मुफ्तीबाईंची गरळओक !
दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील ए.टी.एम्. यंत्रावर काम करणार्या संजय शर्मा या काश्मिरी पंडिताची आतंकवाद्यांनी हत्या केली. ‘घरापासून १०० मीटरवर शर्मा यांची हत्या होत असतांना त्यांच्या कुटुंबियांना किती मानसिक धक्का बसला असेल ?’, याची कल्पना करू शकतो. अच्छन गावातील शर्मा हे एकमेव काश्मिरी पंडिताचे कुटुंब होते. बाजारात जातांना शर्मा यांची हत्या झाल्यावर तेथील मुसलमान समाजही काहीसा घाबरला, त्यांनी याचा निषेध केला, त्या कुटुंबाच्या साहाय्याला धावला, त्यांनी त्याला खांदा दिला. हे केवळ नाटक आहे ? कि ‘येणार्या काळात परिस्थिती उलटू शकते’, हे लक्षात घेऊन मुसलमान शेजार्यांनी हा ‘भाईचारा’ दाखवला आहे ? हे येणारा काळ ठरवेलच; पण पूर्वीपेक्षा स्थिती पालटल्याचे हे एक लक्षण आहे. मागील वर्षी १९ नागरिकांच्या हत्या झाल्या, त्यांपैकी ८ जण बाहेरून आलेले कामगार होते. ‘काश्मीर पूर्वीसारखेच धगधगत आहे का ?’, असा प्रश्न पडावा, अशा घटना कलम ३७० हटवल्यानंतरच्या वर्षभरात घडल्या आहेत; मात्र आता असा भेद जाणवतो की, समाजमाध्यमे आली आहेत. काश्मीरसंदर्भात प्रसारमाध्यमे पूर्वीपेक्षा सतर्क झाली आहेत. हिंदू जागरूक झाले आहेत. सैन्याने तत्परतेने त्या त्या वेळी कृती करून हिंदूंना मारणार्या आतंकवाद्यांचा सूडही घेतला आहे. संजय शर्मा यांच्या हत्येत सहभागी झालेल्या आतंकवाद्यालाही अवंतीपोरा येथे ठार मारून सैन्याने अत्यंत तत्परतेने दुसर्याच दिवशी याचा सूड उगवला आहे. कलम ३७० हटवल्यानंतर हा भेद नक्कीच झालेला आहे; परंतु ‘शस्त्रसज्ज असलेल्या भारतात हिंदूंच्या हत्या व्हायलाच नकोत’, येथपर्यंत सरकार कधी जाणार आहे ?’, असा प्रश्न सजग भारतीय जनतेला पडलेला आहे. सीमेवर ड्रोनच्या पाळतीसह कडेकोड बंदोबस्त असूनही आतंकवादी आत घुसत आहेत किंवा ते देशात तरी निर्माण होत आहेत. सरकारने काश्मीरमध्ये ध्वजारोहण, रस्ते चांगले करणे, उद्योग उभारणे आदी चालू केलेले प्रयत्न काश्मिरी हिंदूंच्या सुरक्षेसाठी पुरेसे नाहीत, हेच यावरून वारंवार लक्षात येत आहे.
मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्या मुफ्ती !
संजय शर्मा यांच्या हत्येनंतर ‘पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी’च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी गरळओक केली आहे. ‘अशा घटनांचा लाभ भाजप उठवतो’, असे त्यांनी म्हटले आहे. ‘काश्मिरी पंडितांच्या हत्या अद्यापही चालू रहाणे’, ही किती गंभीर गोष्ट आहे, याकडे लक्ष न देता त्यातही राजकारण आणणार्या मुफ्ती किती असंवेदनशील आहेत, याची कल्पना करता येते. प्रत्यक्षात त्यांनी आतापर्यंत वेळोवेळी आतंकवाद्यांना केलेले साहाय्य आणि त्यांना लाभ होईल, अशा प्रकारचे केलेले वर्तन संपूर्ण भारत ओळखून आहे. ‘काश्मीरमधील हिंदूंच्या हत्या, सीमेवरील घुसखोरी, स्थानिकांकडून आतंकवाद्यांना मिळणारे साहाय्य, दगडफेक करणारे स्थानिक मुसलमान निर्माण होणे, या सार्यांना कुठे ना कुठे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या मुफ्ती उत्तरदायी आहेत’, हे कुणीही नाकारू शकत नाही. मुफ्तीबाई एवढ्यावरच थांबलेल्या नाहीत. ‘उजव्या गटाच्या आतंकवाद्यांनी राजस्थानमध्ये मुसलमानांची हत्या केली आणि आता