‘पाठपुरावा घेणे, ही साधना आहे’, हा भाव ठेवून पाठपुरावा केल्याने स्वभावदोष आणि अहं न्यून होऊन गुणसंवर्धन होणे
१. ‘पाठपुरावा घेणे, ही माझी साधना आहे’, हा भाव ठेवून पाठपुरावा घेतल्यास स्वतःच्या स्वभावदोषांवरही मात करता येणे
‘कोणतीही सेवा गुरुचरणी परिपूर्णतेने अर्पण होण्यासाठी काही वेळा सेवेशी संबंधित साधकांचा पाठपुरावा घ्यावा लागतो. ‘पाठपुरावा करणे, ही माझी साधना आहे’, हा भाव ठेवून एखाद्या सेवेचा पाठपुरावा घेतल्यास गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने आपल्याला स्वतःच्या स्वभावदोषांवर मात करता येते.
२. ‘साधना’ म्हणून पाठपुरावा करतांना गुणांमध्ये होत असलेली वृद्धी !
२ अ. सहसाधकांना समजून घेता येऊ लागणे : ‘साधना’ या भावाने सेवेचा पाठपुरावा करत असतांना ‘समोरच्या साधकाला काही अडचण आहे का ?’, असा विचार आल्यामुळेे त्याच्याकडून अपेक्षा न होता त्याला समजून घेण्याचे प्रमाण आपोआप वाढते. त्यामुळे साधकांकडून असलेल्या अपेक्षांचे प्रमाण न्यून होते.
२ आ. साधकाची अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न करतांना स्वतःमध्ये अनेक गुण वाढायला साहाय्य होणे
१. साधकाची अडचण असल्यास ती सोडवण्यासाठी चिंतन वाढून साधकाला साहाय्य करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे साधकांशी जवळीक वाढते.
२. स्वतःला अडचण सोडवता आली नाही, तर पुढे विचारून घेणे होते. त्यामुळे विचारण्याची वृत्ती वाढते.
३. साधकाची अडचण सोडवल्याने साधकांमधील प्रेमभाव वाढून साधकांना सेवेतील आनंद घेता येतो.
त्यामुळे सर्वांची ती समष्टी सेवा म्हणून गुरुचरणी अर्पण होते.
२ इ. सेवेचा पाठपुरावा करतांना ती सेवा स्वतः केल्यास त्यातील अडचणी आणि बारकावे समजत असल्याने शिकण्याची वृत्ती वाढणे, त्यामुळे साधकांना साहाय्य करता येणे : ‘पाठपुरावा घेणे’ हे साधना म्हणून केल्याने ज्या सेवेचा आपण पाठपुरावा करत आहोत, ती सेवा स्वतः समजून घेणे आणि करणे याचे आपोआपच नैतिक दायित्व येते. सेवा समजून घेतल्याने त्यातील बारकावे लक्षात येतात. त्यामुळे आपली शिकण्याची वृत्ती वाढते. ती सेवा आपण केली पाहिजे, उदा. अर्पण घेणे, विज्ञापन घेणे इत्यादी. साधकांना त्याविषयी विचारतांना त्याची बिंब-प्रतिबिंब या न्यायाने परिणामकारकता वाढते आणि समष्टी सेवेतील आनंद गुरुचरणी अर्पण करता येतो.
२ ई. ‘पाठपुरावा घेणे’, ही सेवा ‘साधना’ या भावाने केल्यास समष्टी भाव वाढणे : ‘साधना’ या भावाने पाठपुरावा केल्याने सेवा समयमर्यादेत गुरुचरणी अर्पण होण्यासाठी चिंतन आणि तळमळ वाढते. त्यामुळे समष्टी भाव वाढून समष्टी सेवा परिपूर्ण होण्यास साहाय्य होऊन गुरुचरण सेवेतील आनंद घेता येतो आणि आपोआपच गुरुदेवांच्या समष्टीशी एकरूप होता येते.
२ उ. व्यष्टी प्रयत्न वाढल्यामुळे बोलण्यातील परिणामकारकता वाढते. प्रत्येक सेवा साधना म्हणून होण्यास साहाय्य मिळते.
३. एखादा गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करतांना अनेक गुण अंगी येणे
सद़्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्यात एखादा स्वभावदोष असतो, तेव्हा तो एकटा नसतो, तर त्याच्या समवेत त्याची पिलावळ (त्या दोषाशी संलग्न इतर अनेक दोष) येते. त्याचप्रमाणे आपण एखादा गुण अंगी बाणवण्यासाठी प्रयत्न केला, तर त्या समवेत इतर अनेक गुण आपल्यात येण्यास साहाय्य होते. त्यामुळे आपोआपच स्वभावदोष न्यून होऊन आपल्याला गुरुचरणी जाता येते.
गुरुमाऊली आणि सद़्गुरु स्वाती खाडये यांच्या कृपेमुळे मला ही सूत्रे शिकायला मिळाली. त्यासाठी गुरुचरणी अनंत कृतज्ञता !’
– अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी, दापोली, जि. रत्नागिरी. (२५.१०.२०२१)