ज्या देशाचा मूळ उद्योग हा केवळ आतंकवाद असेल, तो देश कधीही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही ! – एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री
परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने आयोजित पुणे येथील आशिया आर्थिक संवाद
पुणे – भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील संबंधाच्या केंद्रस्थानी आतंकवाद हे महत्त्वाचे सूत्र आहे, हे नाकारता येणार नाही. ही एक मूलभूत समस्या आहे. याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येक देशाने आपल्या आर्थिक समस्यांवर मात करणे आवश्यक आहे; मात्र ज्या देशाचा मूळ उद्योग हा केवळ आतंकवाद असेल, तो देश कधीही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही. असा देश कधीच समृद्ध होऊ शकत नाही, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. पुणे येथे २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने ‘आशिया आर्थिक संवाद परिषदे’च्या सातव्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहेत. त्या वेळी ते बोलत होते. उद्घाटनाच्या वेळी एस्. जयशंकर यांच्यासह भूतानचे अर्थमंत्री ल्योनपो नामगे शेरिंग आणि मालदीवचे अर्थमंत्री इब्राहिम अमीर हेही उपस्थित होते. या परिषदेची संकल्पना ‘आशिया आणि जागतिक व्यवस्था’ अशी आहे.
(सौजन्य : ANI News)
परराष्ट्रमंत्री पुढे म्हणाले की, पाकिस्तानची अर्थव्यवस्था आज डबघाईला आली आहे. शेजारी देश अशा प्रकारे आर्थिक अडचणीत सापडणे कोणत्याही देशाच्या हिताचे नसते. मुळात पाकिस्तानच्या दुर्दशेला स्वत: पाकिस्तानच उत्तरदायी आहे.
या वेळी त्यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसह विविध सूत्रांवर भाष्य केले.