भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांचा काळ लोटला, तरी मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळण्याची वाट पहावी लागते, हे दुर्दैव !
‘महाराष्ट्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या दृष्टीने प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी सांस्कृतिक मंत्रालयापुढे गेला आहे. ‘आज जगात मराठी भाषा बोलणार्यांची संख्या ११ कोटींच्या वर आहे. या संख्येनुसार जगात मराठी ही १० व्या क्रमांकाची भाषा आहे. मराठीत निर्मिती झालेली साहित्यसंपदा श्रेष्ठ दर्जाची आहे. बाराशे वर्षांपूर्वीही मराठी भाषा समृद्ध होती. आज भारतात सर्वत्र मराठी भाषा जाणणारे आणि बोलणारे लोक असल्याने ती केवळ एका राज्याची भाषा राहिली नसून राष्ट्रीय भाषा झाली आहे’, असा युक्तीवाद महाराष्ट्राच्या वतीने पाठवलेल्या प्रस्तावात करण्यात आला होता. ‘आजवर कन्नड, संस्कृत, तमिळ, मल्याळम् आणि ओरिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्राने निर्धारित केलेले सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते’, असेही महाराष्ट्राने केंद्राला पाठवलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.