‘ऑनलाईन’ साधना सत्संगासाठी संहितालेखनाची सेवा ‘गुरुपूजन’ या भावाने करणार्या पडेल (जि. सिंधुदुर्ग) येथील सौ. जोत्स्ना रविकांत नारकर !
‘वर्ष २०२० मध्ये कोरोनामुळे लागू झालेल्या दळणवळण बंदीमुळे साधकांना सेवा करणे शक्य होणार नव्हते. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘ऑनलाईन’ सत्संग चालू झाले. गुरुकृपेने ‘ऑनलाईन’ सत्संगांनिमित्त साधकांना घरी बसून विविध सेवा उपलब्ध झाल्या आणि साधकांची सेवा अन् साधना यांना गती मिळाली.
मु.पो. पडेल (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील सौ. जोत्स्ना नारकर यांना ‘ऑनलाईन’ साधना सत्संगांसाठी संहितालेखन करण्याची सेवा मिळाली. या सेवेतून त्यांना पुष्कळ आनंद मिळाला. ही सेवा करतांना त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा, त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. दळणवळण बंदीच्या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधकांना ‘ऑनलाईन’ सेवा उपलब्ध झाल्याने साधकांची साधना अखंड आणि गतीने होणे
‘खेड्यापाड्यांतील दुर्गम वस्तीत जाऊन अध्यात्माचा प्रचार करणे पुष्कळ कठीण असते. वस्तीपर्यंत जाण्याचे मार्ग चांगले नसतात आणि वाहनांची उपलब्धताही नसते. त्यामुळे साधकांना अध्यात्मप्रचार करण्याची तळमळ असूनही त्यांच्याकडून तेवढ्या प्रमाणात सेवा होऊ शकत नाही. कोरोनामुळे लागू झालेल्या दळणवळण बंदीच्या कालावधीत गुरुदेवांच्या कृपेने ‘ऑनलाईन’ साधना सत्संग चालू झाल्यामुळे साधकांच्या सेवेला गती आली आणि त्यांना घरात राहूनही झोकून देऊन गुरुसेवा करण्याची संधी मिळाली. ‘ऑनलाईन’ सत्संगाची सेवा चालू झाल्यापासून दिवसभरातील प्रत्येक क्षण सेवा आणि साधना करण्यासाठी वापरला जाऊ लागला. तेव्हा गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) साधकांच्या उद्धारासाठी काळानुरूप सेवा उपलब्ध करून देतात, त्याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
२. ‘साधना सत्संगा’साठी संहितालेखन करण्याची सेवा ‘ही मोठी गुरुकृपाच आहे’, असे वाटणे
‘ऑनलाईन’ ‘साधना सत्संगा’च्या अनुषंगाने मला सत्संगांसाठी ‘संहितालेखन आणि समन्वय करणे’, या सेवा मिळाल्या. संहितालेखनाची सेवा उत्तमरित्या करण्याची क्षमता असणारे अनेक गुणवंत साधक सनातन संस्थेत असतांना ‘या सेवेसाठी माझी निवड होणे’, ही माझ्यावर असलेली मोठी गुरुकृपाच आहे. ‘या सेवेच्या माध्यमातून गुरुदेवांनी मला साधनेच्या सूत्रांचा अभ्यास करण्याची संधी दिली’, त्याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
३. संहितालेखन करतांना शिकायला मिळालेली सूत्रे !
३ अ. वैयक्तिक स्तरावर शिकायला मिळालेली सूत्रे
१. ग्रंथांचा अभ्यास करून ग्रंथांतील माहिती सोप्या किंवा बोली भाषेत मांडणे, इतरांचा विचार करणे, वेळोवेळी उत्तरदायी साधकांचे साहाय्य घेणे आणि सेवा समयमर्यादेत पूर्ण करणे.
२. मी ही सेवा चालू केली, तेव्हा आरंभी केवळ संहितेसाठी विषयानुरूप आवश्यक माहिती पाठवत असे. या सेवेतील सौ. गौरी नीलेश कुलकर्णी यांनी मला संहिता अंतिम करण्यासाठी प्रयत्न करायला सांगितल्यावर माझ्याकडून संहिता अंतिम करण्याचे प्रयत्न वाढले.
३ आ. उत्तरदायी साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे
१. सेवेची फलनिष्पत्ती मिळण्याच्या दृष्टीने विषयानुरूप सूत्रे, उदाहरणे आणि योग्य चित्रे यांची निवड करणे.
२. सेवा भाव आणि चैतन्य यांच्या स्तरावर होण्यासाठी प्रयत्न करणे.
३. ‘सेवेचे नियोजन कसे करायचे ? आणि सेवेची गती कशी असायला हवी ?’, याविषयी शिकायला मिळाले.
४. गुरुसेवा परिपूर्ण, भावपूर्ण आणि संघभावाने होण्यासाठी उत्तरदायी साधकांची तळमळ मला अनुभवता आणि शिकता आली.
या सेवेसाठी मला सौ. गौरी नीलेश कुलकर्णी, सौ. अर्पिता बळवंत पाठक आणि श्री. चैतन्य तागडे (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ३६ वर्षे) यांचे अनमोल साहाय्य अन् मार्गदर्शन लाभले.
४. संहितालेखन करतांना आलेल्या अनुभूती
कधी कधी विषयानुरूप संहिता लिहिण्यासाठी ग्रंथ किंवा संकेतस्थळ यांवर पुरेशी माहिती उपलब्ध होत नसे किंवा योग्य उदाहरणे आणि अनुभूती यांची निवड करण्यासाठी मला अभ्यास करावा लागत असे. त्यामुळे घरातील वैयक्तिक कामे आवरतांना मी दिवसभर त्याच विचारांत रहात असे. गुरुदेवांना प्रार्थना करून शरण गेल्यानंतर ‘देव वेगवेगळ्या माध्यमांतून साहाय्य करत आहे’, असे मला अनेक वेळा अनुभवता आले.
४ अ. ‘राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण’ या विषयावरील सूत्रे सत्संगात सांगितल्यावर जिज्ञासूंनी ‘हा विषय आम्हाला विचारप्रवण आणि योग्य दिशादर्शन करणारा ठरला’, असे सांगणे : एकदा साधना सत्संगातील जिज्ञासूंसाठी ‘राष्ट्र आणि धर्म’ या विषयावर संहिता लिहायची होती. याविषयीची सूत्रे त्यांच्या स्थितीला जाऊन, सोप्या भाषेत आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन, तसेच ‘राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करणे’, ही समष्टी साधना कशी आहे ?’, हे त्यात मांडायचे होते. या विषयाचे संहितालेखन परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने मी संहितेचे वाचन करायचे, त्या प्रत्येक वेळी ‘संहितेसाठी अधिक योग्य काय असायला हवे ?’, ते गुरुकृपेने माझ्या लक्षात यायचे आणि तसे पालट अन् सुधारणा केल्या जायच्या. त्यामुळे अवघड वाटणारा हा विषय गुरुकृपेनेच माझ्याकडून चांगला लिहिला जायचा. या सत्संगानंतर जिज्ञासूंनी सांगितले, ‘‘राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण’ हा विषय आम्हाला विचारप्रवण आणि योग्य दिशादर्शन करणारा ठरला.’’
४ आ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांवरील संहिता लिहित असतांना साधिकेच्या भाच्याने प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांवरील ‘व्हॉट्सॲप पोस्ट’ पाठवणे : एकदा मला प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांवर एक संहिता लिहायची होती. ‘प.पू. भक्तराज महाराज यांची भजने परावाणीतील असून ती ऐकल्यामुळे चैतन्य मिळते’, एवढेच मला ठाऊक होते. त्या काळात माझा भाचा श्री. लक्ष्मण जठार याने माझ्या ध्यानीमनी नसतांना मला प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांचे आध्यात्मिक दृष्टीने महत्त्व असणारी एक ‘व्हॉट्सॲप पोस्ट’ पाठवली. विशेष म्हणजे या आधी त्याने मला मी न सांगता कोणतीही ‘पोस्ट’ पाठवली नव्हती. ती ‘पोस्ट’ आणि माझ्याकडे असलेला ‘संत भक्तराज महाराज विरचित भजनामृत’ हा ग्रंथ या आधारे तो विषय पूर्ण झाला.
४ इ. ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या विषयावरील संहिता लिहितांना वैयक्तिक जीवनातील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रसंग सांगणे अन् गुरुकृपेने ते जिज्ञासूंना भावणे : स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याच्या संदर्भातील संहिता लिहितांना मला माझ्या वैयक्तिक जीवनातील स्वभावदोष अन् अहं यांच्या संदर्भातील प्रसंग उपयुक्त ठरले. मी जे अनुभवले, तेच सांगण्याची संधी मला मिळाली आणि ते प्रसंग गुरुकृपेने जिज्ञासूंना भावले. माझ्यासाठी ही देवाची लीलाच आहे.
४ ई. गुरुपौर्णिमेसाठी संहितालेखन करतांना आलेल्या अनुभूती
४ ई १. गुरुपौर्णिमेसाठी संहितालेखन करतांना ‘संहितालेखन हेच गुरुपूजन’, असा भाव ठेवणे : गुरुपौर्णिमेची संहिता लिहितांना ग्रंथामधील काही सूत्रे आणि त्याला अनुसरून काही उदाहरणांची निवड करायची होती. माझ्या मनात ‘संहिता लेखन हेच माझ्यासाठी गुरुपूजन आहे’, असा भाव असल्याने ‘ती सूत्रे जिज्ञासूंना सहज भावतील आणि भाव अन् चैतन्य यांच्या स्तरावर होतील’, या दृष्टीने संहिता लेखन व्हावे’, असा विचार होता. त्यासाठी गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना होत होती. मला श्री. चैतन्य तागडे यांचे ‘भाव निर्मितीच्या दृष्टीने सूत्रे कशी मांडायची ?’, याविषयी अनमोल मार्गदर्शन लाभले.
४ ई २. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच संहिता लेखन चांगले होत आहे’, असे अनुभवून सेवेतून पुष्कळ आनंद मिळणे : गुरुपौर्णिमेची संहिता लिहून पूर्ण झाल्यावर मी श्री. चैतन्य तागडे यांना ती वाचायला दिली. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘संहिता चांगली झाली आहे. कुणी सुचवले ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘संहिता लिहितांना मला सूक्ष्मातून गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता येऊन ग्रंथ किंवा संकेतस्थळ यांतील कोणती माहिती घ्यायची ? कौटुंबिक किंवा व्यावहारिक जीवनातील कोणते प्रसंग निवडायचे ?’, हे केवळ गुरुकृपेनेच सुचते.’’
४ उ. प्रत्येक संहिता लिहणे ही एक अनुभूती असणे : संहिता लिहितांना ‘गुरुकृपेने या सेवेसाठी देवाने माझी निवड केली आहे, याचा अर्थ तोच ती लिहून घेणार आहे. मी केवळ सेवा चांगली होण्यासाठी मनापासून प्रयत्न करून शिकण्याच्या स्थितीत आणि कृतज्ञतेच्या भावात राहून देवाची लीला अनुभवायची आहे’, एवढाच विचार माझ्या मनात असायचा. ‘मला कसे जमेल ?’, हा विचारही माझ्या मनात येत नसे. त्यामुळे गुरुकृपेने प्रत्येक संहिता चांगली होत होती आणि प्रत्येक संहिता लिहिणे, ही माझ्यासाठी अनुभूतीच असे.
४ ऊ. तर्जनीच्या टोकावर ‘ॐ’ उमटणे : संहितालेखनाची सेवा करतांना काही दिवसांपासून माझ्या डाव्या हाताच्या तर्जनीच्या टोकावर ‘ॐ’ उमटला आहे.
५. ‘साधक अंतर्मुख होऊन त्यांची साधना अधिक चांगल्या प्रकारे व्हावी’, हेच या सेवेचे उद्दिष्ट आहे’, असे जाणवणे
गुरुदेवांनी आजपर्यंत लिहिलेल्या ग्रंथांमधून प्रत्येक प्रकृतीच्या साधकाला साधनेत प्रगती करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध आहे; पण ‘ग्रंथांचा परिपूर्ण अभ्यास’ हे सूत्र साधकांकडून दुर्लक्षित रहात होते. या सेवेच्या निमित्ताने सेवेतील सर्वच साधकांना ‘आपण कुठे न्यून पडतो ?’, हे लक्षात आले आणि साधनेचे दृष्टीकोन स्पष्ट होऊन आमच्या साधनेला गती आली. त्यातून ‘ही सेवा आम्हालाच अंतर्मुख करण्यासाठी आहे’, असे आम्हाला जाणवले.
गुरुदेवांनी साधक निर्मितीच्या प्रक्रियेत अनंत हस्ते ज्ञानाचे भांडार उपलब्ध करून दिल्यामुळे आम्हा सर्वच साधकांना पुष्कळ कृतज्ञता वाटते. गुरुदेवा, मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे ! संहिता लेखन सेवेचे कृतज्ञतापुष्प श्री गुरुचरणी अर्पण !
६. प्रार्थना
गुरुकृपेने आजपर्यंतच्या प्रत्येक संहितालेखनातून मला पुष्कळ आनंद मिळाला आहे. ‘गुरुदेवांनी माझ्याकडून अशीच सेवा करून घ्यावी’, अशी त्यांच्या चरणी अनन्य शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. ज्योत्स्ना रविकांत नारकर (वय ६१ वर्षे), मु.पो. पडेल, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग. (१४.१२.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |