साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. लक्ष्मी नारायण पाटील !
फाल्गुन शुक्ल पंचमी (२४.२.२०२३) या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्या सौ. लक्ष्मी नारायण पाटील (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांचा ३३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे यजमान श्री. नारायण कृष्णा पाटील यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. लक्ष्मी नारायण पाटील यांना ३३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. काटकसरी
‘माझा लक्ष्मीशी (पूर्वाश्रमीची कु. सोनाली गायकवाड हिच्याशी) विवाह सुनिश्चित झाल्यावर तिच्याशी विवाहाच्या दृष्टीने खरेदी करण्यासंदर्भात बोलणे होऊ लागले. आमच्या घरची आर्थिक स्थिती तिला ठाऊक होती. ती ‘विवाहानिमित्तची खरेदी अल्प व्ययात कशी होईल ?’, या दृष्टीने सांगत असे.
२. मायेतील गोष्टीची आसक्ती नसणे
तिचे म्हणणे होते, ‘‘विवाहाप्रसंगी अनावश्यक व्यय न करता साधनेच्या दृष्टीने जे आवश्यक आहे, तितकीच खरेदी करूया.’’ तिने स्वतःसाठी सोन्याचे अलंकार घेण्याविषयीही ‘‘तुम्हाला शक्य आहे, तितकेच करा’’, असे सांगितले. तिच्या बोलण्यातून ‘तिला मायेतील गोष्टींची आसक्ती नाही’, हे लक्षात आले.
३. सासरच्या वातावरणाशी जुळवून घेणे
आमचा विवाह निश्चित झाल्यावर माझ्या घरातील व्यक्तींना वाटायचे, ‘ही मुलगी शेतात कधी गेली नाही, तसेच ती १२ वर्षांपासून आश्रमात रहात आहे. तिला येथील वातावरणाशी जुळवून घेता येईल का ?’ सौ. लक्ष्मी सासरी आल्यावर तिने लगेचच सगळ्या गोष्टी स्वीकारून त्या दृष्टीने प्रयत्न केले. तिने सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या.
४. सौ. लक्ष्मी स्वयंपाक रुचकर आणि स्वादिष्ट करते. ती भावपूर्ण स्वयंपाक बनवते.
५. इतरांचा विचार करणे
‘माझ्या आईला अधिक काम करावे लागू नये’, यासाठी लक्ष्मी सकाळी लवकर उठून आईला स्वयंपाकघरात साहाय्य करते. लक्ष्मी घरी असतांना कधी तिची प्रकृती ठीक नसल्यास माझे आई-बाबा तिला विश्रांती घ्यायला सांगतात. तेव्हा ती म्हणते, ‘‘तुम्ही दिवसभर शेतात उन्हात काम करून दमून घरी येता. मी घरी असतांना तुम्ही शेतातून येऊन घरातीलही कामे करणे योग्य नाही.’’ ती घरातील सर्व कामे करून नंतरच विश्रांती घेते.
६. इतरांचा आदर करणे
एकदा माझी आई लक्ष्मीला स्वयंपाक बनवण्याविषयी सांगत होती. नंतर मी लक्ष्मीला विचारले, ‘‘तुला याविषयी ठाऊक नाही का ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मला ठाऊक आहे; पण जेव्हा एखादी व्यक्ती सांगत असते, तेव्हा आपल्याला काय येते, यापेक्षा ‘आपण त्यांच्याकडून काय शिकू शकतो’, हे पाहिले पाहिजे. तुमची स्वयंपाक बनवण्याची पद्धत वेगळी असेल. त्यातून मलाही काही शिकता येईल.’’ घरातील व्यक्ती जे सांगतात, ते लक्ष्मी मनापासून ऐकते. माझी बहीण लक्ष्मीपेक्षा लहान आहे, तरीही लक्ष्मी तिचे बोलणे ऐकतांना शिकण्याच्या स्थितीत असते.
७. लक्ष्मी शेतातील कामेही मनापासून करते. तिला शेतात काम करण्याचा अनुभव नाही. ती शेतात काम करतांना पाहून आम्हाला वाटते, ‘तिला शेतीच्या कामाचा पुष्कळ अनुभव आहेे.’
८. सेवेची तीव्र तळमळ
ती सेवा पूर्ण करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करते. तिच्याकडून कधी सेवा प्रलंबित राहिल्यास तिलापुष्कळ खंत वाटते.
९. तत्त्वनिष्ठ
तिने मला कधीच मानसिक स्तरावर हाताळले नाही. माझ्या काही चुका लक्षात आल्यास ती तत्त्वनिष्ठतेने मला सांगते आणि मला साधनेत साहाय्य करते.
१०. अल्प अहं
‘स्वतःला बरेच कळते किंवा स्वतःची आध्यात्मिक पातळी चांगली आहे; म्हणून माझे कुणी ऐकावे’, असे लक्ष्मीला कधीच वाटत नाही किंवा तिच्या बोलण्यातून कधीच दिसून येत नाही.
