पंचमहाभूत लोकोत्सवातून युवा आणि बाल वर्गात निर्माण झालेली जाणीव सातत्याने विकसित करावी ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
कोल्हापूर – आध्यात्मिक कार्याला समाजकार्याची जोड देण्याची मोठी परंपरा असलेल्या सिद्धगिरी कणेरी मठ पंचक्रोशीत संपन्न होत असलेल्या ‘पंचमहाभूत लोकोत्सवातून युवा आणि बाल वर्गामध्ये पर्यावरणविषयक निर्माण झालेली जाणीव ही टप्प्याटप्प्याने विविध उपक्रमांतून सातत्याने विकसित होईल, हेच या उपक्रमाचे सर्वांत मोठे यश ठरेल, असे मत गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. ते पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
डॉ. सावंत पुढे म्हणाले, ‘‘गोवा राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेनुसार ‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’ ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला गती येण्यासाठी या पंचमहाभूत लोकोत्सवाचा मोठाच लाभ होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून एक मोठी लोकचळवळ आध्यात्मिक दिशादर्शनातून प्रारंभ होत आहे. याचे आपण साक्षीदार आहोत, याचा मनस्वी आनंद होत आहे.’’ या महोत्सवात सहभागी होण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सकाळी कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.