मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार
रत्नागिरी – कोकणातील मुंबई – गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याचे काम ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पावसाळ्याच्या आरंभीच म्हणजे जूनमध्ये या बोगद्यातून एक लेन वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे. या बोगद्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार आहे. हे अंतर पार करण्यासाठी आता अवघड वळणांच्या कशेडी घाटातून जवळपास २० ते २५ मिनिटांचा कालावधी लागतो. तसेच अवजड वाहनांसाठी जवळपास ४० मिनिटांचा कालावधी लागतो. घाटातील अवघड वळणांमुळे अनेकदा अपघातही होतात. या बोगद्यामुळे या मार्गावरील प्रवास सुलभ होणार आहे.
(सौजन्य : Road Force)
हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आय.एल्.एफ्. कन्सल्टंट हे आस्थापन यांच्या समन्वयातून चालू आहे. हा बोगदा एकूण २ कि.मी. लांबीचा आहे. या बोगद्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीचा वेळ वाचणार आहे. या बोगद्याचे सर्व काम ‘रिलायन्स इन्फ्रा’ या आस्थापनाने घेतले असून उपआस्थापन म्हणून एस्.डी.पी.एल्. हे आस्थापन काम करत आहे. वर्ष २०१८ मध्ये या बोगद्याचे काम चालू करण्यात आले आहे.