सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे पंचमहाभूतांवर प्रभुत्व आहे’, याची प्रचीती येणे
१ अ. दुचाकी गाडीवरून सेवेला जातांना पाऊस पडणे आणि जोराचा वारा वहाणे, ‘सेवेला जाता यावे’, यासाठी वरुणदेवतेला प्रार्थना करणे : ‘जून २०२२ मध्ये एकदा पाऊस पडत होता. मी दुचाकी गाडीवरून सेवेच्या ठिकाणी जात होते. वारा जोरात वहात असल्याने माझी दुचाकी गाडी हालत होती. तेव्हा मी वरुणदेवतेला प्रार्थना केली, ‘हे वरुणदेवा, तू तुझे कर्तव्य करत आहेस; म्हणून ‘पाऊस पडू नये’, असे मी म्हणणार नाही. तुझ्याप्रमाणे मलाही गुरुचरणांची सेवा करता येऊ दे. तू मला तुझ्या कुशीत घेऊन माझे रक्षण कर.’
१ आ. प्रार्थना केल्यावर पाऊस न्यून होणे आणि न भिजता सेवेच्या नियोजित ठिकाणी पोचणे : मी प्रार्थना करून काही अंतरावर गेल्यावर पाऊस न्यून झाला. मी दुचाकी गाडीवरून जेथे जात होते, तेथे अगदी थेंब थेंब पाऊस पडत होता. मी ज्या ठिकाणाहून पुढे जात होते, त्या ठिकाणी जोरात पाऊस पडू लागायचा. वरुणदेवतेने माझे रक्षण केल्यामुळे न भिजता मला सेवेच्या नियोजित ठिकाणी पोचता आले.
१ इ. गुरुदेवांच्या कृपेने पावसाळ्यात एकही दिवस सेवेत खंड न पडता सेवा करू शकणे : अशी अनुभूती मला पावसाळ्यातील ३ मास आली. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे पंचमहाभूतांवर प्रभुत्व आहे’, असे भक्तीसत्संगात सांगितले होते’, त्याची मला अनुभूती घेता आली. ‘पावसाळ्यात एकही दिवस सेवेत खंड न पडता मी गुरुदेवांच्या कृपेने सेवा करू शकले’, त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आणि वरुणदेवता यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
२. सेवेच्या ठिकाणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे अस्तित्व अनुभवण्याविषयी प्रयत्न केल्यावर सेवेसाठी रामनाथी आश्रमात जाण्याचे विचार उणावणे
मी सध्या ज्या ठिकाणी सेवा करते, त्याऐवजी माझ्या मनात ‘रामनाथी आश्रमात जाऊन सेवा करावी’, असे अपेक्षेचे विचार यायचे. नंतर माझ्या मनात ‘सेवेच्या ठिकाणी सात्त्विकता कशी वाढेल ? चैतन्य कसे टिकून राहील ? गुरुदेवांचे अस्तित्व कसे अनुभवता येईल ?’, असे विचार येऊन माझ्याकडून तसे प्रयत्न होऊ लागले. त्या वास्तूत मी दळणवळण बंदीच्या काळात सेवा करू शकत होते. त्यामुळे मला त्या वास्तूबद्दल कृतज्ञता वाटू लागली. त्यामुळे माझे रामनाथी आश्रमात जाण्याचे विचार उणावले आणि मला सध्याच्या सेवेच्या ठिकाणी आनंद मिळू लागला.
३. रामनाथी आश्रमात वास्तव्याला असतांना वैकुंठातील चैतन्य अनुभवता येणे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले विष्णुरूपात दिसणे आणि आनंद मिळून कृतज्ञताभाव जागृत होणे
७.११.२०२२ या दिवसापासून मी सेवेसाठी रामनाथी आश्रमात वास्तव्याला होते. तेव्हा मला रामनाथी आश्रमात साक्षात् वैकुंठातील चैतन्य अनुभवता आले. त्या वेळी मला सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर विष्णुरूपात दिसायचे. काही वेळा ‘मी पाण्यावरून चालत आहे’, असे मला जाणवायचे. मी कितीही सेवा केली, तरीही माझा उत्साह टिकून असायचा. मला प्रत्येक गोष्टीत सातत्याने आनंद मिळायचा. माझ्या मनात ‘गुरुदेव आपल्यासाठी किती करतात !’, ही जाणीव सतत राहून कृतज्ञताभाव जागृत व्हायचा.
४. ‘गुरुदेवांना साधक-फूल प्रिय आहे’, असा दृष्टीकोन ठेवून प्रयत्न केल्यावर सहसाधिकेशी जवळीक निर्माण होेणे
रामनाथी आश्रमात माझा सहसाधिकेच्या समवेत एक प्रसंग घडला होता. त्याविषयी माझ्या मनात विचार चालू होते. ‘परम पूज्यांना प्रत्येक साधक-फूल प्रिय आहे’, असा दृष्टीकोन ठेवून मी एक आठवडा प्रयत्न केल्यावर मला त्या साधिकेबद्दल प्रेम वाटू लागले आणि माझी तिच्याशी जवळीक निर्माण झाली.
गुरुदेवांनी मला हे सर्व अनुभवण्यास दिले आणि माझ्यात प्रेमभाव निर्माण केला, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– सौ. मीनाक्षी धुमाळ (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५२ वर्षे), म्हापसा, गोवा. (२८.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |