गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाची ६ प्रकल्पांना अनुमती
पणजी – गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाने २८ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत गोव्यात ६ प्रकल्पांना अनुमती दिली. या प्रकल्पाद्वारे राज्यात ३१० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे, तसेच २ सहस्र ५०० जणांना रोजगार देण्याची क्षमता या प्रकल्पांत आहे.
बैठकीत एक अपवाद वगळता इतर सर्व प्रस्तावांना संमती देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. आजच्या बैठकीत लॉजिस्टिक धोरणाच्या कार्यवाहीविषयी सविस्तर चर्चा झाली, असेही ते म्हणाले.
ज्या ६ उद्योगांना संमती मिळाली, त्यात मोपा विमानतळाजवळील ‘थीम पार्क’साठी पुण्यातील ब्रह्माकॉर्प, विदेशी आस्थापनाच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्राच्या पाण्यात शिंपल्यांच्या शेतीसाठी मदर-ओशन प्रायव्हेट लिमिटेड, विदेशी कंपनीच्या सहकार्याने मद्य बनवण्यार्या ब्लूमाँक व्हेंचर्स डिस्टिलरी, हॉटमिक्सिंगचे काम करण्यासाठी बाकिया कन्स्ट्रक्शन आणि कराड प्रोजेक्ट अन् मोटर्स लिमिटेडला इलेक्ट्रिकल मोटर्स उत्पादन कारखाना घालण्यासाठी आणि हेवपॅक या पॅकेजिंग आस्थापनाला अनुमती देण्यात आली. आम्ही केवळ स्वच्छ प्रदूषण न करणार्या उद्योगांना प्रोत्साहन देतो, असे उद्योगमंत्री माविन गुदिन्हो या वेळी म्हणाले.