कृष्णाने देह सोडल्यानंतरही अर्जुनाचा सूक्ष्म अहंकार संपवणे
१. जिंकण्यात अहंकार आणि भगवंताकडून हरण्यात आनंद असणे
‘सांगू का देवा ? जिंकण्यात असतो ना अहंकार ? आणि हरण्यातही असतो आनंद ! खरे ना ? कारण भगवंताचे भक्तावर आणि गुरूंचे शिष्यावर सूक्ष्म लक्ष असते. भगवंताविना कोण हरवणार ? तो कुणाच्याही रूपात येईल ना ! हरण्यात जेव्हा आनंद मिळतो, तेव्हा ओळखायचे की, माझ्यावर भगवंताचे किती लक्ष आहे ! आम्ही तर त्याला लगेच हात जोडून म्हणतो, ‘अरे चोरा, आमच्यावर असे सतत लक्ष ठेवलेस, यासाठी मनापासून आभार !’
२. भिल्लांनी शस्त्रे लुटून नेल्यावर अर्जुनाला ‘शस्त्रांना शक्ती पुरवणारा कृष्ण होता’, याची जाणीव होणे
कृष्णाने उद्धवाला सांगितले, ‘मी लवकर देह सोडणार आणि लगेच द्वारका पाण्यात बुडणार. अर्जुनाला सांग, ‘जे तुझ्या समवेत येतील, त्यांना मथुरेला घेऊन जा.’ अर्जुन बर्याच जणांना घेऊन निघाला. रात्र झाली; म्हणून त्यांनी नदीच्या जवळ मुक्काम केला. तेथे रात्री भिल्ल लोक आले आणि त्यांनी अर्जुनाच्या सोबत असलेल्या लोकांजवळच्या वस्तू लुटल्या. तेव्हा अर्जुनाचे एकही शस्त्र काम करेना. अखेर अर्जुन थकला. तो त्यांचे रक्षण करू शकला नाही. त्याला कळून चुकले, ‘मला आणि माझ्या शस्त्रांना शक्ती पुरवणारा कृष्ण होता. तो गेला. आता माझा कुणाला काही उपयोग नाही.’ शेवटी कृष्णाने गेल्यानंतरही (देह सोडल्यानंतरही) अर्जुनाचा सूक्ष्म अहंकार संपवला.
३. धर्मराजाला सर्व प्रसंग कळल्यावर पांडव अन् द्रौपदी यांच्यासह त्याने हिमालयाकडे प्रयाण करणे
नंतर अर्जुन भावाकडे आला आणि त्याने धर्मराजाला हा प्रसंग सांगितला. लगेच धर्मराजाने परिक्षिताकडे राज्यकारभार सोपवला आणि पाच पांडव अन् द्रौपदी यांनी हिमालयाकडे प्रयाण केले.
४. सारथ्याविना देहरूपी रथ कोण चालवणार ?
आम्ही सांगितले होते ना, ‘लगाम त्याच्या (देवाच्या) हाती आहे. आमच्या जीवनाचा ‘रथ’ त्याच्या हाती आहे. तो आमचा (भक्तांचा) उत्तम सारथी आहे. तो जेव्हा रथातून उतरतो, तेव्हा शरीररूपी रथ भस्म होतो. सारथी (चालक) नसेल, तर रथ चालेल का ?’’
– कृष्णपुष्प (पुष्पांजली) (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७५ वर्षे), बेळगाव (५.१०.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |