साधिकेने सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर तिचा त्रास दूर होणे
‘ऑक्टोबर २०२२ मध्ये मला तीव्र शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ लागले. त्या वेळी मला ‘मनात सतत भूतकाळातील, नकारात्मक आणि अनावश्यक विचार चालू रहाणे, दिवस-रात्र झोप न लागणे अन् स्वप्नात साप दिसणे’, असे त्रास होत होते. तेव्हा सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला नामजपादी उपाय करायला सांगितले.
१. सद़्गुरु गाडगीळकाकांनी मला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री गुरुदेव दत्त । श्री गणेशाय नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ असा नामजप प्रतिदिन २ घंटे करायला सांगितला. मी हा नामजप करू लागल्यानंतर २ मासांनी मला होत असलेले शारीरिक आणि मानसिक त्रास दूर झाले. नंतर मी नामजप करायचे बंद केल्यानंतर मला पुन्हा शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ लागले. मी पुन्हा नामजप चालू केल्यावर मला होत असलेले त्रास दूर झाले. आता मी हा नामजप नियमित करत आहे.
२. मला मधुमेहाचा त्रास पुष्कळ होत होता. मी औषध घेऊनही माझा त्रास न्यून होत नव्हता. त्या वेळी सद़्गुरु गाडगीळकाकांनी मला प्रतिदिन २ घंटे ‘श्री दुर्गादेव्यै नमः । श्री हनुमते नमः ।’ हा नामजप करायला सांगितला. आता माझा मधुमेहाचा त्रास न्यून झाला आहे. आधुनिक वैद्यांनी मला सांगितले होते, ‘‘तुम्हाला ‘इन्सुलिन’ घ्यावे लागेल’’; परंतु त्याची आवश्यकता भासली नाही. माझा त्रास पुष्कळ उणावला आहे. (‘इन्सुलिन’ हे संप्रेरक (हार्मोन) आहे. त्याने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवली जाते.)
३. मला रात्री झोपेत स्वप्नात साप दिसायचे. मी याविषयी सद़्गुरु गाडगीळकाकांना सांगितल्यावर त्यांनी मला प्रतिदिन आज्ञाचक्राच्या २ इंच वर तळहाताने न्यास करून ‘श्री गणेशाय नमः ।’ हा नामजप १ घंटा करायला सांगितला. मी हा नामजप चालू केल्यानंतर १५ दिवसांनी मला स्वप्नात साप दिसायचे बंद झाले.
मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद़्गुरु गाडगीळकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती कविता शेट्ये (वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |