तोतया पोलिसांचा टोळीने रत्नागिरी आणि चिपळूण येथील २ वृद्धांना लुटले
रत्नागिरी – पोलीस असल्याचे खोटे सांगून रत्नागिरी आणि चिपळूण येथे २ वृद्धांना लुटल्याच्या घटना २५ फेब्रुवारी या दिवशी घडल्या. याप्रकरणी रत्नागिरीत ३ जणांच्या, तर चिपळुणात २ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या चोरांनी वृद्धांच्या अंगावरील दागिने लुटले.
रत्नागिरीतील गिरिधर दत्तात्रय साखरकर (वय ७३ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी २५ फेब्रुवारीला दुपारी १.३० वाजता श्री भैरी मंदिरातून देवदर्शन करून रस्त्याने चालत जात होतो. त्या वेळी ३ अज्ञात व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगत सुरक्षिततेसाठी बोटांतील अंगठ्या कागदाच्या पुडीत बांधून पिशवीत ठेवत असल्याचे भासवले. त्यानंतर मला बोलण्यात गुंतवून कागदाच्या पुडीतील अंगठ्या चोरून पुडीत दगड ठेवला आणि त्या ३ व्यक्ती पसार झाल्या.
चिपळूण येथील दिवाकर गोविंद नेने (वय ७५ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी २५ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता दूध आणण्यासाठी जात असतांना २ अज्ञात व्यक्तींनी मला हाक मारून बोलावून घेतले. दोघांनी कोरोनाचे कारण सांगून मास्क असल्याचे विचारले आणि ‘तुमच्याकडील भ्रमणभाष, घड्याळ, सोन्याचे दागिने रुमालात बांधून खिशात ठेवा. पुढे चोर्या होत आहेत’, असे सांगितले. या वस्तू खिशात ठेवून मी दूध आणण्यासाठी गेलो. त्या वेळी त्या वेळी मी खिशातील रुमालात पाहिले असता, त्यातील भ्रमणभाष, घड्याळ आणि दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले.
या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. दागिने लुटणारी टोळी पुन्हा जिल्ह्यात कार्यरत झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.