‘ग्लोबल वॉर्मिंग’ कुणामुळे ?
‘ग्लोबल वॉर्मिंग’ (जागतिक तापमानवाढ) न्यून करण्यासाठी शास्त्रज्ञ पृथ्वीच्या बाहेरील वातावरणाच्या वरच्या भागात फुग्यांद्वारे सल्फर डायऑक्साईड सोडणार आहेत. त्यामुळे पृथ्वीवर येणार्या सूर्यकिरणांना पृथ्वीच्या बाहेरच परावर्तित करता येईल आणि त्याची उष्णता पृथ्वीपर्यंत अल्प प्रमाणात पोचेल. त्यामुळे ‘ग्लोबल वॉर्मिंग’वर नियंत्रण मिळवता येईल’, असा विचित्र मार्ग काही शास्त्रज्ञांनी शोधला आहे. ‘या कृतीचे बरेच दुष्परिणामही होऊ शकतात’, अशी धोक्याची चेतावणी अन्य शास्त्रज्ञांनी दिली आहे. तरीही हा प्रकल्प करायचाच, असा अट्टाहास या प्रकल्पावर काम करणार्यांचा आहे.
आयुर्वेद आणि निसर्गोपचार यांच्या नियमानुसार केवळ कोवळ्या सूर्यकिरणांमुळे अनेक रोग नष्ट होतात. आजही नवजात बाळाची कावीळ, तसेच अनेक त्वचारोग केवळ कोवळ्या सूर्यकिरणांमुळेच नष्ट होतात. सूर्यदेवता पृथ्वीचे पालनपोषण करणारी देवता आहेत. पृथ्वीवर ज्या ठिकाणी सूर्यकिरणे पोचत नाहीत, तेथील वातावरण कसे आहे ? तेथील जीवसृष्टीचे आयुर्मान आणि रोगप्रतिकार शक्ती इत्यादींचे गंभीर परिणाम शास्त्रज्ञांना ठाऊक नाहीत का ?
‘ग्लोबल वॉर्मिंग’ खरच सूर्याच्या उष्णतेने होत आहे कि मनुष्याने स्वीकारलेल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे होत आहे ? याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मानवाने अनेक शोध लावले आणि त्यातून जीवन जगणे सुकर झाले हे खरे आहे; परंतु त्यामुळे निसर्गाची गळचेपी होत गेली आहे. भूमीतून खनिजे, पेट्रोलियम पदार्थ, कोळसा आदी धातू अतिरिक्त प्रमाणात काढून आपणच ‘ग्लोबल वॉर्मिंग’ नाही का वाढवले ? सृष्टीला गारवा देणारे, प्राणवायू पुरवणारे वृक्ष तोडून तिथे मानवाने रुक्ष आणि निर्जीव सिमेंटची जंगले मोठ्या प्रमाणात निर्माण केली, ते ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला कारणीभूत नाही का ? हाकेच्या अंतरावर जाण्यासाठीही गाडीचा वापर करून जळत्या इंधनाने ‘ग्लोबल वॉर्मिंग’मध्ये आपणच भर घातली नाही का ? अशी अनेक उदाहरणे देता येतील.
खरेतर दैनंदिन जीवनातील आपल्या चुकीच्या वर्तनामुळे ‘ग्लोबल वॉर्मिंग’ होत आहे. ते सुधारून आणि निसर्गाचा आदर करून मनुष्य वागल्यास ‘ग्लोबल वॉर्मिंग’ची समस्या सुटेल अन्यथा ती अल्प करण्यासाठी चालू असलेले प्रयत्न, म्हणजे स्वतःचेच नाक-तोंड दाबून आत्मघात करण्यासारखे होणार नाही ना ?’
– सौ. प्रांजली विजय ब्रह्मे, नागपूर