सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची सर्वज्ञता !
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. आईकडून कन्नड भाषेत देवतेचे नाव लिहितांना चुकीचे लिहिले जाणे आणि ही चूक पुढे ज्या साधकांनी नाव पडताळले त्यांच्याही लक्षात न येणे
‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा त्यांनी मला ‘‘बरे आहात ना ?’’ (चेन्नागिद्दीरा) असे कन्नड भाषेत विचारले. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘मला एवढेच कन्नड येते.’’ त्या वेळी मला पुढील प्रसंग आठवला. ‘जून २००० मध्ये मी आणि माझी आई सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. साधारण वर्ष २००१ मध्ये आईने सेवेला आरंभ केला. त्या वेळी सनातन संस्थेच्या वतीने कन्नड भाषेत देवतांच्या सात्त्विक नामपट्ट्या बनवण्याचे नियोजन होते. तेव्हा श्रीमती अश्विनी प्रभु यांनी आईला एक सेवा दिली. त्यात कर्नाटकमधील काही कुलदेवी आणि कुलदेव यांची नावे कन्नड लिपीत लिहून देण्यास सांगितले. आईने तिला ठाऊक असलेल्या देवतांचे नामजप लिहून दिले. ते लिहितांना तिच्याकडून एक चूक झाली. देवनागरी लिपीत जेव्हा ‘देव्यै’, असे लिहितो, तेव्हा जोडाक्षरे एका ओळीत असतात आणि ‘ऐ’ ची मात्रा देतो; पण कन्नड लिपीत जोडाक्षर ओळीच्या खाली लिहिले जाते आणि ‘ऐ’ ची मात्राही खाली येते, उदा. – असे योग्य आहे; पण आईने लिहितांना ‘ऐ’ आधी लिहून नंतर ‘य’ लिहिले. ही चूक तिच्या लक्षात आली नाही आणि पुढे ज्या साधकांनी नामजप पडताळले त्यांच्याही लक्षात आली नाही.
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला कन्नड लिखाणातील चूक लक्षात आणून देणे : नंतर श्रीमती अश्विनी प्रभु यांनी ते नामजपाचे लिखाण परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दाखवले. (स्थुलातून पाहिले, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कन्नड भाषा येत नाही.) परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीमती अश्विनी प्रभु यांना विचारले, ‘‘यातील ‘देव्यै’ मधले ‘ऐ’ अक्षर (त्यांना त्यातील कोणते अक्षर आहे, हेही ठाऊक नव्हते) हे आधी यायला पाहिजे कि नंतर ? कन्नड वर्णमालेचा अभ्यास नसतांना झालेली चूक ओळखून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हा प्रश्न विचारणे, ही त्यांची सर्वज्ञताच आहे, तरीही ते सांगतात, ‘मला कन्नड येत नाही.’
२. परात्पर गुरु डॉक्टरांनी अक्षरांच्या चुकीच्या संयोजनाने बिघडलेली स्पंदने ओळखणे
परात्पर गुरु डॉक्टरांनी नेहमी स्पंदने आणि सूक्ष्म यांचा अभ्यास करण्यावर भर दिलेला आहे; कारण सूक्ष्म ज्ञानेंद्रिये जागृत झाल्यावर आपल्याला चांगले-वाईट आपोआप कळते. वरील प्रसंगात अक्षरांच्या चुकीच्या संयोजनाने बिघडलेली स्पंदने परात्पर गुरु डॉक्टरांनी ओळखली आणि ती चूक साधिकेच्या लक्षात आणून दिली.
‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले), आपण सर्वज्ञ आहात, याची प्रचीती २० वर्षांपूर्वीच आम्हाला आली आहे. नंतर अनेक वर्षांनी ‘साक्षात् श्रीविष्णुच आहात’, हे महर्षि आणि देवता यांच्या माध्यमातून आम्हा सर्वांना समजले. आम्ही आपल्या चरणी कृतज्ञ आहोत.’
– श्री. अभिषेक अण्णप्पा पै, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१०.२०२१)
|