५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली तळेगाव (पुणे) येथील चि. स्वामिनी भास्कर खैरे (वय १ वर्ष) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र(सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. स्वामिनी खैरे ही या पिढीतील एक आहे !
फाल्गुन शुक्ल अष्टमी (२७.२.२०२३) या दिवशी तळेगाव (पुणे) येथील चि. स्वामिनी खैरे हिचा पहिला वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या जन्मापूर्वी तिच्या आईला आणि जन्मानंतर कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
चि. स्वामिनी भास्कर खैरे हिला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. गर्भारपण
१ अ. व्यष्टी साधना चालू होणे : ‘चि. स्वामिनीच्या वेळी गर्भार असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने माझ्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांना आरंभ झाला. मी गर्भारपणात सर्व स्तोत्रे ऐकायचे आणि नामजप करायचे. माझी व्यष्टी साधना एवढी चांगली कधीच होत नव्हती.
१ आ. घरातील कुंडीत तुळशीच्या रोपांची पुष्कळ चांगली वाढ होणे आणि कुंडीत तुळशीची नवीन रोपे येणे : माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्या काकूंनी मला विचारले, ‘‘तुला घरात किंवा तुझ्यात काही पालट जाणवतात का ?’’ त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘कुंडीतील तुळशीच्या रोपांची वाढ पुष्कळ चांगली झाली होती आणि कुंडीमध्ये तुळशीची नवीन रोपे आली होती.’
१ इ. समष्टी सेवा करणे : मला जुलै २०२१ मध्ये ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाशी संबंधित सेवा मिळाली. ९ मास पूर्ण होईपर्यंत मला ‘सेवा करावी’, असे वाटायचे आणि सेवा करतांना मला आनंद मिळायचा. देवाच्या कृपेने मला ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाची सेवा पूर्ण करता आली.
१ ई. वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे दिनचर्येचे नियोजन करणे : कामशेत (पुणे) येथील वैद्य आचार्यजी हे रुग्णांना सेवाभावाने उपचार सांगतात. मी त्यांना विचारले, ‘‘गरोदर असतांना ९ मासांत दिनचर्या कशी असावी ? जेवणात काय घ्यावे आणि काय टाळावे ?’’ तेव्हा त्यांनी त्याविषयी सांगितल्याप्रमाणे देवाने माझ्याकडून करून घेतले. मी पहाटे ५.३० वाजता उठून पोळी-भाजी करायचे. नंतर सकाळी चालायला जात असे, तसेच सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाशी संबंधित सेवा करत असे. मी कोवळ्या उन्हात बसतांना सूर्यदेवतेला प्रार्थना करायचे, ‘हे सूर्यदेवा, तुझे तेज माझ्या गर्भाला मिळू दे. तुझ्या कोवळ्या किरणांनी माझ्या गर्भावर उपाय होऊ देत.’ या दिवसांत मला कधीही थकवा आला नाही.
१ उ. गर्भाच्या हृदयाच्या नसांमध्ये काही अडचणी आल्यावर आरंभी काळजी वाटणे; पण सेवेत असल्याने सकारात्मक रहाता येणे आणि ‘गुरुदेव बाळाची काळजी घेतील’, असे वाटणे : सातव्या मासात माझी ‘सोनोग्राफी’झाली. त्यामध्ये गर्भाच्या हृदयाच्या नसांमध्ये काही अडचणी (complications) दिसून आल्या. त्याविषयी तज्ञ आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘याचा बाळावर कितपत परिणाम होईल ? त्यासाठी काय उपचार करावे लागतील ?’, हे त्याच्या जन्मानंतर कळेल. आता मला काहीही सांगता येणार नाही.’’ त्या वेळी माझ्या मनाची अवस्था िद्वधा झाली. मला पुष्कळ काळजी वाटली; पण सेवेत असल्यामुळे मला सकारात्मक रहाता आले आणि ‘गुरुदेव बाळाची काळजी घेतील. आपण काळजी करायची नाही’, असे वाटले.
