बांदोडा (गोवा) येथील सौ. नम्रता विनय शास्त्री यांनी अधिकोषात नोकरी करतांना केलेली अध्यात्मप्रचाराची सेवा आणि त्याचा अधिकोषातील कर्मचार्यांना झालेला लाभ !
६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या बांदोडा (गोवा) येथील सौ. नम्रता विनय शास्त्री (वय ७१ वर्षे) यांनी अधिकोषात नोकरी करतांना केलेली अध्यात्मप्रचाराची सेवा आणि त्याचा अधिकोषातील कर्मचार्यांना झालेला लाभ !
१. साधनेला आरंभ
‘वर्ष १९९९ मध्ये माझे यजमान श्री. विनय दिनकर शास्त्री एक प्रदर्शन बघायला गेले होते. त्यांना तेथील सनातन संस्थेचा वितरण कक्ष वेगळा वाटला. ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार झाले. त्यांनी सनातनचा ‘शक्ति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)’ हा ग्रंथ विकत घेतला. घरातील सर्वांना ‘साप्ताहिक सनातन प्रभात’चा अंक आवडला. त्यानंतर एक काकू नियमित आमच्याकडे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा अंक देण्यासाठी येत असत. त्यांनी आम्हाला साधना सांगितली आणि आम्ही साधनेला आरंभ केला.
२. अधिकोषातील कामे संपल्यावर अध्यात्मप्रचार करणे
मी एका सहकारी अधिकोषात (को-ऑपरेटिव्ह बँकेत) नोकरी करत असल्याने मला बाहेर जाऊन अध्यात्मप्रचाराची सेवा करण्यासाठी अधिक वेळ मिळत नव्हता. मी अधिकोषातील कामे संपल्यावर अध्यात्मप्रचाराची सेवा करत होते.
अ. मी अधिकोषातील जिज्ञासूंना साधना सांगू लागले.
आ. मी अधिकोषात ‘सनातन प्रभात’चे विशेषांक आणि सात्त्विक उत्पादने वितरित करण्यास आरंभ केला.
इ. मी गुरुपौर्णिमेसाठी आमच्या अधिकोषाचे विज्ञापन मिळवले.
ई. मी तेथील कर्मचार्यांकडून गुरुपौर्णिमेसाठी अर्पण घेऊ लागले.
उ. मला ‘अधिकोषातील रोख रक्कम निरनिराळ्या शाखांमध्ये नेणे आणि तेथून आणणे’, असे काम मिळाले. तेव्हा मी अधिकोषाच्या प्रत्येक शाखेत जातांना अन्य सात्त्विक उत्पादनासह सनातन पंचांगही घेऊन जाऊ लागले.
३. साधिकेचे अधिकोषाच्या दूरच्या शाखेत स्थलांतर झाल्यावर तिने केलेली अध्यात्मप्रचाराची सेवा आणि परिणामस्वरूप कर्मचार्यांनी नामजप चालू केल्याने अधिकोषातील वातावरणात झालेला पालट
माझे स्थलांतर अधिकोषाच्या बर्याच दूरच्या शाखेत झाले. त्या शाखेतील कर्मचार्यांची आपापसात भांडणे व्हायची. शाखेत नव्याने रुजू झालेल्या मुलींचे ‘रॅगिंग’ (शारीरिक आणि मानसिक हानी करण्यासाठी अयोग्य कृती करणे) केले जायचे. याविषयी अधिकोषाच्या मुख्य कार्यालयाला कळले. तेव्हा मी एक सर्वसामान्य लेखनिक असूनही शाखा प्रमुखांनी मला कर्मचार्यांना सुधारण्याचे दायित्व दिले.
३ अ. ‘माझे कुणी ऐकणार नाही’, हे मला ठाऊक होते, तरीही मी प्रयत्न करणे चालू केले. प्रथम मी सनातनचा लघुग्रंथ ‘नामजप का आणि कोणता करावा ?’ हा अधिकोषातील कर्मचार्यांना वाचायला दिला. त्यानंतर अधिकोषातील काही जण नामजप करू लागले.
३ आ. अधिकोषातील काही कर्मचार्यांनी साधनेस आरंभ केल्यावर शाखेतील वातावरणात पालट होण्यास आरंभ होणे : नामजप करणार्या कर्मचार्यांच्या ‘दशापराधविरहित नामस्मरण किती अवघड आहे ?’, हे हळूहळू लक्षात येऊ लागले. तेव्हा त्यातील काही जणांना ‘स्वतःच्या वागण्यात पालट करायला हवा’, असे वाटले. त्यांनी सनातनचे काही लघुग्रंथ आणि नियतकालिक ‘सनातन प्रभात’चे विशेषांक विकत घेतले. त्यात सांगितल्याप्रमाणे काही जणांचे प्रयत्न चालू झाले. परिणामस्वरूप हळूहळू अधिकोषातील वातावरण पालटू लागले. शाखा व्यवस्थापिका नामजप करू लागल्या. अधिकोषात नव्याने रुजू झालेल्या मुलींना होणार्या त्रासाचे प्रमाण उणावून त्यांना थोडे सुरक्षित वाटू लागले.
३ इ. अधिकोषातील एका महिला अधिकार्याने त्यांच्या कर्करोग झालेल्या वडिलांना सनातनचा ‘परमेश्वर आणि ईश्वर’ हा ग्रंथ वाचून दाखवल्यावर त्यांना झालेला लाभ : एकदा एका महिला अधिकार्याने ‘परमेश्वर आणि ईश्वर’ हा ग्रंथ माझ्याकडून मागून घेतला. ८ दिवसानंतर त्या मला म्हणाल्या, ‘‘माझ्या वडिलांना कर्करोग झाला आहे. काही दिवसांपासून त्यांना पाणीही पिता येत नव्हते; मात्र मी त्यांना हा ग्रंथ वाचून दाखवल्यावर आता ते पाणी पिऊ शकत आहेत; म्हणून मी तुम्हाला हा ग्रंथ नंतर देते.’’ ते ऐकून मी थक्क झाले.
३ ई. मी सेवानिवृत्त होतांना निरोपाच्या कार्यक्रमात जीवनात साधना करण्याचे महत्त्व सांगितले.
गुरुदेवांच्या कृपेने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने) मी नोकरी करत असतांना सेवा करू शकले, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. नम्रता विनय शास्त्री (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७१ वर्षे), बांदोडा, फोंडा, गोवा. (२९.११.२०२२)