काश्मीरमध्येही हिंदूंची हत्या केली’, अशा उलट्या बोंबा त्यांनी प्रसारमाध्यमांना गोळा करून मारल्या आहेत. ‘काश्मीरमध्ये आतंकवाद संपला आहे, तर शर्मा यांची हत्या कुणी केली ?’, असे म्हणून अप्रत्यक्षरित्या ‘ती हिंदूंनी केली आहे’, असे परत परत सांगण्याचा प्रयत्न मुफ्ती यांनी केला आहे. सैन्याने संबंधित आतंकवाद्याला ठार मारून आतंकवाद्यांनी शर्मा यांना मारल्याचा पुरावाच दिला असला, तरी मुफ्तीबाईंची हिंदुविरोधी गरळओक काही बंद व्हायला सिद्ध नाही. त्यामुळे ‘आतंकवाद्यांना अप्रत्यक्ष साहाय्य करणार्या मुफ्ती यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावरच बंदी का नको ?’, असा प्रश्न पडावा. काश्मीर घाटीत सामान्य स्थिती असून ‘भाजपच येथील शांतता बिघडवत आहे’, असा आरोप त्यांनी केला आहे. ‘विद्वेषी (म्हणजे ‘द काश्मीर फाइल्स’) चित्रपटांचा पुरस्कार करण्यापेक्षा येथील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी सरकारने साहाय्य करायला हवे होते’, असे मुफ्ती म्हणाल्या. आतंकवाद्यांना पोसणार्या मुफ्ती यांना हे बोलायचा अधिकार तरी आहे का ? शर्मा यांच्या पत्नीला सरकारी नोकरी आणि कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे आवाहन मुफ्ती यांनी सरकारला केले आहे. खरे म्हणजे काश्मीरमध्ये आतंकवादग्रस्त वातावरण निर्माण करण्यास उत्तरदायी असणार्या मुफ्ती यांच्या खिशातूनच ही रक्कम घेऊन पीडितांना दिली गेली पाहिजे. कावेबाज मुफ्ती एवढ्यावर थांबलेल्या नाहीत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुसलमानांना आवाहन केले आहे, ‘‘मुसलमानांनी त्यांच्या रक्षणासाठी जे काही करता येईल ते करावे.’’ असे सांगून त्यांनी धर्मांधांना एक प्रकारे आव्हान दिले आहे. याला कुठला द्रोह म्हणावा ? ‘मुसलमानच घाटीत असुरक्षित आहेत’, असे नाटक वठवण्याचा प्रयत्न त्यांनी पुन्हा पुन्हा केला आहे. ‘भाजप या घटनेचे राजकारण करील’, असे म्हणणार्या मुफ्ती यांनी स्वतःच या घटनेचे किती राजकारण केले आहे, हे वरील विविध वक्तव्यांतून आणि शर्मा यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याच्या प्रसंगातून लक्षात येईल. हे सर्व नाटक भीतीपोटी आहे ? कि त्यामागे आणखी काही वेगळा डाव आहे ? हे काही काळाने कळेलच. धूर्त मुफ्ती यांनी शर्मा यांच्या हत्येनंतर जे काही राजकारण चालवले आहे, त्याला ‘मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्या’ची उपमा दिली, तरी ती अल्प पडेल, एवढे ते गलिच्छ आहे. यावरून मुफ्तीबाईंना भाजप शासनाने नजरकैदेत रहाण्याची दिलेली शिक्षा पुरी पडलेली नाही, असेच यातून दिसून येते.
‘काश्मिरी पंडित संघर्ष समिती’ने या घटनेविषयी म्हटले आहे, ‘‘सरकार ७५ लाख काश्मिरींना सांभाळू शकत नाही आणि पाकव्याप्त काश्मीर अन् बलुचिस्तान घेण्याची स्वप्ने पहात आहे.’’ या घटनेनंतर भाजपने काश्मीरमध्ये पाकविरोधात निदर्शने केली. जनतेला आता पाकविरोधी निदर्शने नकोत, तर आतंकवादी सिद्ध करणार्या पाकचे पुरते कंबरडे मोडलेले हवे आहे; कारण पाक दरिद्री झाला, तरी तो त्याचा आतंकवाद थांबवतांना मात्र दिसत नाही आणि त्याचा लाभ मुफ्ती यांच्यासारखे उठवत आहेत !
दरिद्री होऊनही पाक त्याचा आतंकवाद थांबवत नसल्याने भारताने त्यासाठी पुढील कठोर पावले उचलावीत ! |