१ ऊ. गर्भाच्या अडचणी दूर होण्यासाठी नामजपादी उपाय आणि गुरुचरित्राचे पारायण करणे : ‘गर्भाच्या अडचणी दूर व्हाव्यात’, यासाठी मला संतांनी नामजपादी उपाय सांगितले होते. तो नामजप देवानेच माझ्याकडून पूर्ण करून घेतला. गर्भारपणात मी ‘चैतन्यवाहिनी ॲप’वरील सर्व श्लोक नियमित ऐकत असे. यजमानांनी बाळासाठी गुरुचरित्राचे पारायण केले. त्यातही त्यांना अडचणी आल्या; पण देवाने पारायण पूर्ण करून घेतले.
२. जन्म ते २ मास
२ अ. बाराव्या दिवशी आधुनिक वैद्यांनी बाळाची तपासणी केल्यावर तिचा अहवाल सामान्य येणे आणि गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त होणे : माझ्या मुलीचा जन्म झाल्यावर १२ व्या दिवशी आधुनिक वैद्यांनी बाळाची ‘टू डी इको’ (2D echo) तपासणी (टीप) करायला सांगितली. ती तपासणी केल्यावर तिचा अहवाल सामान्य आला. त्या वेळी मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. तेव्हा ‘देवच आपली काळजी घेत आहे’, असे वाटून माझी भावजागृती झाली.’
टीप – या चाचणीमध्ये ध्वनीलहरींच्या साहाय्याने हृदयाचे कार्य प्रत्यक्ष पाहिले जाते. त्या योगे हृदयातील झडपा, हृदयाशी जोडलेल्या रक्तवाहिन्या आणि हृदयातून होणारे रक्ताभिसरण तपासले जाते.’
– सौ. रेखा भास्कर खैरे (चि. स्वामिनीची आई), तळेगाव, पुणे.
२ आ. स्वामी समर्थांचे स्मरण होण्यासाठी बाळाचे नाव ‘स्वामिनी’ ठेवणे : ‘ताईंचे (सौ. रेखा खैरे यांचे) यजमान श्री स्वामी समर्थांच्या संप्रदायानुसार साधना करतात. त्यामुळे त्यांनी ‘श्री स्वामी समर्थांचे स्मरण व्हावे आणि त्यांची अखंड कृपा व्हावी’, यासाठी बाळाचे नाव ‘स्वामिनी’, असे ठेवले.’ – सोनाली (चि. स्वामिनीची मावशी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ इ. ‘चि. स्वामिनी एक मासाची असल्यापासून तिला भजन, भक्तीगीते ऐकवली की, ती शांतपणे ऐकते. तिला गीतरामायण आणि हरिपाठ ऐकायला आवडते.’ – सौ. सुवर्णा रागमहाले (चि. स्वामिनीची आजी (आईची आई)), तळेगाव, पुणे.
२ ई. चि. स्वामिनीची आई ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाशी संबंधित सेवा करत असतांना चि. स्वामिनीने तिच्या आजीकडे शांत रहाणे : ‘१०.४.२०२२ या दिवशी स्वामिनी एक मासाची झाली होती. ‘ऑनलाईन’ साधना सत्संगात एक सेवा करण्यासाठी साधक उपलब्ध नव्हते. तेव्हा मला ही सेवा करण्यासाठी विचारल्यावर मुलगी लहान असल्याने आरंभी मी सेवेला नकार दिला; पण नंतर मला वाटले, ‘जन्मापूर्वी ९ मास देवाने तिची काळजी घेतली आहे. आताही देवच तिची काळजी घेईल.’ त्यानंतर मी २ घंटे ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाशी संबंधित सेवा केली. सेवेच्या वेळी स्वामिनी माझ्या आईकडे शांत राहिली आणि न रडता झोपी गेली.
२ उ. सद्गुरु स्वाती खाडये घरी आल्यावर चि. स्वामिनीने पुष्कळ शांत रहाणे : ११.४.२०२२ या दिवशी सद्गुरु स्वाती खाडये आमच्या घरी आल्या होत्या. त्या दिवशी स्वामिनी पुष्कळ शांत होती. सद्गुरु ताई घरी आल्यावर मला पुष्कळ आनंद झाला आणि माझी भावजागृती झाली.’
