विनायक दामोदर सावरकर : एक स्वातंत्र्यवीर जो देशभक्तीसाठी दोषी ठरला !
आज २६ फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा (दिनांकानुसार) स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने…
‘अत्यंत आदरणीय असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अत्यंत क्रूरपणे अपमान केला जातो. सावरकर हे लेखक, कवी, विचारवंत आणि राष्ट्र्रवादी तत्त्वज्ञ होते. ते भारतासाठी वचनबद्ध होते; परंतु कटकारस्थान रचून त्यांच्या देशभक्तीवर आरोप करण्यात आले. त्यांचे जीवन संघर्ष, त्याग, दुःख आणि अनपेक्षित चढउतार यांनी भरलेले होते. त्यांच्याविषयी बहुतेक लोकांना अगदी अल्प माहिती आहे. या देशात ज्यांना सर्वाधिक आदर मिळायला हवा होता, त्यांची पदोपदी मानहानी करण्यात आली आणि इतिहासाच्या एका कचराकुंडीत टाकून देण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला.
१. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विद्यार्थी वयात सार्वजनिक जीवनात प्रवेश करणे
विनायक सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ या दिवशी नाशिकजवळील भगूर येथे झाला. ते १० वर्षांचे असतांना कॉलरामुळे त्यांच्या आईला देवाज्ञा झाली आणि ते १६ वर्षांचे असतांना प्लेगमुळे त्यांचे वडील गेले. वर्ष १८८९ मध्ये भारताच्या संपूर्ण राजकीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी ३ मित्रांसह ‘मित्र मेळा’ नावाची संस्था चालू केली. तिचे वर्ष १९०४ मध्ये ‘अभिनव भारत’मध्ये रूपांतर झाले. या संघटनेच्या शाखा इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, हाँगकाँग, सिंगापूर आणि ब्रह्मदेश या देशांतही होत्या.
सावरकर हे बंगालच्या फाळणीचे कट्टर विरोधक आणि स्वदेशीचे प्रवर्तक असलेले पहिले भारतीय होते, ज्यांनी सर्व देशवासियांना विदेशी कपडे अन् वस्तू खरेदी करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ऑक्टोबर १९०५ मध्ये दसर्याच्या दिवशी विदेशी कपड्यांची होळी करण्याचे आवाहन केले.
२. सावरकर उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना
देशभक्त श्यामजी कृष्ण वर्मा यांनी युरोपमध्ये शिक्षण घेऊ इच्छिणार्या भारतियांसाठी शिष्यवृत्ती चालू केली होती. त्यासाठी सावरकर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शिफारसीने अर्ज केला. वयाच्या २२ व्या वर्षी ते मुंबई विद्यापिठातून ‘एल्.एल्.बी.’ झाले. त्यानंतर ९ जून १९०६ या दिवशी ते ‘एस्.एस्. पर्शिया’ या जहाजाने मुंबईहून लंडनला गेले. त्यांनी प्रवासातील वेळ सहकारी तरुण भारतीय विद्यार्थ्यांना देशाच्या राजकारणाविषयी शिक्षित आणि त्यांचे प्रबोधन करण्यात घालवला.
त्या वेळी भारतात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून ब्रिटीश समिती, दादाभाई नौरोजींची ‘लंडन इंडियन सोसायटी’ आणि देशभक्त श्यामजी कृष्ण वर्मा यांची ‘इंडियन होमरूल सोसायटी’ या ३ प्रमुख संघटना कार्यरत होत्या. दादाभाई आणि श्यामजी यांचे उद्दिष्ट ‘स्वशासन’ (ब्रिटीश साम्राज्याखालील स्वराज्य किंवा स्वायत्तता अथवा गृहराज्य) हे होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि दादाभाई यांनी ब्रिटीश राजवटीशी निष्ठा ठेवण्याची शपथ घेतली. त्यांच्यापैकी कुणीही सशस्त्र क्रांतीला पाठिंबा दिला नाही.
