उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
‘पंचमहाभूत लोकोत्सव’ तृतीय दिवस
कोल्हापूर – उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसाठी करण्यासमवेत पर्यावरणपूरक कामांचा संकल्प करावा, यासाठी राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान येथे आयोजित ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवा’निमित्त २२ फेब्रुवारीला उद्योजकांसाठी विशेष परिषद घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी, राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष ए.के. गोयल, उत्तरप्रदेशचे आमदार सी.पी. चंद, ‘बीव्हीजी ग्रुप’चे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, अभिनेते संदीप कुलकर्णी, कागल औद्योगिक वसाहतीचे हरिश्चंद्र धोत्रे, पंजाबचे ओमेंद्र दत्त, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर उद्योगमंत्री सामंत यांनी प्लास्टिक पुनर्निर्मिती प्रकल्पाला भेट दिली, तसेच ‘पंचमहाभूत बोध’ प्रयोग पाहून यातून पंचतत्त्वांच्या संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे दिल्याविषयी समाधान व्यक्त केले.
उद्योगमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, ‘‘कोल्हापूरच्या पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून पंचगंगेचे शुद्धीकरण करण्याचा संकल्प सर्वांनी करावा. ३० दिवसांत उद्योगांसाठी अनुमती देणारा कायदा येत असल्यामुळे उद्योगवाढीला गती मिळेल. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करणारा कणेरी मठ नैसर्गिक आपत्तींत साहाय्यासाठी सर्वांत पुढे राहिला आहे. माणसांप्रमाणेच पशू-पक्ष्यांची आणि पर्यावरणाची काळजी घेण्याचा स्वामीजींचा संदेश सर्वांनी आत्मसात् करण्याची आवश्यकता आहे.’’