प्रेमळ आणि शारीरिक त्रासावर मात करून तळमळीने सेवा करणारे श्री. सुरेंद्र चाळके !
‘श्री. सुरेंद्र चाळके (सुरेंद्रदादा) सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या निमित्ताने बेळगाव येथे आले असतांना माझी त्यांच्याशी प्रथम भेट झाली. त्यांच्या समवेत धर्मरथावर १ मास सेवा केल्यावर मला आनंद मिळाला. नंतर मी पूर्णवेळ धर्मरथसेवक म्हणून सेवा करू लागलो. दादांच्या समवेत धर्मरथावरील सेवा करतांना मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. प्रेमभाव
अ. दादांच्या समवेत सेवा करत असतांना ते मला ‘बारकाव्यांसह सेवा कशी करायची ?’, हे प्रेमाने शिकवत असत.
आ. ते मला आणि प्रशांतदादाला (धर्मरथावरील साधक श्री. प्रशांत कावरे यांना) एक पिता, बंधू अन् मित्र यांचे प्रेम देतात.
२. वेळेचे गांभीर्य
२ अ. अल्पाहार आणि भोजन यांसाठी जाण्या-येण्याचा वेळ वाचवण्यासाठी धर्मरथावर छोटे स्टूल अन् प्लास्टिकचे पटल यांचे नियोजन करणे : काही जिल्ह्यांमध्ये धर्मरथावर सेवा करणार्या साधकांना अल्पाहार आणि जेवण करण्यासाठी अन्यत्र जागा उपलब्ध होत नसे. तेव्हा सुरेंद्रदादांनी एक छोटे स्टूल आणि प्लास्टिकचे पटल यांचे नियोजन केले. त्यामुळे धर्मरथावरील साधकांना अल्पाहार किंवा जेवण यांसाठी जागा उपलब्ध व्हायची आणि सर्वांचा अल्पाहार अन् जेवण यांसाठी जाण्या-येण्याचा वेळ वाचायचा. तो वेळ मी आणि अन्य साधक सेवेसाठी वापरायचो.
२ आ. वेळेचा योग्य वापर करण्यास शिकवणे : काही ठिकाणी दुपारी २ ते ४ या वेळेत प्रदर्शन पहायला येणार्या जिज्ञासूंची संख्या अल्प असते. तेव्हा सुरेंद्रदादा आम्हाला सांगतात, ‘‘आपण ‘ग्रंथांची मागणी काढणे, धर्मरथाची स्वच्छता करणे, ग्रंथ आणि वस्तू यांची स्वच्छता करणे’, या सेवांचे नियोजन करू शकतो. त्यासाठी आपण जिल्ह्यातील साधकांना विचारून त्यांचे साहाय्य घेऊया.’’
३. सतर्कता
अ. धर्मरथातील प्रदर्शनस्थळी विद्युत् पुरवठा लागतो. सुरेंद्रदादा जिल्ह्यातील साधकांना तसे अगोदर कळवून ठेवतात.
आ. दादा विश्रांतीला गेल्यावरही पुष्कळ सतर्कतेने रथाच्या बाजूच्या आरशातून ‘धर्मरथात काय चालू आहे ?’, हे पहातात. प्रदर्शन पहायला जिज्ञासूंची गर्दी झाल्यावर ते पटकन प्रदर्शनस्थळी येतात.
४. ‘धर्मरथ हा आश्रमच आहे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाक्य सांगून साधकाला धर्मरथावरील सेवेसाठी प्रोत्साहन देणे
मी एप्रिल २०१४ पासून कर्नाटकमध्ये धर्मरथावरील प्रदर्शनाच्या सेवेला आरंभ केला. तेव्हा सुरेंद्रदादांनी मला सांगितले, ‘‘धर्मरथ हा आश्रमच आहे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाक्य आहे.’’ तेव्हा दादांनी मला ‘आपण आश्रमातच रहात आहोत’, याची जाणीव करून दिली. त्यामुळे मला धर्मरथावर सेवा करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
५. इतरांचा विचार करणे
५ अ. प्रवासाच्या कालावधीनुसार साधकांचा अल्पाहार आणि भोजन यांचे नियोजन करणे : कधी कधी आमचा प्रवास साडेचार ते ५ घंट्यांचा असायचा. अशा वेळी सुरेंद्रदादा धर्मरथावरील साधकांचे अल्पाहार आणि जेवण यांचे नियोजन करतात. ‘धर्मरथात सांडणार नाहीत, असेच पदार्थ करूया’, असे ते साधकांना कळवतात.
५ आ. साधकांना थकवा आल्यास त्यांना नामजपादी उपाय करायला सांगणे : धर्मरथावर सेवा करतांना कधी कधी मला किंवा अन्य साधकांना थकवा यायचा आणि आम्ही झोपायचो. अशा वेळी सुरेंद्रदादा आम्हाला नामजपादी उपाय करायला सांगतात. ‘परात्पर गुरु डॉक्टर पूर्वी धर्मरथात येऊन गेले आहेत’, हा प्रसंग सांगून किंवा भावजागृतीचा प्रयोग आणि अनुभूती सांगून ते आमचा उत्साह वाढवतात. एकदा मला आध्यात्मिक त्रास होत होता. तेव्हा सुरेंद्रदादांनी सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांना नामजपादी उपाय विचारले आणि मला सांगितले.