३. ब्रिटिशांच्या विरोधात जागतिक स्तरावर आघाडी उभी करण्याचा सावरकर यांचा प्रयत्न
वीर सावरकर यांना बॅरिस्टर व्हायचे होते आणि बॅरिस्टर बनून त्यांना भारतीय समाजाला साहाय्य करायचे होते. लंडनमधील श्रीमंत आणि प्रभावशाली भारतियांना आय.सी.एस्., आय.एम्.एस्., बार लॉ आदी परीक्षा उत्तीर्ण करून स्वातंत्र्याच्या कार्यात साहाय्य करण्यासाठी उच्च पदे मिळवायची होती. सावरकर यांनी ब्रिटिशांसमोर घोषित केले होते, ‘भारतियांना स्वातंत्र्य हवे आहे, सुधारणा नको.’ सावरकर यांनी स्थापन केलेल्या ‘अभिनव भारत’च्या सदस्यांना ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध एकत्रितपणे बंड करायचे होते. त्यामुळे ब्रिटीशविरोधी संयुक्त आघाडी सिद्ध करण्यासाठी ते सतत रशिया, आयर्लंड, इजिप्त आणि चीन येथील क्रांतीकारी शक्तींच्या संपर्कात होते.
देशभक्ती जागवणारे लेख लिहिणे, छापणे आणि प्रकाशित करणे; राष्ट्रीय शिक्षण देणे अन् स्वदेशीचा प्रचार करणे, शस्त्रास्त्रे खरेदी करणे आणि साठवणे, पुस्तके अन् अन्य रिकाम्या खोक्यांद्वारे भारतात बंदुकांची तस्करी करणे, बाँब बनवण्यास शिकणे, लहान बाँब बनवणे, कारखाने उघडणे, सैन्यात देशभक्ती आणि राजकारण नेणे या प्रकारचे कार्य ते करत होते. ते बंडखोरीच्या संधीची वाट पहात सशस्त्र क्रांतीची बीजे पेरत होते. कपडे आणि यंत्रसामुग्री यांच्या साहित्यात लपवून ठेवलेली सावरकर यांची क्रांतीकारी पुस्तके पंजाबमधील १०-१५ केंद्रांवर नियमितपणे पाठवली जात होती. तेथे ती गुरुमुखी आणि पंजाबी या भाषांमध्ये अनुवादित करून सैनिकांमध्ये वितरित केली गेली.
४. क्रांतीकारकांनी ब्रिटीश अधिकार्यांवर मात करून अनेक मोहिमा यशस्वी करणे
लंडनला पोचण्यापूर्वीच त्यांनी त्यांच्या राजकीय घडामोडींचा तपशीलवार अहवाल पाठवला होता. त्यामुळे ब्रिटीश अधिकार्यांनी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले होते. गुप्त पोलीस त्यांच्या सार्वजनिक सभांना नेहमी उपस्थित रहात असत. ब्रिटीश प्रशासनाची गुन्हे अन्वेषण शाखा (सीआयडी) व्यापक आणि साधनसंपन्न असली, तरी राष्ट्र्रप्रेमाने ओतप्रोत असलेल्या ‘अभिनव भारत’च्या क्रांतीकारकांनी त्यांच्या कौशल्याने त्यांना मागे टाकले आणि अनेक मोहिमा यशस्वीरित्या राबवल्या. खुदीराम बोस (मृत्यू वर्ष १९०८), मदनलाल धिंग्रा (मृत्यू वर्ष १९०९), अनंत कान्हेरे (मृत्यू वर्ष १९१०), भगतसिंह (मृत्यू वर्ष १९३१) आणि उधमसिंह (मृत्यू वर्ष १९४०) यांनी विविध क्रांतीकारी कार्ये केली. इंग्लंडमध्ये रहात नसतांनाही अनेक वेळा सावरकर यांचे नाव प्रमुख योजनाकार म्हणून पुढे येत असे. मोहनदास गांधी यांच्या हत्येच्या कटातही सावरकर यांचे नाव पुढे आले होते; मात्र त्यात ते निर्दोष सिद्ध झाले. ब्रिटिशांची ‘गुन्हे अन्वेषण शाखा, मुंबई’ने वर्ष १९४७ पर्यंत सावरकर यांच्याविषयीची एक गुप्त धारिका (फाईल) ठेवली होती.
५. वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाची पुनरावृत्ती करण्याची योजना
लंडनमधून भारताच्या कारभारावर नियंत्रण ठेवणार्या इंडिया ऑफिसमध्ये वर्ष १८५७ च्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धाशी संबंधित विस्तृत कागदपत्रे असलेले वाचनालय होते. सावरकर यांनी इंडिया हाऊसचे व्यवस्थापन पहाणार्या मुखर्जी यांच्या इंग्रज पत्नीच्या माध्यमातून इंडिया ऑफिस वाचनालयामध्ये वाचकांसाठीचे प्रवेशपत्र मिळवले. सावरकर यांनी कायद्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून १८५७ च्या बंडावरील प्रत्येक कागदपत्रावर तपशीलवार संशोधन केले आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या ५० व्या वर्षी मे १९०८ मध्ये १८५७ च्या उठावाची पुनरावृत्ती करण्याची योजना आखली; पण ‘अभिनव भारत’मध्ये घुसखोरी करणार्या ब्रिटीश गुप्तहेर संघटनेने इंग्रज सरकारला याची माहिती दिली.
६. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जगप्रसिद्ध मार्सेलिसची उडी !
डिसेंबर १९०९ मध्ये सावरकर यांचे भाऊ नारायणराव यांना अटक झाली. त्यानंतर वर्ष १९१० च्या प्रारंभी सावरकर लंडनहून फ्रान्सची राजधानी पॅरिसला निघून गेले; पण त्यांची रेल्वेगाडी व्हिक्टोरिया स्थानकावर येताच त्यांना अटक करण्यात आली. १३ मार्च १९१० या दिवशी सावरकर यांना राजाविरुद्ध युद्ध पुकारणे, नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांची हत्या करणे, तसेच भारत आणि लंडन येथे देशद्रोही भाषणे करणे यांप्रकरणी ‘फ्युजिटिव्ह कन्व्हिक्ट ॲक्ट्स ऑफ १८८१’ अंतर्गत लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्यांना जामीन नाकारण्यात आला आणि ब्रिटीश राजवटीला वचनबद्ध असलेल्या उच्च न्यायालयाने १७ जून या दिवशी त्यांना खटल्यासाठी भारतात पाठवण्याचा निवाडा दिला. सावरकर यांना ‘एस्.एस्. मोरिया’ या जहाजाने मुंबईला नेले जात असतांना ८ जुलै या दिवशी त्यांचे जहाज मार्सेलिस बंदरात नांगरले होते. तेव्हा सावरकर जहाजातून उडी मारून जवळच्या फ्रेंच बेटावर पोहून गेले. तेथे त्यांना ब्रिटीश पोलिसांनी अटक केली. अर्थात् हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याने नंतर फ्रान्सने इंग्लंडवर खटला भरला; परंतु त्या दिवशी त्यांना परत जहाजात आणण्यात आले.
मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील खटला सप्टेंबर १९१० मध्ये ज्युरी (न्यायाधिशांचे मंडळ) किंवा अपील यांच्या अधिकाराखेरीज खटल्यांच्या सुनावणीसाठी नेमलेल्या विशेष न्यायाधिकरणाखाली घेण्यात आला. या खटल्यासाठी त्यांना येरवडा येथून डोंगरी कारागृहात स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर २३ डिसेंबर १९१० या दिवशी विशेष न्यायाधिकरणाने त्यांना शिक्षा घोषित केली. त्यांच्यावरील खटला हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रलंबित असतांनाही ही शिक्षा घोषित झाली. २३ जानेवारी १९११ या दिवशी सावरकरांवर नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांच्या हत्येप्रकरणी दुसरा गुन्हा नोंदवण्यात आला. ३० जानेवारी १९११ या दिवशी त्यांना दोन जन्मठेपांची, म्हणजे ५० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
७. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कारागृहातील अत्यंत कष्टप्रद जीवन
सावरकर यांची संपूर्ण जगात वर्षभर चर्चा होती. सर हेन्री कॉटन (मुंबई वर्ष १९०४ मध्ये पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष) यांना आशा होती की, आंतरराष्ट्रीय न्यायालय त्यांना फ्रान्सला परत देईल; पण सावरकरांना देशद्रोही ठरवणे, हे अनेकांसाठी कातडी आणि प्रतिष्ठा वाचवण्याचे साधन बनले. एका अँग्लो-इंडियन वृत्तपत्राने लिहिले, ‘शेवटी त्यांनी त्यांचे नशीब गाठले आहे.’ काँग्रेसचे विल्यम वेडरबर्न आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ‘सावरकरांशी त्यांचा काहीही संबंध नाही’, असे घोषित केले.
सावरकर यांना कारागृहात ‘ओकुम’ (गुंडाळलेल्या दोरीचे तुकडे करणे, ते वळवणे आणि पुन्हा त्याचे धागे सिद्ध करणे) करण्याचे काम दिले. या अथक परिश्रमामुळे त्यांच्या हाताला भेगा आणि फोड आले. त्यामुळे त्यातून रक्त वाहू लागले. त्यानंतर त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहातून डोंगरी, नंतर पुढे डोंगरी कारागृहातून भायखळा आणि शेवटी ठाणे येथे स्थलांतरित करण्यात आले.
तेथे त्यांना ज्वारीची कोरडी भाकरी देण्यात आली, जी ते कशीतरी पाण्याने खाण्याचा प्रयत्न करायचे. त्यांनी दूध मागितले, तेव्हा त्यांना ‘दूध नाही, बायबल देईन’, असे उत्तर मिळाले.
त्यांची लोखंडी पेटी, कपडे, पुस्तके, त्यांचे लिखाण, त्यांची भगवद्गीता आणि चष्मा अशी त्यांची २७ सहस्र रुपयांची मालमत्ता अन् त्यांच्या सासरची ६ सहस्र ७२५ रुपयांची मालमत्ता, तसेच त्यांच्या चुलीवरील स्वयंपाकाची भांडी आदी सर्व सार्वजनिक लिलावाने विकले जाणार होते. हे साहित्य विदेशी लोक लूट म्हणून खरेदी करतील; पण त्याऐवजी किमान काही हिंदू आणि त्यांची मुले त्या साहित्याचा वापर करू शकतील, या हेतूने सावरकर यांनी त्यांच्या हिंदु वॉर्डनला (कारागृहाची व्यवस्था पहाणार्या आणि शिस्त राखणार्या अधिकार्याला) ते खरेदी करण्याची विनंती केली. वीर सावरकरांसमोर त्यांच्या अंदमानातील कारावासाची कथा कुणीही नोंदवली नाही.
८. अंदमानातील ‘अशांततेचे जनक’ आणि तेथे केलेले कार्य !
वीर सावरकरांनी ‘२५ वर्षांची दोन जन्मठेपांची शिक्षा एकाच वेळी चालवावी’, असे अपील सादर केले होते. त्यांनी दंड संहितेतील कलमे उद्धृत केली. ‘आजीवन कारावास हा माणसाच्या जीवनातील सक्रीय कार्याचा कालावधी होता, जो इंग्लंडमध्ये १४ वर्षे आणि भारतात २५ वर्षे होता’; परंतु सावरकर यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून अशी शिक्षा कधीही दिली गेली नसावी. ती शिक्षा ५० वर्षांच्या कठोर परिश्रमासहीत संपूर्ण कालावधी संपेपर्यंत सावरकरांना देण्यात आली. यानंतर बेड्या बांधलेल्या सावरकर यांना मद्रासला जाणार्या रेल्वेगाडीत बसवण्यात आले. तेथून त्यांना ‘एस्.एस्. महाराजा’ या जहाजावर ५० बंदीवान आणि चोर यांच्यासमवेत अंदमानला नेण्यात आले. त्या जहाजाची मर्यादा केवळ २५-३० जणच बसू शकतील एवढी होती. त्यामुळे झोपतांना त्यांचे पाय एकमेकांच्या डोक्याला स्पर्श करायचे. त्यांना नित्यकर्मासाठी दिवसभरात केवळ अर्धा घंटा जहाजाच्या डेकवर नेले जात असे.
पोर्ट ब्लेअरमध्ये बलुची आणि पठाण कैद्यांसाठी मुसलमान वॉर्डन होते; परंतु हिंदु कैद्यांना मुसलमान वॉर्डन आणि सहकारी मुसलमान कैदी यांचा त्रास सहन करावा लागला. संपावर गेलेल्या राजकीय कैद्यांना हातकड्या, एकांतवास, आठवडाभराची शिक्षा, साखळदंड घालून त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कांजी (तांदळाचे पाणी) प्यायला दिली जायची.
सावरकरांना राजकीय बंदीवानाचा दर्जा नाकारण्यात आला आणि त्यांना सिल्व्हर जेलमधील ब्लॉक क्रमांक ७ मधील एकाकी कोठडीत ठेवण्यात आले. पुढे नंतर दिवसभर ग्राईंडिंग मिलवर जनावराच्या जागेवर उभे राहून कोलू ओढून ३० पौंड खोबरेल तेल काढण्यास सांगितले जायचे, तेही केवळ २ कप पाणी पिऊन ! सावरकर यांच्या १४ वर्षांच्या कारावासात त्यांनी भिंतींवर लिखाण केले. प्रतिवर्षी भिंती रंगवल्या गेल्या होत्या. हिंदु कैद्यांना व्याख्यान दिले. कारागृहातील एका खोलीतील भिंतींवर ‘कमला’ कविता लिहिली होती. एका सेलमध्ये त्यांनी राजकीय अर्थव्यवस्थेच्या व्याख्या लिहिल्या.
अंदमानचे कारागृहाधिकारी बॅरी यांनी म्हटले, ‘‘सावरकर हे अंदमानातील अशांततेचे जनक आहेत. त्यांना कोणतीही दया दाखवू नये.’’ सावरकर यांनी त्यांच्या जेलरला सांगितले की, ‘‘एखाद्याच्या राष्ट्रीय सन्मानावर होणारी घृणास्पद आक्रमणे शांतपणे सहन करणे, हा निवळ भ्याडपणा आहे.’’
९. अंदमानमध्ये सक्तीच्या धर्मांतराला तीव्र विरोध
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानमध्ये सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवला. तरुण हिंदु बंदीवानांचे धर्मांतर करण्यासाठी त्यांना मुसलमान वॉर्डन आणि जमादार मारहाण करायचे, तसेच त्यांना तंबाखू आणि मिठाई यांचेही आमीष दाखवायचे. ज्यांनी यासाठी सहमती दिली, त्यांची सुंता करून मुसलमान बंदीवानांना भोजन देण्यात आले. वीर सावरकर यांनी वर्ष १९१३ मध्ये अंदमानमध्ये सक्तीच्या धर्मांतराची पहिली तक्रार प्रविष्ट केली आणि कारागृहात प्रतिकार अन् शुद्धीकरण यांची मोहीम चालू केली. ही मोहीम वर्ष १९२२ मध्ये सुटका होईपर्यंत चालली.
सिल्व्हर कारागृहाच्या नियमांनुसार बंदीवानांना ६ मास ते १ वर्षाच्या आत सोडले जात होते. त्यात सर्वाधिक कालावधी ३ वर्षांचा होता. त्यानंतर ते कारागृहातून बाहेर पडण्यास, घरे बांधण्यासाठी आणि अंदमानमध्ये उदरनिर्वाह करण्यास मोकळे होते; पण अशी कोणतीही सवलत सावरकरांना ५० वर्षांच्या कारावासानंतरही देण्यात आली नाही.
१०. क्रांतीकारकांच्या सुटकेला पाठिंबा
मे १९१४ मध्ये १८५७ च्या बंडाप्रमाणे एक कट रचून सरकार विरुद्ध बंड करून सैन्यासमवेत क्रांतीची योजना बनवली गेली. त्याच वेळी जर्मन पाणबुड्या या बेटांवर आक्रमण करण्यासाठी अंदमानच्या समुद्रात सिद्धता करत होत्या. या काळात सावरकर यांनी बंदीवानांच्या वतीने अनेक याचिका प्रविष्ट केल्या आणि विनवणी करणारी पत्रे लिहिली. ही त्या काळातील एक सामान्य प्रथा होती. इतर कैद्यांसमवेत सशर्त किंवा त्याखेरीज सोडले जाणे अथवा स्वयंसेवक म्हणून नावनोंदणी करणे, सर्व राजकीय बंदीवानांच्या स्वातंत्र्याचे त्याचे उद्दिष्ट स्पष्टपणे नमूद करणे आदी कार्य केले. स्वतःला सोडले जाणार नसले, तरीही त्यांनी हे केले. सावरकरांनी याचिका केली, ‘‘जर मला भारतात पाऊल ठेवल्यावर सोडले जाणार नसले, तरी संपूर्ण कारावास भोगण्यासाठी मी अंदमानमध्ये रहाणे पसंत करतो. मी माझी १० वर्षे कारावासात पूर्ण केली आहेत. मला अंदमानमध्ये मुक्तपणे स्थायिक व्हायचे आहे. वैयक्तिकरित्या मला अनुमती दिली पाहिजे, ज्या तिकिटावर माझा हक्क होता.’’
११. कारावासात असतांना आंदोलने करणे
सावरकर यांनी त्यांच्या शिक्षेच्या कालावधीत कारावासात ४ आंदोलने केली. शेवटचे आंदोलन वर्ष १९१४ मध्ये केले. ते त्यांच्यासमवेत काही बंदीवानांना कह्यात घेऊन संपले. चौथे आंदोलन घोषित केले, तेव्हा सावरकर यांनी ६ एप्रिल १९२० या दिवशी मुक्त झालेल्या राजकीय बंदीवानांसमवेत एडविन माँटेग्यू यांना एक खुले पत्र पाठवले. त्यात सहस्रो स्वाक्षर्यांसह पाठिंबा देण्याच्या सूचना होत्या, तसेच क्रांतीकारकांच्या सुटकेच्या समर्थनार्थ सभा घेण्याच्याही सूचना होत्या. या काळातच त्यांचे थोरले बंधू नारायणराव हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वार्षिक पत्रांच्या प्रती सिद्ध करत होते (प्रतिवर्षी केवळ एका खुल्या पत्राची अनुमती होती) आणि त्या सर्व नेत्यांना पाठवत होते. काहींनी त्या स्थानिक वृत्तपत्रांमध्येही प्रकाशित केल्या होत्या. लोकमान्य टिळक यांनीही सावरकर यांच्या सुटकेसाठी माँटेग्यू यांना पत्र लिहिले होते.
१२. अंदमानमध्ये भूखंड निर्माण करून संपूर्ण परिसर खासगी संपत्तीमध्ये पालटण्याची इंग्रजांची योजना
त्याच सुमारास अंदमान कारागृहामध्ये सावरकर हे बंदीवान भान सिंह यांच्यावरील खटला आणि कारागृहातील अनुभव यांविषयी कार्ड्यू समितीला माहिती देत होते. सावरकरांसह ५ राजकीय बंदीवानांच्या लेखी साक्षी घेण्यात आल्या. सावरकर यांनी याचिकेत ‘फौजदारी कायद्याचे सार, इंग्लंडमधील बोर्स्टल प्रणालीपासून कारागृह प्रशासनाची व्यवस्था, युरोप खंडावर अमेरिकेत केलेले प्रयोग आणि अंदमानच्या वसाहतींना उत्तम अभियांत्रिकी अन् स्वच्छतेसह विकसित करण्याचे अन् त्यांना ‘डिड’मध्ये (करारामध्ये) पालटण्याचा प्रस्ताव’, या सर्वांचा समावेश आहे.
कॅप्टन ब्लेअर (पोर्ट ब्लेअर हे नाव त्याच्यावरून पडले आहे.) आणि अभियंता कोलब्रूक यांनी वर्ष १७६६ मध्ये अंदमानला नियमित ‘सेटलमेंट’मध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला होता. वर्ष १८५७ च्या बंडखोरांनाही येथे पाठवण्यात आले होते. अंदमानात पाठवलेल्या कैद्यांची संख्या अल्प होत असतांना ब्रिटिशांनी तेथील भूखंड विक्रीसाठी देऊन, तसेच नारळ आणि सुपारी यांची लागवड करून संपूर्ण परिसर खासगी संपत्तीमध्ये पालटण्याची योजना आखली. त्याचा ख्रिस्ती प्रचारकांनी पुरेपूर लाभ घेतला; पण भारतीय व्यापारी आणि शेतकरी यांना लांब ठेवले गेले.
१३. म. गांधींनी सावरकर यांच्या सुटकेचे आवाहन कचराकुंडीत फेकणे
‘नॅशनल युनियन ऑफ बाँबे’ने राजकीय बंदीवानांच्या सुटकेसाठी ७० सहस्र लोकांनी स्वाक्षरी केलेली याचिका सादर केली आणि त्यात सावरकर बंधूंचा विशेष उल्लेख केला. म. गांधींनी सावरकरांच्या सुटकेचे आवाहन कचराकुंडीत फेकून दिले. असे म्हटले जाते की, ‘सावरकर कोण होते ?’, हे गांधींना ठाऊक नव्हते आणि नेहरूंनी त्यांच्या सुटकेचे निवेदन फाडले, असे समजले जाते.
ऑगस्टमध्ये लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर वर्ष १९२१ च्या प्रारंभी गांधी आणि त्यांची खिलाफत चळवळ अचानक उदयास आली. सावरकर बंधूंना २ मे १९२१ या दिवशी भारतात पाठवले होते. नंतर त्यांना रत्नागिरीच्या कारागृहात ठेवण्यात आले. तेथून त्यांना येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानांतरित करण्यात आले. वर्ष १९२३ मध्ये तिसर्या रत्नागिरी राजकीय परिषदेमध्ये एका ठरावाच्या माध्यमातून त्यांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी करण्यात आली.
१४. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु धर्मातील पुनर्प्रवेशाचे कार्य करणे
६ जानेवारी १९२४ या दिवशी वीर सावरकर यांची येरवडा कारागृहातून सशर्त सुटका झाली. मे १९२४ च्या सुमारास रत्नागिरीत प्लेगचा संसर्ग वाढला आणि सावरकर यांना नाशिकला जाण्याची अनुमती मिळाली. तेथे त्यांनी हिंदूंच्या उन्नतीसाठी कार्य केले. त्यांनी सरकारी अनुमतीने भगूरला भेट दिली; परंतु त्यांना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे त्यांना रत्नागिरीला परतावे लागले. नोव्हेंबर १९२४ मध्ये रत्नागिरीला परतत असतांना ते मुंबई येथे थांबले. तेथे खिलाफत चळवळीचे शौकत अली यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांना हिंदु संघटनांचे आंदोलन थांबवण्यास सांगितले. त्यावर सावरकर म्हणाले, ‘‘जोपर्यंत मुसलमान संघटना चालू रहातील आणि हिंदूंचे धर्मांतर चालू राहील, तोपर्यंत मुसलमानांचा हिंदु धर्मातील पुनर्प्रवेशही अखंड चालू राहील.’’ ४ जानेवारी १९३७ पर्यंत त्यांची नजरकैद वाढवण्यात आली आणि यथावकाश पुढे त्यांची सुटका झाली.
१ ऑगस्ट १९३७ या दिवशी वीर सावरकर प्रथम लोकमान्य टिळक यांच्या ‘लोकशाही स्वराज पक्षा’मध्ये आणि नंतर हिंदु महासभेत सहभागी झाले. २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी वयाच्या ८३ व्या वर्षी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जीवनयात्रा संपवली.’
लेखिका : सौ. मीनाक्षी शरण, अध्यक्षा, अयोध्या फाऊंडेशन, इंदूर, मध्यप्रदेश. (२०.२.२०२३)