सर्वोच्च न्यायालयात पहिल्या दिवसाचा युक्तीवाद संपला !
मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी ५ न्यायमूर्तींच्या घटनापिठासमोर २८ फेब्रुवारी या दिवशी पहिल्या दिवसाचा युक्तीवाद संपला. ठाकरे गटाचे अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी आजच्या दिवसभरातील युक्तीवादात निवडणूक चिन्ह, राजकीय पक्ष, विधीमंडळ पक्ष, आमदार अपात्रता आणि संविधानातील अनुच्छेद १० नुसार होणारी कारवाई याविषयी युक्तीवाद केला.
सर्वोच्च न्यायालयात २८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत सलग ३ दिवस सत्तासंघर्षाविषयी युक्तीवाद होणार आहे. आजच्या पहिल्याच दिवशी कपिल सिब्बल यांनी ‘पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांसमोर अपात्रतेच्या कारवाईतून वाचण्यासाठी विलिनीकरण हाच एकमेव मार्ग आहे’, असे सांगितले.
युक्तीवादाच्या वेळी ‘आमदारांच्या अपात्रतेविषयी विधानसभा अध्यक्ष कारवाई करू शकतो’, असे निरीक्षण सरन्यायाधिशांनी नमूद केले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने ‘ही कारवाई करू शकतो’, असे सांगितले. ‘राणा खटल्यात अशी कारवाई सर्वोच्च न्यायालयाने केली आहे’, असे सांगून सिब्बल यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. ‘विधानसभा अध्यक्षांकडे आमदार अपात्रताविषयी कारवाईसाठी कालबद्धता ठरवून दिली पाहिजे’, असे सूत्रही युक्तीवादाच्या वेळी समोर आले.