देश आणि जग यांना उपयुक्त ठरेल, असा पंचमहाभूत लोकोत्सव ! – नारायण राणे, केंद्रीय मंत्री, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खाते

पंचमहाभूत लोकोत्सवा’चा समारोप !

30 लाख लोकांच्या भेटीने पुरोगामी आणि साम्यवादी यांना चपराक !

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सत्कार करताना प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी

कोल्हापूर, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी समाजहित, देशहित यांचे कार्य करत आहेत. या महोत्सवात ३० लाखांपेक्षा अधिक लोक येऊन गेले. या कार्यातून समाजात मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. या लोकोत्सवाच्या माध्यमातून शिकून घेऊन त्याचा उपयोग मी राज्य आणि देश पातळीवर करणार आहे. देश आणि जग यांना उपयुक्त ठरेल, असा हा पंचमहाभूत लोकोत्सव आहे, असे गौरवोद्गार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काढले. ते २६ फेब्रुवारीला पंचमहाभूत लोकोत्सवाच्या समारोपप्रसंगी बोलत होते.

सौजन्य एबीपी माझा 

या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, कर्नाटक राज्याचे विधान परिषद सभापती बसवराज होराठी, कर्नाटक येथील खासदार अण्णासाहेब जोल्ले, कर्नाटक सरकारच्या वक्फ, हज आणि धर्मादायमंत्री सौ. शशिकला जोल्ले, आमदार महेश शिंदे, गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांसह अन्य उपस्थित होते. आभारप्रदर्शन कणेरी मठाचे विश्वस्त उदय सावंत यांनी केले.

आपल्या प्रास्ताविकात आमदार महेश शिंदे म्हणाले, ‘‘येथील गोशाळा आदर्श असून १ सहस्र ७०० गायींचे येथे संगोपन होते. संपूर्ण राष्ट्राला अभिप्रेत असे कार्य मठाच्या माध्यमातून होत आहे.’’ या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे म्हणाले, ‘‘निसर्ग हीच आमची माता आहे. पुढच्या पिढीला चांगली हवा, पाणी, वायू द्यावयाचे असेल, तर प्रदूषण रोखण्यासाठी आम्हाला आमच्या जीवनशैलीत परिर्वतन घडवावेच लागेल. मानवाने त्याला मिळणार्‍या क्षणिक भौतिक सुखासाठी पंचमहाभूतांवर आक्रमण केले आहे.’’

पंचमहाभूत लोकोत्सवातून बोध घेऊन ते कृतीत आणण्याचा निश्चय करा ! – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी

प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी

हा लोकोत्सव समाजजागृतीसाठी आयोजित करण्यात आला होता. आता आपण विनाशाच्या उंबरठ्यावर असून आपण आता जागृत झालो नाही, तर आपल्या हातात काहीच रहाणार नाही. भूमीतील कार्बनचे प्रमाण वाढत असून ते असेच वाढत राहिल्यास एक दिवस भूमी दगडासारखी होईल. शेतकर्‍यांनी सातत्याने एकच पीक न घेता पीक पालटून शेती करणे, शेतीत मोठ्या प्रमाणात झाडे लावणे, सेंद्रीय शेतीवर भर देणे, नागरिकांनी घरी किमान १० झाडे लावणे, विद्यार्थ्यांनी प्लास्टिक गोळा करून ते एकत्र करून शाळेत देणे, महिलांनी पाण्याची बचत करणे, शेतकर्‍यांनी ‘गोबर गॅस’चे संयंत्र वाढवून गाव ‘एल्.पी.जी.’ मुक्त करणे यांसह अनेक उपाय करणे आवश्यक आहे. हा महोत्सव एक प्रारंभ असून पंचमहाभूत लोकोत्सवातून बोध घेऊन ते कृतीत आणण्याचा निश्चय करा, असे आवाहन प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी या प्रसंगी केले.

प्रारंभी कुमार खिरुगडे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी केलेले बलीदान आणि प्राणार्पण यावर विशेष एकपात्री प्रयोग सादर केला. छत्रपती संभाजी महाराज यांनी शेवटच्या ४० दिवसांत हिंदु धर्मासाठी सोसलेल्या अमानुष छळाचे वर्णन ऐकून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आले !
समारोपप्रसंगी भाविकांनी ‘गोमाता की जय’, ‘हर हर महादेव’, ‘भारतमाता की जय’, यांसह अन्य घोषणा दिल्या.

क्षणचित्रे

१. लोकोत्सवासाठी प्रशासकीय पातळीवर भरीव काम केल्याविषयी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

२. या प्रसंगी ‘तुम्ही आम्ही पालक-सामाजिक पालकत्व’ या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.