पाकमधील १८ श्रीमंतांकडील पैशांमुळे निम्मे कर्ज चुकवता येईल ! – सिराजुल हक, जमात-ए-इस्लामी
‘जमात-ए-इस्लामी’चा प्रमुख सिराजुल हक याचे मत !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमधील १८ श्रीमंतांची सूची माझ्याकडे आहे. त्यांच्या बँक खात्यांमध्ये ४ सहस्र कोटी रुपये आहेत. या १८ जणांमध्ये राजकीय नेते, न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी, सैन्याधिकारी आहेत. या सर्वांनी देशासाठी त्यांच्या पैशांचा त्याग केला पाहिजे. त्यांच्या पैशांतून देशावरील निम्मे कर्ज फेडता येईल, असे मत पाकच्या ‘जमात-ए-इस्लामी’चा प्रमुख सिराजुल हक याने व्यक्त केले आहे. तो येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होता. ‘आपल्या देशातील संस्था या लोकांकडून पैसे काढण्यास समर्थ नाहीत’, असेही त्याने स्पष्ट केले.
सिराजुल हक पुढे म्हणाला की, जर गव्हाचे पीठ १६० रुपए किलो विकले जात असेल, तर १२ जणांचा कुटुंबप्रमुख त्यांना कसा पोसत असेल ? सरकार जनतेवर ६५० कोटी रुपयांचा कर लादण्याचा प्रयत्न करत आहे. येणार्या काळात श्वास घेण्यावरही सरकारकडून कर लावला जाईल.
पाकमधील २० टक्के श्रीमंतांकडे ४९.६ टक्के संपत्ती !
संयुक्त राष्ट्रांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार पाकिस्तानमधील १ टक्का श्रीमंतांकडे देशाच्या एकूण संपत्तीपैकी ९ टक्के संपत्ती आहे, तर गरिबांकडे केवळ ०.१५ टक्के संपत्ती आहे. देशातील २० टक्के श्रीमंतांकडे ४९.६ टक्के संपत्ती आहे, तर तितक्याच गरिबांकडे केवळ ७ टक्के संपत्ती आहे.