– सौ. रेखा भास्कर खैरे
३. वय ३ ते ५ मास
३ अ. ‘स्वामिनीचा चेहरा नेहमीच हसतमुख असतो, तसेच तिची दृष्टी स्थिर असते. आपण जे बोलतो, ते तिला समजते आणि त्यानुसार ती प्रतिसाद देते.
३ आ. सर्वांना आपलेसे करून घेणे : तिला कुणी पाहिल्यावर ती त्यांच्याकडे सहजपणे जाते आणि त्यांच्या समवेत खेळते, तसेच ती सगळ्यांना आपलेसे करून घेते.’
– सोनाली
३ इ. हातांच्या मुद्रा करणे
१. ‘जेव्हा स्वामिनी शांत आणि स्थिर असते, तेव्हा तिच्या हातांच्या मुद्रा होतात. ती झोपेतही हाताची मुद्रा करत असे.’ – सौ. रेखा भास्कर खैरे
२. ‘भजन किंवा भक्तीगीत ऐकतांना ती दोन्ही हातांच्या मुद्रा करते.’ – सौ. सुवर्णा रागमहाले
३ ई. ‘स्वामिनीचे बाबा मोठ्याने नामजप करत असतांना ती घरात लावलेल्या नामपट्टीकडे बघत रहाते.
३ उ. तिला आरती ऐकायला आवडते.
४. वय ८ मास ते १ वर्ष
४ अ. दूरच्या प्रवासात काही त्रास न देणे : स्वामिनी ८ मासांची असतांना आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. त्या वेळी तिने प्रथमच १५ घंट्यांचा प्रवास केला होता. प्रवासात तिने मला काहीच त्रास दिला नाही.
४ आ. सात्त्विकतेची आवड : स्वामिनी देवासमोर दिवा लावायच्या वेळी आणि ‘शुभं करोति कल्याणम् ।’ म्हणतांना शांत बसते. तिला घंटा आणि टाळ वाजवायला पुष्कळ आवडते. ‘ऑनलाईन’ साधना सत्संगात आरंभी धून लावतात. ती ऐकून स्वामिनी नाचायला लागते. स्वामिनी स्तोत्र, स्वामी समर्थांचा तारक मंत्र, तसेच ‘नंदकिशोरा चित्त चकोरा…’, हे श्रीकृष्णाचे गाणे ऐकत झोपते.’
– सौ. रेखा भास्कर खैरे
४ इ. ‘मला स्वामिनीच्या समवेत असतांना उत्साह आणि आनंद जाणवतो, तसेच ‘तिच्या चेहर्याकडे पहातच रहावे’, असे वाटते.
४ ई. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर चि. स्वामिनीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. सौ. रेखा खैरे आणि चि. स्वामिनी या श्री. अतुल बधाले (स्वामिनीचा मामा) याच्या विवाहासाठी रामनाथी आश्रमात आल्या होत्या. तेव्हा स्वामिनी आश्रमात सर्व साधकांकडे सहजतेने जात होती. तिच्याकडे पाहून ‘ती नवीन ठिकाणी आली आहे’, असे वाटत नव्हते.
२. स्वामिनीला पाहिल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘बाळ सात्त्विक आहे.’’
३. रामनाथी आश्रमात असतांना स्वामिनी कधी रडू लागली, तर तिला तिची आई सनातन चैतन्यवाणीवरील आरती किंवा परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधनेविषयीच्या मार्गदर्शनाची ध्वनीचकती लावायची. नंतर ती लगेच शांत होऊन खेळायला लागत असे, तसेच ती हसून प्रतिसादही देत असे.
४. तिच्या हातात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र दिल्यावर ती त्या छायाचित्राकडे एकटक बघत रहात असे आणि त्याच्या समवेत खेळत असे.
५. मी स्वामिनीला श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीच्या दर्शनाला घेऊन गेले होते. त्या वेळी ती १० – १५ मिनिटे श्री गणेशाकडे एकटक पहात होती आणि त्याच्याकडे जाण्यासाठी झेप घेत होती. त्या वेळी ‘ती देवाशी बोलत आहे’, असे मला वाटले.’
– सोनाली
५. स्वभावदोष : हट्टीपणा’ – सौ. रेखा भास्कर खैरे
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १.१.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |