सप्तर्षींच्या आज्ञेनुसार ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप करतांना सनातनच्या आश्रमातील सौ. आरती पुराणिक यांना आलेल्या अनुभूती
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘२६.१२.२०१९ या दिवशी सूर्यग्रहण होते. सप्तर्षींनी साधकांना २५ ते २७.१२.२०१९ या कालावधीत ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप करायला सांगितला होता. सप्तर्षींच्या आज्ञेनुसार ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप करतांना सौ. आरती पुराणिक यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ‘प.पू. डॉक्टर हा नामजप अखंड चालू आहे’, असे लक्षात येणे आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत उत्साही अन् आनंदी वाटणे
‘मी ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप करण्यास आरंभ केल्यानंतर ‘माझा नामजप अखंड चालू आहे’, असे माझ्या लक्षात आले. अन्य वेळी बसून नामजप करतांना माझ्या मनात पुष्कळ अनावश्यक आणि निरर्थक विचार येतात. त्यामुळे मला नामजपावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. माझ्या मनात येणारे असंख्य विचार आणि मला असलेला आध्यात्मिक त्रास यांमुळे माझा नामजप व्यवस्थित होत नसल्याने मला पुष्कळ खंत वाटत असे; मात्र मी ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप चालू केल्यापासून मला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत उत्साही आणि आनंदी वाटायचे.
२. २७.१२.२०१९ या दिवशी नामजप करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
२ अ. तिसर्या दिवशी नामजप करतांना मनात असंख्य विचार येऊन अनेक दृश्ये दिसणे; मात्र त्या प्रत्येक दृश्यांमध्ये ‘प.पू. डॉक्टर’ असे लिहिलेले दिसणे : तिसर्या दिवशी, म्हणजे २७.१२.२०१९ या दिवशी रात्री ९.३० वाजता मी नामजप करण्यासाठी बसले होते. त्या वेळी माझ्या मनात असंख्य विचार येऊन मला अनेक दृश्ये दिसू लागली; मात्र आश्चर्य म्हणजे त्या प्रत्येक दृश्यामध्ये मला ‘प.पू. डॉक्टर’ असे लिहिलेले दिसले. त्यानंतर माझ्या डोळ्यांसमोर दृश्यांची जणू एक श्रृंखलाच चालू झाली.
२ आ. पाण्यात असतांना पाण्यावर तरंगणारी गादी दिसून त्यावर मोठ्या अक्षरांत ‘प.पू. डॉक्टर’ असे लिहिलेले दिसणे : प्रथम ‘मला कोणीतरी पाण्यात खेचत आहे’, असे दृश्य दिसले. त्या वेळी ‘माझ्या पायांखाली अकस्मात् पाण्यावर तरंगणारी गादी दिसली. त्यावर मला मोठ्या अक्षरांत ‘प.पू. डॉक्टर’ असे लिहिलेले दिसले. ती गादी मला वेगाने वर घेऊन गेली.
२ इ. पोहण्याच्या कृत्रिम तलावात तळाला असलेल्या लादीवर ‘प.पू. डॉक्टर’ असे लिहिलेले दिसणे : त्यानंतर ‘मी आकाशात आहे’, असे मला दिसले. मी आकाशातून खाली पाहिल्यानंतर मला एक पोहण्याचा कृत्रिम तलाव (‘स्विमिंग पूल’) दिसला. त्या तलावात पाण्याखाली तळाला असलेल्या लादीवर मोठ्या अक्षरांमध्ये ‘प.पू. डॉक्टर’ असे लिहिलेले दिसले.
२ ई. मी आकाशाकडे पाहिल्यावर मला आकाशातील ढगांचा आकार ‘प.पू. डॉक्टर’ या शब्दांतील अक्षरांप्रमाणे दिसला आणि ‘त्या ढगांनी संपूर्ण आकाश व्यापले आहे’, असे दिसले.
२ उ. आगीच्या ज्वाळांचा आकार ‘प.पू. डॉक्टर’ या शब्दांतील अक्षरांप्रमाणे दिसणे : नंतर मला आगीच्या ज्वाळा दिसल्या. त्या ज्वाळांचा आकार ‘प.पू. डॉक्टर’ या शब्दांप्रमाणे असल्याचे मला दिसले, तसेच लाकडे जळल्यानंतर जी राख झाली, त्या राखेकडे पाहिल्यानंतर त्यातही मला ‘प.पू. डॉक्टर’ असे शब्द दिसले.
मला जी दृश्ये दिसत होती, ती सर्व दृश्ये ‘प.पू. डॉक्टर’ या शब्दांनी व्यापून गेली होती.
२ ऊ. स्वतःच्या हातांवर आणि शरिरातील पेशींवर ‘प.पू. डॉक्टर’ असे लिहिलेले दिसणे : नंतर माझे लक्ष माझ्या शरिराकडे गेले. त्या वेळी मला हातांवर ‘प.पू. डॉक्टर’ असे शब्द दिसले. मी माझ्या शरिराच्या आत डोकावून पहिल्यावर मला ‘माझ्या पेशी-पेशीवर ‘प.पू. डॉक्टर’ असे लिहिलेले दिसले.
२ ए. अनेक दृश्ये दिसण्यासह नामजपही चालू असल्याची जाणीव होणे आणि नामजपानंतर पुष्कळ आनंदी अन् हलके वाटणे : मला दिसणारे प्रत्येक दृश्य पटापट पालटत होते. तेव्हा माझा नामजपही चालू असल्याची मला जाणीव होती. ‘ही सर्व दृश्ये पहातांना नामजपाची वेळ कधी पूर्ण झाली’, हे मला कळलेच नाही. नामजपानंतर मला पुष्कळ आनंदी आणि हलके वाटत होते.
३. कृतज्ञता आणि प्रार्थना
माझा नामजप झाल्यानंतर थोड्या वेळाने मला त्या दृश्यांचे पुन्हा स्मरण झाले. त्या वेळी मला वाटले, ‘मला त्रास देणार्या वाईट शक्तीने माझ्या नामजपात कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, तरीही प्रत्येक वेळी देवाने मला त्यातून तारले.’ या विचारांमुळे माझी भावजागृती होऊन प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
भगवंता, देवाचे नाम एकदा घेणेही मला पुष्कळ कठीण जाते आणि ते भावपूर्ण घेणे, हे तर मला अशक्य वाटते. भगवंता, मी तुझे नामही नीट घेऊ शकत नाही. त्यासाठीही तुझीच कृपा असावी लागते. मी साधनेसाठी अत्यल्प प्रयत्न करत असतांनाही तू माझी किती काळजी घेतोस ! भगवंता, ‘मी तुझ्याकडे यावे’, याची तुलाच तळमळ आहे.
मी तुझ्याविना जगू शकत नाही. ‘देवा, ‘मला लवकरात लवकर तुझ्या चरणांमध्ये सामावून घे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. आरती भानु पुराणिक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |