असात्त्विक अन् सात्त्विक पेय ग्रहण केल्याने (प्यायल्याने) व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर होणारा परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘आजकाल समाजात कृत्रिम शीतपेये (सॉफ्ट ड्रिंक्स्), बिअर, वाईन (दारू) यांसारखी असात्त्विक पेये ग्रहण करण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. काही लोक जेवतांनाही अशा प्रकारची पेये पितांना दिसून येतात. याउलट गायीचे दूध, शहाळ्याचे पाणी, फळांचा ताजा रस यांसारखी नैसर्गिक अन् सात्त्विक पेये ग्रहण करण्याकडे फारच कमी लोकांचा कल दिसून येतो. आपण जे अन्नपदार्थ किंवा पेय ग्रहण करतो त्यांचा परिणाम आपल्या सूक्ष्म ऊर्जेवर (‘ऑरा’वर) होत असतो.

‘व्यक्तीने असात्त्विक अन् सात्त्विक पेय ग्रहण केल्यावर तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

(व्यक्तीने असात्त्विक अन् सात्त्विक अन्नपदार्थ सेवन केल्यावर तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ? याविषयी केलेले संशोधन निराळ्या लेखात दिले आहे.)

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीतील प्रयोगांत एक स्त्री आणि एक पुरुष सहभागी झाले. या चाचणीत विविध प्रकारच्या पेयांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील स्त्री आणि पुरुष यांना प्रत्येक दिवशी एकेक पेय पिण्यास देण्यात आले. प्रत्येक दिवशी पेय पिण्यापूर्वी आणि पेय प्यायल्यानंतर त्या दोघांच्या चाचण्या करण्यात आल्या.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.


२. असात्त्विक पेय ग्रहण केल्याने चाचणीतील स्त्री आणि पुरुष यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ नकारात्मक परिणाम होणे, याउलट सात्त्विक पेय ग्रहण केल्याने त्यांच्यावर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे

असात्त्विक पेयांमध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा, तर सात्त्विक पेयांमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळून आली. असात्त्विक पेय ग्रहण केल्याने दोघांतील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात वाढली. त्यांनी सात्त्विक पेय ग्रहण केल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून झाली अन् त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

२ अ. चाचणीतील स्त्री आणि पुरुष यांनी म्हशीचे दूध ग्रहण केल्यावर त्यांच्यावर झालेले परिणाम : आजकाल बहुतांश लोक गायीच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध उपयोगात आणतात. ‘म्हशीचे दूध प्यायल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर काय परिणाम होतो?’, हे अभ्यासण्यासाठी एक प्रयोग करण्यात आला. याची निरीक्षणे पुढे दिली आहेत.

म्हशीच्या दुधात नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा आढळून आल्या. चाचणीतील दोघांनी म्हशीचे दूध प्यायल्यावर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा वाढली आणि सकारात्मक ऊर्जा थोडी अल्प झाली.

सौ. मधुरा धनंजय कर्वे

३. निष्कर्ष

फळाचा रस, शहाळ्याचे पाणी अन् गायीचे दूध यांसारखी सात्त्विक पेये ग्रहण केल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर सकारात्मक परिणाम होतात. याउलट त्यांनी कृत्रिम शीतपेये, बिअर अन् वाईन यांसारखी असात्त्विक पेये प्यायल्याने त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर खूप नकारात्मक परिणाम होतात. म्हशीच्या दुधापेक्षा गायीचे दूध पिणे अधिक लाभदायी आहे.

४. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

४ अ. सात्त्विक पेयांमधील चैतन्यामुळे व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : फळांचा रस, शहाळ्याचे पाणी आणि गायीचे दूध यांसारखी नैसर्गिक पेये सात्त्विक आहेत. या पेयांमध्ये ईश्वरी चैतन्य ग्रहण अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता आहे. सात्त्विक पेये प्यायल्याने व्यक्तीला चैतन्य मिळून तिच्यावरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण न्यून किंवा नाहीसे होते आणि तिची सात्त्विकता पुष्कळ वाढते. सात्त्विक पेये प्यायल्याने तिचे शरीर, मन आणि बुद्धी यांच्यावर सकारात्मक परिणाम होऊन तिचे शारिरीक, मानसिक अन् आध्यात्मिक आरोग्य उत्तम रहाते.

४ आ. असात्त्विक पेयांमधील त्रासदायक स्पंदनांमुळे व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावर हानी होणे : कृत्रिम शीतपेये, बिअर, वाईन यांसारखी पेये मानव-निर्मित आहेत. ही पेये बनवतांना वापरण्यात येणारे घटक, तसेच पेये बनवितांना होणारी प्रक्रिया यांमुळे त्या पेयांमध्ये त्रासदायक स्पंदने आकृष्ट होऊन ती वातावरणात प्रक्षेपित होतात. ही पेये प्यायल्याने व्यक्तीमध्ये त्रासदायक स्पंदने निर्माण होतात किंवा त्यामध्ये पुष्कळ वाढ होते. तसेच ती वाईट शक्तींच्या त्रासाला बळी पडण्याची शक्यता वाढते. चाचणीतील दोघांनी केवळ एकेकदा ही पेय प्यायल्याने त्यांच्या सूक्ष्म ऊर्जेवर किती अधिक प्रमाणात नकारात्मक परिणाम झाला, हे आपण या चाचणीतून पाहिले. जे लोक वारंवार ही पेये पितात त्यांच्या स्वतःच्या आरोग्यासाठी तर ती घातक ठरतातच; पण त्यांच्यातील वाढलेल्या रज-तमामुळे त्यांच्या सभोवतालचे वातावरणही दूषित होते.

४ इ. म्हशीचे दूध प्यायल्याने व्यक्तीतील तमोगुण वाढणे : गायीमध्ये ईश्वरी तत्त्व ग्रहण करण्याची क्षमता आहे, तशी म्हशीमध्ये नाही. गायीचे दूध सत्त्वगुणी, तर म्हशीचे दूध तमोगुणी आहे. म्हशीचे दूध प्यायल्याने चाचणीतील दोघांतील तमोगुण वाढला. त्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जेत वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा घटली.

४ इ १. अनेक विकारांना जन्म देणारे म्हशीचे दूध : ‘भारतात जसे गायीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे, तसे म्हशीला नाही. म्हैस हा सतत बसून रहाणारा, मंदबुद्धीचा आणि तमोगुणी असा प्राणी आहे. म्हशीचे हे सर्व गुण तिच्या दुधातही उतरतात. म्हशीचे दूध कफवर्धक आहे. ते आळस वाढवते, स्मरणशक्ती घटवते आणि रक्तदाब, मधुमेह यांसारख्या विकारांना जन्म देते.’

(संदर्भ : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ ‘गोसंवर्धन (सेंद्रिय शेती आणि पंचगव्य चिकित्सा यांच्या लाभांसह)’)

थोडक्यात आपण जे काही खातो-पितो त्याचा आपल्या सूक्ष्म ऊर्जेवर परिणाम होत असतो. हे लक्षात घेऊन आपले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य उत्तम रहावे, यासाठी असात्त्विक पेय दूर सारून सात्त्विक पेय ग्रहण करणे श्रेयस्कर ! एवढेच नव्हे, तर असात्त्विक जीवनशैली झुगारून सात्त्विक जीवनशैली अंगीकारल्यास स्वतःसह कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचाही उत्कर्ष साधेल.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.१.२०२३)
ई-मेल : mav.research2014@gmail.com