आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाचे रहस्य !
मनुष्य जीवनाचे ध्येय काय आहे ? हे शोधण्याचा आपण कधी प्रयत्न केला आहे का ? आध्यात्मिकदृष्ट्या विचार केला, तर प्रारब्ध भोग भोगून संपवणे आणि ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणे, असे असते. ईश्वरप्राप्ती म्हणजेच सातत्याने ईश्वराचे स्मरण ठेवणे आणि सच्चिदानंद परमेश्वराशी एकरूप होणे. प्रपंचात राहून परमार्थ साधता येऊ शकतो का ? तर या प्रश्नाचे उत्तर आपल्या आदर्श दिनचर्येत दडले आहे. ईश्वर हा परिपूर्ण आहे. आपणही जीवनातील प्रत्येक कृती परिपूर्ण केल्यास आपण आनंदी होऊ शकतो.
बर्याचदा आपले विचार इतरांच्या वागण्यानुसार पालटत असतात. त्याचा परिणाम म्हणून आपणही नकळत अयोग्य कृती करतो. धर्मशास्त्रानुसार आपण केलेल्या अयोग्य कृतीचे आपल्याला फळ भोगावे लागते. त्यामुळे आनंदी जीवनासाठी आपले विचार महत्त्वाचे आहेत. यासाठी धर्मशास्त्र जाणून घेतल्यास योग्य विचार ठेवणे त्या तुलनेत सोपे जाते. यासमवेत आपला आहार आणि व्यवहारही योग्य असायला हवा.
दिनचर्येचा प्रारंभ हा सूर्योदयापूर्वी करणे, शाकाहारी आणि सात्त्विक अन्न ग्रहण करणे अन् दिवसभरात सकारात्मक वातावरणात रहाण्याचा प्रयत्न करणे किंवा तसे वातावरण इतरांसाठी आणि स्वतःसाठी सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे. आहार ग्रहण करतांना ८० टक्के अन्न आणि २० टक्के पोट मोकळे राहील याप्रमाणे आहार घ्यावा. असे केल्याने जडत्व येत नाही आणि उत्साह वाटतो. भ्रमणभाषचा अतिरेक टाळून रात्री झोपण्यापूर्वी भ्रमणभाष न पहाता भगवंताच्या कृतज्ञतापूर्वक स्मरणाने दिवसाचा समारोप करणे आवश्यक आहे. पुरेशी आणि शांत झोप हेही निरोगी आणि आनंदी आयुष्याचे गमक आहे. पैसा जोडतांना जगद़्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तो उत्तम व्यवहार करूनच जोडावा. आपल्या दीर्घायुष्याचे आणि आनंदी जीवनाचे, तसेच निरोगी आरोग्याचे गुपित हे आपल्या सात्त्विक आचार, उच्चार आणि विचार यांवर अवलंबून आहे. यांची घडी विस्कटली की, त्याचा परिणाम आपल्या मनावर अन् पर्यायाने आपल्या आरोग्यावर होतो.
‘निवृत्तीनंतर मन कशात गुंतवायचे ?’, असा प्रश्न अनेकांना पडतो; पण ईश्वराशी एकरूपता, म्हणजेच ‘निवृत्ती’ हे लक्षात घेऊन त्या अनुषंगाने आपल्यातील कलागुणांचा ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वापर करून घेणे आवश्यक !
– श्री. जयेश बोरसे, पुणे