शी जिनपिंग : चीनला युद्धाच्या खाईत लोटू शकणारे ‘द रेड एम्परर’ !
(‘द रेड एम्परर’ म्हणजे लाल सम्राट)
‘चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कारकीर्द अतीमहत्त्वाकांक्षा असलेली आणि अन्य देशांच्या कुरापती काढणारी आहे. यामध्ये भूमी आणि सागरी विस्तारवादाचाही समावेश आहे. ‘साम्यवादी राजवटीच्या शताब्दीला, म्हणजे वर्ष २०४९ पर्यंत चीनला जागतिक महासत्ता बनवणे’, हे शी जिनपिंग यांचे स्वप्न आहे. गेल्या वर्षी म्हणजेच वर्ष २०२२ मध्ये चीनचा नवीन राजा म्हणून शी जिनपिंग यांनी पुन्हा एकदा सत्ता हातात घेतली आहे. यासह जिनपिंग यांनी स्वतःच्या साम्यवादी पक्षाच्या मुख्य समितीत त्यांना ‘होयबा’ म्हणणार्यांचा समावेश करून पक्षांतर्गत विरोध आधीच मोडून काढत स्वतःचे राष्ट्राध्यक्षस्थान आणखी बळकट केले आहे. ही समिती जिनपिंग सांगतील त्याप्रमाणेच वागते. जिनपिंग यांच्या राष्ट्राध्यक्षपदी सलग तिसर्यांदा झालेल्या निवडीचा चीनच्या आर्थिक स्थितीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाईट परिणाम झाला आहे. २४ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘शी जिनपिंग यांची राजवट ‘सामूहिक हत्या करणारी’, जागतिक महासत्ता बनण्यासाठी चीनचे अण्वस्त्रांच्या सज्जतेविषयीचे धोरण, चीनचे अन्य देशांच्या भूमीवर वाढत असलेले अतिक्रमण आणि चीनच्या संस्थापकांचा अपूर्ण राहिलेला विस्तारवाद पूर्ण करण्याचा शी जिनपिंग यांचा प्रयत्न’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/656745.html
७. शी जिनपिंग यांचे घातकी विस्तारवादी धोरण
जिनपिंग यांची अतीमहत्त्वाकांक्षा जशी आंतरराष्ट्रीय डावपेचांच्या माध्यमांतून दिसून येते, तशी ती त्यांच्या देशातही ‘झिरो कोविड पॉलिसी’च्या (कोरोनामुक्त धोरण) धोरणाच्या माध्यमातूनही दिसून आली. या धोरणाच्या अंतर्गत वाटेल ती हानी सोसून त्यांनी मोठ्या प्रमाणात दळणवळण बंदी करणे, विलगीकरण करणे आदी कठोर निर्बंध जनतेवर लादले. ‘राजकारण आणि राष्ट्रीय सुरक्षा यांना प्राधान्य देणारी देशाची अर्थव्यवस्था बनवणे’, हे जिनपिंग यांचे धोरण आहे. खुल्या बाजारपेठेचे धोरण स्वीकारल्याने चीनची अर्थव्यवस्था वाढली असली, तरी जिनपिंग यांच्या दृष्टीने मात्र अद्यापही मार्क्सच्या विचारांना प्राधान्य आहे. चीनमधील म्हणीनुसार ‘तुमच्या हृदयातील महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालणे, म्हणजे तुमच्या हाताखाली वाघ बाळगणे’ होय. त्यामुळे जिनपिंग हे विस्तारवादी धोरण जेवढे पुढे रेटतील, तेवढा हा वाघ त्यांना संपवण्याची शक्यता आहे.
८. शी जिनपिंग यांचा शासनकाळ एकाधिकारशाही आणि आव्हान न देण्याजोगा असलेला !
देशात तिसर्यांदा अध्यक्ष म्हणून निवडून आल्याने जिनपिंग यांची सत्तेवरील पकड अधिक घट्ट झाली, हे काही आता आश्चर्य राहिलेले नाही. जिनपिंग यांनी त्यांच्या सहकार्यांना हाताशी धरून सहजपणे प्रभावी अशी सुकाणू समिती नेमली, तसेच त्यांच्याशी निष्ठेने वागणार्यांना महत्त्वाच्या पदांवर बसवून माओवादी पक्षाच्या ध्वजाखाली एकाधिकारशाही आणली, याचे आश्चर्य आहे.
जिनपिंग यांच्याभोवती असलेल्या लोकांमध्ये ‘ते जिनपिंग यांच्याशी कसे निष्ठावान आहेत ?’, हे दाखवण्याची स्पर्धा लागली असून ते त्यांना जे आवडेल, तेच हे लोक सांगत असतात. अमेरिकन लेखक वॉल्टर लिपमन यांनी म्हटले आहे, ‘‘जिथे सर्व जण एकाच प्रकारे विचार करतात, तेव्हा कुणीही अधिक विचार करत नाही.’’ जिनपिंग यांनी अधिकाराचे केंद्रीकरण केल्याने त्यांना चीनला सैनिकी आणि तांत्रिक महासत्ता बनवण्याच्या स्वप्नांना गती देण्यासाठी रान मोकळे झाले आहे. त्यांनी देशातील मतभेद चिरडून टाकून तिबेटीयन आणि उघूर वंशाच्या अल्पसंख्यांकांना चीनच्या प्रभावाखाली आणण्यास गती दिली आहे. जिनपिंग यांच्या सत्तेला कुणीही रोखू शकत नसल्याने ते त्यांना हवे ते करत आहेत. शी जिनपिंग हे बीजिंगमधील माओवादी पक्षाच्या नवीन सुकाणू समितीसह २३ ऑक्टोबर २०२२ मध्ये पुन्हा सत्तेवर आले. त्यामुळे भूतकाळात इतरांना चुका केल्याविषयी दोष देणे, हे आता चीनमध्ये शक्य होणार आहे. शी जिनपिंग यांचा शासनकाळ सर्वोच्च आणि आव्हान न देण्याजोगा असून सत्तेसाठी पुढे कुणी दावेदार नाही, हे उघड आहे.
९. चीनला युद्धाकडे नेणारे आणि विरोधकांसह सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारे जिनपिंग यांचे व्यक्तीमत्त्व !
जिनपिंग यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकारिणीत केलेल्या भाषणावरून त्यांना ‘चीनने पाश्चिमात्यांच्या ज्ञानावर अवलंबून न रहाता स्वतःच्या बळावर महासत्ता बनणे’, हे साध्य करायचे आहे, यात अजिबात संशय नाही. चीनला असणारे धोके सांगून त्यांनी देशाची आधीच शक्तीशाली असलेली सुरक्षायंत्रणा आणखी वाढवण्याची शपथ घेतली आहे. जिनपिंग यांचे बेलगाम अधिकार हे आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि चीनचे भविष्य यांसाठी चिंतेची गोष्ट आहे. खरे म्हणजे जिनपिंग हे चीनला युद्धाकडे नेत आहेत. तथापि त्यांच्या बोलण्यात कधीच ‘शांतता’ आणि ‘विकास’ हे शब्द नसतात. उलट त्यांनी क्षितिजावर धोकादायक वादळे येण्याविषयी चेतावणी दिली आहे.
चीनमध्ये जिनपिंग यांच्या राजवटीत विरोधकांवर लक्ष ठेवण्याचे प्रकार अनेक पटींनी वाढणार आहे. चीनची गुप्तहेर यंत्रणा, धाकदपटशहा आणि प्रचार यंत्रणा ही नवीन अध्याय निर्माण करू शकते. तथापि जिनपिंग यांनी पुढे जाऊन ‘ऑरवेलिअन यंत्रणा’ (जॉर्ज ओरवेल यांनी त्यांच्या ‘नाईटिन एटी फोर’ या कादंबरीमध्ये ‘सरकार नागरिकांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींवर नियंत्रण ठेवते’, असे म्हटल्याने सरकारच्या या कृतीला ‘ऑरवेलिअन’ म्हटले जाते.) निर्माण केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
१०. चीनचे आक्रमक परराष्ट्र धोरण आणि त्याचा परिणाम
खरे म्हणजे अंतर्गत मतभेद चिरडून टाकण्यासाठी जिनपिंग यांच्या राजवटीत पाळत ठेवण्यासाठी ‘डिजिटल’ साधने आणि सांस्कृतिक चळवळीचे राजकारण यांचे मिश्रण केले गेले. याद्वारे राष्ट्रवाद बाळगणार्यांना शिक्षा दिल्याने लाखो नागरिकांनी जीव गमावला. चीनची दडपशाही आणि पाळत ठेवण्याची वृत्ती ही त्याच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचा परिणाम असून हे धोरण शेजारील राष्ट्रांच्या संदर्भात अधिक तीव्र आहे.
‘दोन पावले पुढे जाऊन एक पाऊल मागे घेणे’, असे धोरण आखून जिनपिंग त्यांच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांकडे वाटचाल करत रहातील. भूमीवरील आणि सागरातील विस्तारवाद हे या डावपेचाचेच प्रतिबिंब आहे. चीनचे हे वर्तन आणि कृती चुकीची असून त्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय टीकेला सामोरे जावे लागेल.
(क्रमशः)
– प्रा. ब्रह्मा चेलानी, परराष्ट्र विश्लेषक, नवी देहली. (३०.१०.२०२२)
(साभार : www.chellaney.net)
(प्रा. ब्रह्मा चेलानी हे ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’ या केंद्रात ‘स्ट्रेटेजिक स्टडीज’ (धोरणात्मक अभ्यास) या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांना बर्लिन (जर्मनी) येथील ‘रॉबर्ट बॉश अकादमी’ ही शिष्यवृत्ती मिळाली असून त्यांनी एकूण ९ पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये ‘एशियन जगरनॉट : वॉटर’, ‘एशियाज न्यू बॅटलग्राऊंड’, ‘वॉटर पीस अँड वॉर : कन्फ्रंटिंग द ग्लोबल वॉटर क्रायसिस’, या पुस्तकांचा समावेश आहे.)
(उर्वरित भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/657532.html)