११. सौ. लक्ष्मीच्या सहवासाने घरातील वातावरण आनंदी होणे
तिच्यामधील वरील गुणांमुळे आणि तिच्या सहवासाने विवाहानंतर आमच्या घरातील वातावरणात पालट झाला आहे. आता घरातील सर्व जण आनंदी असतात. घरातील सर्वांना वाटते, ‘देवाने तिच्या माध्यमातून साक्षात् लक्ष्मीच आपल्या घरी पाठवली आहे.’
१२. माझे आई-बाबा लक्ष्मीकडे ‘सून’ या नात्याने न बघता ‘मुलगी’ या नात्याने वागतात. माझ्या बहिणी तिच्याकडे ‘वहिनी’ या नात्याने न बघता बहिणीच्या नात्याने वागतात.
१३. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘हे गुरुदेवा, आपल्या कृपेने मला अशी गुणी पत्नी लाभली’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘तिच्यामधील गुण माझ्यातही यावेत आणि तिच्यासह मलाही साधनेत पुढे जाता यावे’, अशी मी आपल्या सुकोमल चरणी प्रार्थना करतो.’
– श्री. नारायण कृष्णा पाटील (सौ. लक्ष्मी यांचे यजमान), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.१.२०२३)
‘प्रेमभाव, तत्परता आणि सतर्कता’, हे गुण असलेल्या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. लक्ष्मी पाटील !‘१३.२.२०२३ या दिवशी मी आणि तीन साधक सनातन संकुलात एका सेवेसाठी गेलो होतो. आम्ही ती सेवा संपवून एक घंट्याने, म्हणजे दुपारी ४ वाजता आश्रमात चहा घेण्यासाठी येणार होतो. या दिवशी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका ठिकाणाहून आश्रमात काही गजरे अर्पण आले होते. त्या वेळी सौ. लक्ष्मी पाटील हिने आमच्यासाठी (मी आणि माझ्या समवेत असणार्या दोन साधिका यांच्यासाठी) संकुलात गजरे पाठवले. ‘आम्हाला गजरा केसात माळता यावा’, यासाठी तिने पिनाही पाठवल्या. खरेतर आम्ही घंट्याभरात संकुलातून आश्रमात येणार होतो; पण ती आम्ही आश्रमात येईपर्यंत गजरे देण्यासाठी थांबली नाही. ‘आम्हाला अधिक काळ केसात गजरा माळता यावा’, यासाठी तिने तत्परतेने गजरे आणि पिना संकुलात पाठवल्या.’ – (पू.) सौ. अश्विनी अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.२.२०२३) |
‘निरपेक्षता आणि स्थितप्रज्ञता’ हे गुण अंगी असलेल्या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. लक्ष्मी नारायण पाटील (वय ३३ वर्षे) !
‘सौ. लक्ष्मी पाटील यांची विवाहानंतरही आध्यात्मिक पातळी तेवढीच (स्थिर) रहाण्यामागे त्यांच्यामधील ‘स्थितप्रज्ञता’ या गुणाचा मोठा वाटा आहे’, असे मला वाटते.
मी अनुभवलेल्या कु. सोनाली, म्हणजेच आताच्या सौ. लक्ष्मी प्रत्येक परिस्थितीत स्थिर असतात. त्यांना आध्यात्मिक त्रास होत असल्यासही त्या स्थिर असतात. त्या ‘स्वतःला काही त्रास होत आहे’, हे कुणाला जाणवू देत नाहीत. आनंदाने हुरळून जाणे किंवा दुःखात निराश होणे, असे त्यांचे होत नाही. त्या पुष्कळ सहनशीलही आहेत.
एखाद्या प्रसंगात स्वतःचे मत बनवून त्यावर अनावश्यक विचार करणे किंवा बोलणे, असे त्या करत नाहीत. त्या प्रत्येक कृती विचारपूर्वक करतात. ‘त्यांना निरपेक्षतेने आणि निःस्वार्थीपणे वागण्याचे बाळकडू मिळाले आहे’, असे मला वाटते; म्हणूनच ‘विवाहासारख्या जीवनातील मोठ्या पालटातही त्यांनी आध्यात्मिक पातळी राखली आणि येथून पुढेही त्या उत्कर्षाच्या दिशेनेच वाटचाल करत रहातील’, असे मला वाटते.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, आपण त्यांना भरभरून शक्ती आणि चैतन्य द्यावे अन् त्यांचा आध्यात्मिक जीवनाचा मार्ग सुखकर करावा’, अशी मी आपल्या सुकोमल चरणी कृतज्ञतापूर्वक शरणागतभावाने प्रार्थना करते.’
– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.१.२०२३)
नारायणाला लक्ष्मीमुळे पूर्णत्व हे लाभले ।भाग्य माझे, मला बहुगुणी पत्नी लाभली । नावाप्रमाणेच लक्ष्मी विविध गुणांनी नटली । मुलगी, पत्नी, सून, वहिनी, मामी ही सर्व नाती ती सांभाळी । रहाणी असे तिची साधी । स्थिरता असे वागण्यात । असे तिला सेवेचा ध्यास । अल्प असे तिच्यात अहंभाव । लक्ष्मीच्या येण्याने आयुष्य माझे उजळले । – श्री. नारायण कृष्णा पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.१.२०२३) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |