कसबा आणि चिंचवड (पुणे) विधानसभा मतदारसंघ येथील पोटनिवडणुकीत विविध घटनांमुळे गोंधळ !
पुणे – येथील कसबा मतदारसंघ, तसेच पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक २६ फेब्रुवारी या दिवशी पार पडली. या पोटनिवडणुकीत विविध घटनांमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळ उडाल्याचे चित्र होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत कसबा पेठ मतदारसंघात अनुमाने ४५.२५ टक्के, तर चिंचवडमध्ये अनुमाने ४१.१ टक्के मतदान झाले. या कालावधीत राजकीय पक्षांतील कार्यकर्ते, नेते यांच्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. भाजपचे गणेश बिडकर यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला, तर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनी सामाजिक माध्यमांतून मतदान करतांनाचे छायाचित्र प्रसारित करून गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.
चिंचवडमध्येही मतदारांकडून मतदान करतांनाचे छायाचित्र काढण्याचा प्रकार उघड झाला आहे. यांसह चिंचवडमधील ८ ठिकाणांवरील ‘इ.व्ही.एम्.’ यंत्रेही बिघडल्याने ती पालटून पुन्हा मतदानाला प्रारंभ करण्यात आला. अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे उपाययोजना आहेत कि नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कसबा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने, महाविकासआघाडीचे रवींद्र धंगेकर, हिंदु महासंघाचे (अपक्ष उमेदवार) आनंद दवे यांच्यात, तसेच चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात मुख्य लढत आहे.