राष्ट्राध्यक्ष बनल्यास शत्रूराष्ट्रांना देण्यात येणारे साहाय्य बंद करू ! – निक्की हेली
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत असणार्या भारतीय वंशाच्या निक्की हेली यांची घोषणा !
वॉशिंग्टन (अमेरिका) – मी राष्ट्राध्यक्ष बनल्यास अमेरिकेच्या शत्रूंना करण्यात येणारे आर्थिक साहाय्य पूर्णपणे थांबवेन, अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी स्वतःच्या नावाची घोषणा करणार्या भारतीय वंशाच्या नेत्या निक्की हेली यांनी केली आहे.
‘I will cut billions in foreign aid that the USA sends to enemies including Pakistan and China’: US Presidential candidate Nikki Haleyhttps://t.co/BFsnwRgKkI
— OpIndia.com (@OpIndia_com) February 26, 2023
१. हेली यांनी म्हटले की, बायडेन सरकारने पाकिस्तानला साहाय्य करणे चालू ठेवले आहे. ‘अमेरिकेतील करदात्यांचा पैसा साम्यवादी चीनच्या हास्यास्पद वातावरण पालटाच्या संदर्भातील कार्यक्रमाच्या नावावर दिला जात आहे’, असा दावाही त्यांनी केला.
२. हेली यांनी ‘न्यूयॉर्क पोस्ट’ दैनिकात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, अमेरिका प्रतिवर्षी ४६ अब्ज डॉलर रुपये चीन, पाकिस्तान आणि इराक यांसारख्या देशांवर खर्च करत आहे. अमेरिका बेलारूसला साहाय्य करत आहे, जो रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या जवळचा मित्र आहे. आम्ही साम्यवादी क्युबा देशालाही साहाय्य पाठवतो. तेथील सरकार आतंकवाद्यांना प्रायोजित करते. पाक आणि इराक या देशांत तर अमेरिकेला विरोध केला जातो. तेथे आतंकवादी संघटना सक्रीय आहेत.
३. हेली यांनी अमेरिकेतील पूर्वीच्या सरकारांवर आणि राष्ट्राध्यक्षांवर टीका केली. त्या म्हणाल्या की, ही गोष्ट केवळ बायडेन यांचीच नाही, तर देशातील दोन्ही (डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन) पक्षांकडून अमेरिकेच्या विरोधातील देशांना साहाय्य करत आले आहेत. आमचे परराष्ट्र धोरण भूतकाळात अडकले आहे. अमेरिकेकडून साहाय्य घेणार्यांच्या वर्तणुकीकडे दुर्लक्ष केले जात आहे.