पंचमहाभूतांविषयी व्यापक जनजागृती आणि कृतीशील कार्यक्रम ही काळाची आवश्यकता !
|
कोल्हापूर – सध्या संपूर्ण सृष्टीमध्ये पंचतत्त्वांचे असंतुलन झाल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. पंचमहाभूतांवर मनुष्यासह सर्व प्राणीमात्रांचा समान अधिकार आहे. मनुष्याने स्वत:च्या ज्ञानाचा उपयोग पंचतत्त्वांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी करावा. निसर्गाच्या सानिध्यात राहून नैसर्गिक शेती करणे काळानुसार आवश्यक बनले आहे. नैसर्गिक शेतीची संपूर्ण व्याप्ती जाणून घेऊन ती प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न भारतियांनी वेळीच करायला हवा, असे प्रतिपादन भारतीय किसान संघाचे दिनेश कुलकर्णी यांनी केले. ते येथील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या सहाव्या दिवशी ‘पृथ्वीतत्त्व – किसान विशेष’ या चर्चासत्रात बोलत होते. या वेळी मान्यवर वक्त्यांनी उपस्थितांना संबोधित करतांना पंचमहाभूतांविषयी व्यापक जनजागृती आणि कृतीशील कार्यक्रम ही काळाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे हे होते, तर व्यासपिठावर श्री. नरेश सिरोही, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला, डॉ. ए.के. सिंह, डॉ. कौशिक बॅनर्जी, कर्नाटक येथील कृषी विश्व विद्यालयाचे डॉ. एच्.बी. बबलाड, मुंबई येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल पाटील-म्हात्रे, पंजाब येथील संत गुरमित सिंह, स्वामी विमशविंद आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी कर्नाटक सरकारच्या वक्फ, हज आणि धर्मादायमंत्री शशीकला जोल्ले, आमदार सुनील शिंदे, विश्व हिंदु परिषदेचे क्षेत्रीय संघटनमंत्री श्रीरंग राजे यांच्यासह विविध मठ-मंदिरांचे साधुगण, पर्यावरण कला-क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संत परोपकारी असल्याने ते पर्यावरणावर प्रेम करू शकतात. त्यामुळे संतांचा आशीर्वाद घ्या. प्रदूषण निर्माण करणार्या आधुनिकतेला विरोध करा, असे मत या वेळी संत गुरमित सिंह यांनी मांडले, तर स्वामी विमशविंद म्हणाले, ‘‘ईश्वराच्या परमकृपेमुळे आरोग्यदायी शरीर लाभले आहे. त्यामुळे शास्त्र समजून आचरण करा.’’
महोत्सवातील पर्यावरणाचा यज्ञ प्रत्येकाने अनुभवायला हवा ! – शीतल पाटील-म्हात्रे, माजी नगरसेविका, शिवसेना, मुंबई
आपण ज्या पद्धतीने स्वत:च्या संपत्तीचे जतन करतो त्याप्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पंचमहाभूत लोकोत्सवाच्या माध्यमातून चालू असलेला पर्यावरणाचा यज्ञ प्रत्येकाने अनुभवायला हवा. पुढील पिढीला पंचमहाभूतांचे महत्त्व समजावे यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरेल. असे कार्यक्रम प्रतिवर्षी व्हायला हवेत.