हिंदूंनो, देश आणि धर्म यांच्या रक्षणाप्रीत्यर्थ सिद्ध व्हा ! – टी. राजासिंह
सोलापूर येथील ‘हिंदु गर्जना मोर्च्या’मध्ये ३० सहस्रांहून अधिक हिंदूंची सिंहगर्जना !
सोलापूर, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – केंद्र आणि राज्य सरकार यांनी महाराष्ट्रासह सर्व राज्यांमध्ये ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर आणि गोहत्या रोखण्यासाठी कायदे करावेत. जो देशासाठी त्याग करतो, त्याची इतिहासात नोंद होते. हिंदूंनो, देश आणि धर्म यांच्या रक्षणाप्रीत्यर्थ सिद्ध व्हा. जे हिंदूंसाठी कार्य करतात तेच हिंदूंवर राज्य करू शकतात हे दाखवून द्या, असे आवाहन भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी केले. येथे २६ फेब्रुवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने आयोजित झालेल्या विराट ‘हिंदु गर्जना मोर्च्या’मध्ये त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. या वेळी प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते धनंजय देसाई यांनीही उपस्थितांना संबोधित केले. मोर्च्यामध्ये ३० सहस्रांहून अधिक हिंदूंनी उपस्थित राहून लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या बंदी कायद्यांच्या मागणीचा जोर धरला होता.
हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ झाला आणि चार हुतात्मा पुतळा येथे विसर्जित करण्यात आला. या वेळी सहस्रो हिंदूंनी भगवे ध्वज फडकवत ‘जय श्रीराम’चा नारा दिला. या मोर्च्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या समवेत शहर आणि जिल्ह्यातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा मोठा सहभाग होता.
‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना कोणत्या पक्षाचा अजेंडा नसून हिंदूंच्या रक्तातील धमन्यांचा आवाज ! – धनंजय देसाई, प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते
‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना कोणत्याही पक्षाचा अजेंडा नसून हिंदूंच्या रक्तातील धमन्यांचा आवाज आहे. लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या या समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्राची निर्मिती हाच एकमेव उपाय आहे.