १, श्लोक ७
अर्थ : वाताचे मुख्य स्थान हे नाभीच्या खाली, पित्ताचे स्थान हृदय आणि नाभी यांच्या मध्ये, तर कफाचे स्थान हे हृदयाच्या वरच्या भागात असते.
या तीन मुख्य ठिकाणी हे दोष रहात असले, तरी त्यांचे कार्य हे संपूर्ण शरिरात चालू असते. हे दोष प्रमाणात असतात, तेव्हा ते आयुष्याचे रक्षण करतात आणि जेव्हा ते विकृत होतात, म्हणजे त्यांचे प्रमाण विषम झाले, तर ते शरिरात रोग उत्पन्न करून शरिराची हानी करतात.
२. वात, पित्त आणि कफ यांचे कार्य
२ अ. प्राकृत वात कार्य (योग्य प्रमाणात असलेल्या वाताचे कार्य)
१. उत्साह निर्माण करणे
२. श्वास-उच्छ्वास क्रिया घडवून आणणे
३. शरिराच्या हालचाली करवणे
४. मलमूत्रादींना शरिरातून बाहेर टाकणे
५. शरिरातील पदार्थांचे वहन करणे
२ आ. प्राकृत पित्त कार्य (योग्य प्रमाणात असलेल्या पित्ताचे कार्य)
१. पचन करणे (केवळ अन्नाचे पचन नसून शरिरातील प्रत्येक पेशींपर्यंतचे पचन)
२. शरिरात उष्णता निर्माण करणे
३. दर्शन शक्ती, म्हणजे डोळ्यांची बघण्याची क्षमता वाढवणे, तहान, भूक आणि चव यांची जाणीव करून देणे, त्वचेला कांती देणे अन् बुद्धीमत्ता यांसाठी पित्त कारणीभूत असते.
२ इ. प्राकृत कफ कार्य (योग्य प्रमाणात असलेल्या कफाचे कार्य)
१. शरिराला दृढता देणे
२. स्निग्धता देणे
३. सांध्यांना घट्ट जोडून ठेवणे
३. वात, पित्त आणि कफ यांचा स्वभाव किंवा गुण यांची ओळख
या दोषांचे प्रमाण कसे पालटते, हे समजून घ्यायचे असेल, तर आधी आपल्याला त्यांचे गुण जाणून घेतले पाहिजेत; कारण सारख्या गुणांच्या पदार्थांनी हे दोष वाढत जातात आणि विरुद्ध गुणांच्या पदार्थांनी ते न्यून होतात. समजा दोन व्यक्तींचे भांडण चालू आहे आणि दोघेही रागीट असतील, तर त्यांचे भांडण न्यून होण्याऐवजी वाढत जाईल. याउलट त्यातील एक व्यक्ती शांत असेल, तर भांडण लवकर मिटेल. असेच या दोषांच्या संदर्भात आहे.
वात : रुक्ष (कोरडा), लघु, शीत, खर (खरखरीत), सूक्ष्म, चल (गतीमान)
पित्त : स्निग्ध, तीक्ष्ण, उष्ण, लघु, विस्त्र (दुर्गंधी), सर, द्रव
कफ : स्निग्ध, शीत, गुरु, मंद, चिकट, चकाकी असणारा, स्थिर
३ अ. वात वाढण्याची कारणे
१. थंड पदार्थ खाणे आणि थंड पाणी पिणे (वाताचा थंड हा गुण असल्याने तो वाढण्यास कारणीभूत)
२. शिळे अन्न खाणे
३. पुष्कळ तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणे
४. अतीव्यायाम, पुष्कळ चालणे आणि रात्री जागरण करणे
५. सतत वातानुकूलित (ए.सी.) वातावरणामध्ये रहाणे
६. वेगांचे धारण करणे : मलमूत्र यांचा वेग थांबवणे. मलाचा वेग आला असतांना न जाणे. वात हा चल गुणाचा, म्हणजे गतिमान आहे. त्यामुळे त्याची गती अडवली, तरीही त्याचे प्रमाण बिघडून त्याचा शरिरावर परिणाम होतो.