५ इ. धर्मरथावरील साधकांना आधी भोजन करायला सांगून नंतर स्वतः जेवणे : कधी कधी धर्मरथावरील साधकांसाठी अन्य साधकांकडून अल्पाहार सकाळी १० ते ११ च्या दरम्यान आणि जेवण दुपारी २.३० ते ३ च्या दरम्यान येत असे. तेव्हा सुरेंद्रदादांना मधुमेहामुळे पुष्कळ भूक लागली असतांनाही ते स्वतः सेवेच्या ठिकाणी येऊन थांबायचे आणि साधकांचे नियोजन करून त्यांना अल्पाहार किंवा भोजन यांसाठी पाठवायचे. नंतर ते स्वतः जेवायचे.
६. सेवेची तीव्र तळमळ
६ अ. शारीरिक त्रास असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धा आणि भक्ती यांमुळे तळमळीने सेवा करणे : सुरेंद्रदादांना मधुमेह, हृदयविकार इत्यादी शारीरिक त्रास आहेत. त्यांचे हृदयाचे शस्त्रकर्मही झाले आहे. एवढे त्रास असूनही ते ‘प्रत्येक परिस्थितीवर मात करून धर्मरथ चालवणे, ग्रंथ प्रदर्शनाचे ठिकाण पहाणे आणि प्रदर्शन लावणे’, अशा सेवा तळमळीने करतात. दादांना मधुमेहाचा पुष्कळ त्रास होतो. गेली ६ वर्षे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी बहुतांश वेळा २०० ते ३०० मिलिग्रॅम/डेसीलिटरच्या दरम्यान असायची. (‘सर्वसाधारणपणे रक्तातील साखरेची पातळी १४० मिलिग्रॅम/ डेसीलिटर असणे आवश्यक आहे.’ – संकलक) प्रत्येक वेळी त्यांच्या रक्तातील साखरेची पडताळणी करतांना आधुनिक वैद्य त्यांना म्हणतात, ‘‘तुम्ही कशी काय सेवा करता ?’’ परात्पर गुरु डॉक्टर यांच्यावरील दृढ श्रद्धा आणि भक्ती यांमुळे दादा कठोर प्रारब्धावर मात करून सेवा करत आहेत.
६ आ. उत्तरदायी साधकांना विचारून दायित्व घेऊन सेवा करणे आणि स्वतःच्या कृतीतून इतरांना सेवा शिकवणे : कर्नाटकात धर्मरथावर ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा साठा घेऊन सेवा करणारे साधक उपलब्ध होत नव्हते. तेव्हा सुरेंद्रदादांनी उत्तरदायी साधकांना विचारून स्वतःहून साठा मागवला आणि ‘आपण दायित्व घेऊन सेवा करूया’, असे आम्हाला (धर्मरथावरील साधकांना) सांगितले. धर्मरथावर साठा घेतल्यावर प्रदर्शन लावून राहिलेला साठ्याची नोंद ठेवून ते आम्हाला तो साठा खोक्यात किंवा कप्प्यात ठेवायला सांगतात. त्यासाठी ते आम्हाला साहाय्य करतात. ते आम्हाला प्रत्येक सेवा स्वतःच्या कृतीतून शिकवतात आणि ‘आम्हाला सेवेत काही अडचणी आहेत का ?’, हेे विचारून आवश्यक तिथे साधकांना घडवण्यासाठी मार्गदर्शनही करतात.
६ इ. प्रदर्शनस्थळी आलेल्या सर्वांशी आपुलकीने आणि प्रेमाने वागून त्यांना सनातन संस्थेशी जोडण्यासाठी प्रयत्न करणे : धर्मरथावरील प्रदर्शनस्थळी संत, आमदार आणि खासदार, तसेच हितचिंतक, वाचक, धमर्र्प्रेमी अन् जिज्ञासू आदी पुष्कळ लोक येतात. सुरेंद्रदादा त्यांना नम्रपणे, प्रेमभावाने आणि आपुलकीने सनातन संस्थेचा परिचय करून देतात. ‘त्यांना आपण आपल्या संस्थेशी कशा पद्धतीने जोडून ठेवू शकतो ?’, हे ते आम्हालाही सांगतात. ‘समाजामध्ये आणि जिज्ञासूंशी प्रेमाने, आपुलकीने आणि नम्रपणे कसे बोलायचे ? सनातन संस्थेचे ग्रंथ, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके आणि सनातनची सात्त्विक उत्पादने यांविषयी माहिती कशी सांगायची ?’, हे सुरेंद्रदादा स्वतः कृती करून आम्हाला सांगतात.
७. अनुभूती
प्रथमच धर्मरथ चालवतांना दादांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेच तो चालवत आहेत’, अशी अनुभूती येणे : सुरेंद्रदादांकडे धर्मरथाच्या समन्वयाची सेवा होती. काही कारणास्तव धर्मरथावरचे चालक घरी गेले होते. ते परत आले नव्हते. धर्मरथ विजापूरमध्ये थांबला होता. दादांनी उत्तरदायी साधकांना विचारून धर्मरथ चालवण्यास आरंभ केला. वर्ष २०१५ मध्ये दादांनी विजापूर ते हुब्बळी हा प्रवास पहिल्यांदा केला. प्रवास करतांना त्यांना ‘परात्पर गुरु डॉक्टरच धर्मरथ चालवत आहेत’, अशी अनुभूती आली.
‘हे श्रीकृष्णा, ‘सुरेंद्रदादा यांच्यातील हे सर्व गुण मला आत्मसात करता येऊन ते गुण धर्मप्रसाराची समष्टी सेवा करतांना वृद्धींगत होऊ देत’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना !
‘परात्पर गुरु डॉक्टर, श्रीकृष्णा, ‘तुमच्या कृपाशीर्वादाने मला दादांच्या समवेत ६ वर्षे अविरतपणे शिकण्याची संधी मिळाली’, याबद्दल तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. गजानन लोंढे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.७.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |