गुलामीच्या खुणा… !
वर्ष १९४७ मध्ये इंग्रज स्थुलातून भारत सोडून गेले खरे; पण त्यांच्या प्रथा, परंपरा, पद्धती, प्रशासकीय व्यवस्थेतील नियम, इतकेच नव्हे, तर कायदेही येथे ठेवून गेले. स्वातंत्र्यानंतरही हे सारे आपल्या इतके अंगवळणी पडले की, आताही जणू ‘ते आपलेच आहेत’, असे आपल्याला वाटते. चहा पिणे, आसंदी आणि पटल यांवर बसून चमच्याने आहार घेणे इथपासून विवाहाचा स्वागतसमारंभ (रिसेप्शन) साजरा करणे येथपर्यंत; रुग्णालये, महाविद्यालये, रस्ते, स्थानके यांच्या नावापासून सार्वजनिक सुट्ट्यांपर्यंत; प्रशासकीय ‘बाबूं’पासून कारकून सिद्ध करण्याच्या शिक्षणापर्यंत; सैन्यातील परेड अन् अन्य मान-सन्मानाच्या पद्धतींपासून राज्यघटनेतील कायद्यांपर्यंत अनेक गोष्टी आपण इंग्रजांची सत्ता गेल्यावरही जशाच्या तशा चालू ठेवल्या. आत्मसन्मान गमावलेल्या आणि पाश्चात्त्यांच्या प्रथांना ‘उच्च’ मानणार्या नेहरू अन् काँग्रेस सरकारच्या कुसंस्कृतीत सर्वाेच्च मूल्ये जपणारी सनातन भारतीय परंपरा पूर्णतःच दुर्लक्षली गेली. राज्यघटनेच्या पहिल्या पानावर प्रभु श्रीरामाचे चित्र ठेवण्यापर्यंतच संस्कृतीपालनाची मर्यादा राहिली; पण खर्या अर्थाने रामराज्य येण्यासाठी राज्यकारभारापर्यंत ती पोचली नाही.
मोदी शासन सत्तेत आल्यावर राष्ट्र आणि धर्म निष्ठ जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या. आता काही वर्षांनंतर स्वसंस्कृतीचे पुनरुत्थान होण्यास शासकीय स्तरावर हळूहळू चालना मिळत असून त्याला मूर्त रूप येण्यास प्रारंभ झाला आहे. राजधानीतील रस्ते, तसेच देशातील शहरे आणि स्थानके यांपैकी ज्यांची मूळ नावे इतिहासात पालटली आहेत, त्यांना ती परत मिळण्यास आता आरंभ झाला. अंदमान-निकोबार द्वीपसमुहातील ३ बेटांची इंग्रजी नावे पालटून ‘शहीद’, ‘स्वराज्य’ आणि ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ अशी करण्यात आली. पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या रस्त्याचे नावही ‘७ रेसकोर्स’ वरून ‘७ लोककल्याण मार्ग’ झाले. आतापर्यंत इंग्रजांच्या वेळचे कालबाह्य दीड सहस्र कायदे आणि नियम मोदी शासनाने पालटले की, जे इंग्रजांनी त्यांच्या लाभाकरता निर्माण केले होते अन् ते भारतियांवर अन्याय करणारे होते. त्यानंतर पाठ्यक्रमातही आता सनातन भारतीय परंपरेतील ज्ञान-विज्ञानासह अनेक गोष्टी येऊ घातल्या आहेत आणि देशातील पराक्रमी राष्ट्रपुरुषांचा सत्य इतिहासही पुढे येऊ लागला आहे. मागील वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी जनतेपुढे ५ संकल्प ठेवले. त्यांपैकी ‘गुलामीच्या प्रत्येक विचारापासून मुक्ती’ आणि ‘परंपरांचा अभिमान’, हे दोन संकल्प होते. एकमेकांना पूरक असे दोन्ही संकल्प घोषित झाल्यावर भारतातील गुलामीच्या अनेक खुणा पुसण्यास वेगाने चालना मिळाली.
सैन्यदलांतील पालट
मोदी शासन सत्तेत आल्यानंतर लगेचच, म्हणजे वर्ष २०१५ मधील प्रजासत्ताकदिन कार्यक्रमाच्या समाप्तीमध्ये सैन्याचा ‘बिटिंग दि रिट्रीट’ हा कार्यक्रम सादर होतो. या संगीत कार्यक्रमात वाजवली जाणारी पाश्चात्त्य वाद्ये काढून त्या जागी पारंपरिक भारतीय वाद्यांच्या संगीताचा आरंभ करण्यात आला आणि या वर्षी त्यातील ख्रिस्त्यांचे प्रार्थनागीत काढून त्या जागी ‘मेरे वतन के लोगो’ या प्रसिद्ध देशभक्तीपर गीताची धून वाजवण्यास आरंभ झाला. मागील वर्षीच्या सप्टेंबर मासात भारतीय नौसेनेचा इंग्रजांच्या वेळचा ‘सेंट जॉर्जचा क्रॉस’ असलेला ध्वज पालटून त्याजागी भारताचे पहिले आरमार उभारणार्या छत्रपतींच्या राजमुद्रेचा आकार, तिरंगा आणि अशोकचिन्ह असे अंकित केलेला नवा ध्वज निर्माण करण्यात आला. आता सैन्यातील आणखी एका ‘इंग्रजी पद्धती’ला बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. सैन्याच्या सार्वजनिक किंवा वरिष्ठ अधिकार्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात घोड्यांची बग्गी वापरण्याची प्रथा इंग्रजांपासून चालत आली होती. ती आता बंद करण्यात येणार असून त्या घोड्यांचा उपयोग सैन्यात केला जाणार आहे. तसेच सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात ‘पाईप बँड’ या वाद्याचा उपयोग केला जायचा. ही प्रथाही बंद करण्याचा आदेश शासनाने काढला आहे.
…पुसणेच श्रेयस्कर !
अशा पालट करण्याच्या गोष्टी वरकरणी छोट्या वाटल्या, तरी त्या तशा नसतात. त्या आपली धर्मसंस्कृती, परंपरा, राष्ट्रपुरुषांचा पराक्रम आणि त्यातून निर्माण झालेला धर्म अन् राष्ट्र यांचा अभिमान आदींशी, आपल्या मातीशी, आपल्या भावना आणि संवेदना यांच्याशी निगडित असतात. जे इतिहास विसरतात, त्यांना भविष्य नसते. धर्मसंस्कृती आणि पराक्रमाचा इतिहास यांविषयीची अस्मिता ही पुढच्या पिढ्यांना अस्तित्वाच्या लढ्याची प्रेरणा देऊन त्यांचा उत्साह वृद्धींगत करत असते. जेव्हा शेकडो हिंदु राजांचा पराक्रम लपवून मोगल राजवटींचे उदात्तीकरण केले जाते, तेव्हा ‘भारत हा मोगलांचाच असल्यामुळे आजही त्यांचा देशावर प्रथम अधिकार आहे’, असे वातावरण निर्माण करणे सोपे होते. ही स्थिती जिथे वाढते, तिथून हिंदूंना केवळ पलायनच करावे लागते, असे नव्हे, तर त्यांच्या वंशविच्छेदाला आरंभ होतो. कुतूबमिनार हा मूळ ‘विष्णुस्तंभ’ आणि ताजमहाल ‘तेजोमहालय’ आहे, याचे ढळढळीत पुरावे असतांना अद्यापही त्या परकियांच्या कलाकृती म्हणून मिरवल्या जातात अन् काशीविश्वेश्वराचे शिवलिंग समोर दिसत असूनही त्यासाठी न्यायालयीन लढा द्यावा लागतो. आज दैनंदिन जीवनातील आहार, पोशाख, केशभूषा इथपासून आमच्या सर्व कला, साहित्य, संगीत या सर्वांवरच परकियांच्या कुसंस्कृतीचा इतका घट्ट पगडा आहे की, तीच आमची‘वृत्ती’ झाली आहे अन् त्यापासून आम्हाला वेगळे करणे कर्मकठीण होऊन बसले आहे. परकियांच्या अंधानुकरणाने आमची सर्वश्रेष्ठ संस्कृती झाकोळली गेली आहे. संस्कृत भाषा, आयुर्वेद आणि योगाभ्यास यांसारखी वैदिक शास्त्रे अन् धार्मिक कृती, विविध सनातन उपासनापद्धत आदींचे गुणगान पाश्चात्त्य करत आहेत. आता त्यांनी आपल्याला शिकवण्यापूर्वी आपणच प्रत्येक गोष्टीत ते अंगीकारणे श्रेयस्कर ठरेल. त्या दिशेने हळूहळू का होईना, एक एक पाऊल मोदी शासन उचलत आहे, हे स्वागतार्ह आहे !
भारत आणि तिची जनता यांच्यातील परकियांच्या गुलामीच्या खुणा पुसण्याचा शासनाचा प्रत्येक प्रयत्न स्वागतार्ह ! |