३ आ. पित्त वाढण्याची कारणे
१. पुष्कळ तेलकट पदार्थ खाणे
२. आंबट, खारट आणि तिखट पदार्थ अधिक प्रमाणात खाणे
३. उन्हात पुष्कळ वेळ काम करणे
४. अतीश्रम करणे
५. पुष्कळ रागीट स्वभाव
६. कॉफी, काळा चहा आणि दारू पिणे, तसेच धूम्रपान किंवा इतर मादक पदार्थ यांचे सेवन करणेे
७. भावनिक ताण असणे
३ इ. कफ वाढण्याची कारणे
१. आहारात पुष्कळ गोड आणि आंबट पदार्थ असणे
२. अजिबात व्यायाम न करणे
३. पुष्कळ झोपणे
४. आळस
४. वात, पित्त आणि कफ वाढल्यावर शरिरात दिसणारी लक्षणे
४ अ. वात वाढल्यावर दिसणारी लक्षणे
१. शरीर कृश होणे, काळवंडणे
२. उष्ण पदार्थ खाण्याची इच्छा उत्पन्न होणे
३. कंप सुटणे
४. पोटफुगी आणि मलबद्धता
५. निद्रानाश
वरील लक्षण आपल्याला संकेत देत असतात की, आता वात वाढत आहे, वेळीच काळजी घ्या. या संकेताकडे दुर्लक्ष करून आपला वात वाढवणारा आहार आणि विहार चालूच राहिला, तर ‘शरिरातील वात प्रकोप पावतो. परिणामी वेदना निर्माण होणे, अंग जखडणे, अवयव सुन्न होणे, टोचल्यासारख्या वेदना होणे, कंप, अस्थी पोकळ होणे, अंग वाकणे, शरीर ताठ होणे, शुष्क होणे’, अशी तीव्र लक्षणे निर्माण होतात.
४ आ. पित्त वाढायला लागल्यावर दिसणारी लक्षणे
१. मल, मूत्र, डोळे आणि त्वचा यांना पिवळसर रंग येणे
२. भूक, तहान इत्यादींमध्ये वाढ होणे
३. निद्राभंग (झोप अल्प प्रमाणात लागणे)
जर पित्ताचा प्रकोप झाला, तर ‘संपूर्ण शरिरात दाह निर्माण होणे, शरिरावर लाली येणे, पुष्कळ उष्णता वाढणे, पुष्कळ प्रमाणात घाम येणे आणि त्वचेची आर्द्रता वाढणे, मूर्च्छा येणे (गरगरल्यासारखे होणे) अन् तोंड आंबट-कडू होणे’, अशी तीव्र लक्षणे दिसतात.
४ इ. कफ वाढल्याची लक्षणे
१. अग्नीमांद्य (अन्न पचण्याची क्षमता अल्प होणे)
२. अधिक प्रमाणात लाळ निर्माण होणे
३. आळस निर्माण होणे आणि शरीर जड होणे
४. शरीर पांढरट होणे आणि त्यात थंडपणा जाणवणे
५. श्वास घेण्यास त्रास होणे आणि खोकला येणे
६. अधिक प्रमाणात झोप येणे
जर कफाचा प्रकोप झाल्यास ‘शरिरात काठिण्य निर्माण होणे (stifness), त्वचेवर खाज निर्माण होणे, सूज निर्माण होणे, अपचन होणे’, अशी तीव्र लक्षणे दिसून येतात.
आपल्याला कोणता दोष कोणत्या कारणाने वाढतो आणि त्याची लक्षणे कोणती ? या गोेष्टी या लेखातून समजल्या. आता त्यावर चिकित्सा कोणती करायची ? तसेच आहार-विहारामध्ये कोणता पालट करायला हवा ? याविषयीची माहिती पुढच्या लेखात देणार आहोत.
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे. (१८.११.२०२२)
(साभार : ‘पंचम वेद – आयुर्वेद’, यू ट्यूब वाहिनी)