देशातील सर्वाधिक कुष्ठरोगी महाराष्ट्रात !
|
मुंबई, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – कुष्ठरोगींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणे आणि त्यांना नोकर्या उपलब्ध करून देणे, यांविषयी सर्वंकष धोरण निश्चित करण्यासाठी संबंधित तज्ञ अन् अधिकारी यांची समिती नेमण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कुष्ठरोगींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र, पुनर्वसन आणि नोकर्या देण्याविषयीची लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली. त्यावर उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. ‘देशातील सर्वाधिक कुष्ठरोगी महाराष्ट्रात असून त्यांची संख्या १७ सहस्र १४ इतकी आहे’, असे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले.
ते म्हणाले, ‘‘कुष्ठरोगींचा शोध घेण्यासाठी राज्यात ६० सहस्र गटांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये ८ कोटी ६६ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. वर्ष २०२७ पर्यंत देश ‘कुष्ठरोगमुक्त धोरण’ केंद्रशासनाने निश्चित केले आहे. त्याप्रमाणे राज्यातही काम करण्यात येईल.’’
याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘कुष्ठरोगी आपलेच समाजबांधव आहेत. याची व्याप्ती पुष्कळ मोठी आहे. याविषयी सर्वंकष धोरण निश्चित करावे लागेल. महाराष्ट्रात जेथे-जेथे कुष्ठरोग्यांच्या वसाहती आहेत, तेथे मूलभूत सुविधा देणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. कुष्ठरोग्यांच्या विषयांसाठी नेमण्यात येणार्या समितीमध्ये याविषयी काम करणारे प्रकाश आमटे, विकास आमटे यांसह तज्ञांचा समावेश करू.’’