१२ गायी मृत्यूमुखी पडल्या असून अन्य गायींवर उपचार चालू ! – वाय.ए. पठाण, जिल्हा उपायुक्त, पशूसंवर्धन, कोल्हापूर
पंचमहाभूत लोकोत्सवात गायी मृत झाल्याचे प्रकरण !
कोल्हापूर – पंचमहाभूत लोकोत्सवात १२ गायी दगावल्या आहेत. विषबाधा झालेल्या गायींवर २२ पशूवैद्य आणि ३० कर्मचारी उपचार करत आहेत, अशी माहिती पशूसंवर्धनचे जिल्हा उपायुक्त वाय.ए. पठाण यांनी दिली आहे.
गोप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नागरिक यांच्या प्रतिक्रिया
१. समस्त हिंदु परिवार आणि माता-भगिनी कणेरी मठासमवेत ! – आशिष लोखंडे, शहर कार्यवाह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि समस्त धारकरी समूह कोल्हापूर
लोकोत्सवाच्या कालावधीत गायी मृत झाल्याचा प्रकार हा दुर्दैवी आहे. अशा कठीण प्रसंगी समस्त हिंदु परिवार आणि माता-भगिनी कणेरी मठासमवेत आहेतच. मठातील अखंडपणे चालत असलेल्या सेवाकार्यातून लाखो गायींचे जीव वाचले आहेत, तसेच त्यांचे संगोपन होत आहे. मठाचे सेवाकार्य यापुढील काळातही आणखी जोमाने चालत राहील. याविषयी तिळमात्र शंका नाही.
२. लाखो लोकांना गायी आणि सेंद्रिय शेती यांची वाट दाखवणार्या स्वामीजींकडून असे काही घडणार नाही, याची निश्चिती आहे ! – गव्यर्षी नितेश ओझा, वेद खिल्लार गोशाळा, निमशिरगाव
लाखो लोकांना गायी आणि सेंद्रिय शेती यांची वाट दाखवणार्या स्वामीजींकडून असे काही घडणार नाही, याची निश्चिती आहे. ही एक दुर्दैवी दुर्घटना आहे. माझी कणेरी मठ आणि स्वामीजी यांच्याविषयी निष्ठा अटळ आहे.
३. सिद्धगिरी मठावरील उत्सवाला अपकीर्त करण्याचा प्रयत्न ! – प्रसाद गोसावी
सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवात कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा यांसह देशभरातून प्रतिदिन ७ ते ८ लाख लोक मठात येत आहेत. सुमारे ६५० एकर परिसरावर बघेल तिकडे लोकच लोक आहेत. १२ गायी मृत झालेल्या असतांना गायींच्या मृत्यूचा आकडा फुगवून सांगितला जात आहे. असे करून सिद्धगिरी मठावरील उत्सवाला अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले, तरी लोकांचा मठावर विश्वास असून उत्सवासाठी आणि मठात येणार्यांची संख्या वाढतच आहे.
गेली २५ वर्षे पशूवधगृहात नेणार्या गायी मठात सांभाळल्या जातात. अनेक भाकड गायी कोणतेही उत्पन्न नसतांना मठ सांभाळत आहे. दूध न देणार्या गायींचा सांभाळही कणेरी मठ करतो. मठातील गोशाळेतील एकही गाय कुपोषित दिसणार नाही. सर्व गायींची तशी काळजी घेतली जाते. देशभरातील सुमारे २२ देशी प्रजातींच्या सहस्रो गायी सांभाळल्या जातात. प्रत्येक मासाला मठ गायींच्या संगोपनावर कोट्यवधी रुपये व्यय करते.
ज्या गायींचे वासरू जन्माला आल्यावर गाय दूध देत नाही, त्या वासरालाही प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी दुसर्या गायीचे दूध स्वतःच्या हाताने पाजतात. प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी ज्या ज्या वेळी गोशाळेत जातात, त्या वेळी सर्व जनावरे त्यांच्या भोवती लगेच गोळा होतात, अगदी वात्सल्याने आपली काळजी घेणारी व्यक्ती म्हणून ते स्वामीजींना अगदी बिलगतात. स्वामीजींचा हात प्रत्येक जनावराच्या पाठीवरून फिरतांना त्या प्रत्येक गायीचा भाव पाहिला, तर गोपालनाविषयी कुणालाही प्रश्न पडणार नाही.