मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार !
मुंबई, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेईल. विधानसभा सदस्यांच्या भावना पंतप्रधानांना सांगून त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यासाठी विनंती करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
२७ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने ७ वर्षांपूर्वी संबंधित निकषाची कागदपत्रे केंद्रशासनाला पाठवली आहेत. अभिजात भाषेविषयी असलेल्या निकषामध्ये मराठी भाषा बसत असतांनाही अद्याप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यास ४५० विद्यापिठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाईल.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांना भेटणार- मुख्यमंत्री | #MaxMaharashtra https://t.co/fvtdnM5jJ7
— Max Maharashtra (@MaxMaharashtra) February 27, 2023
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयी सर्व सदस्यांच्या भावना सारख्या असून यामध्ये येणारे अडथळे दूर करण्याविषयी केंद्रशासनाला विनंती करण्यात येईल, असे मत व्यक्त केले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.