पुणे येथील आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक दुर्लक्षित !
पुणे, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील बंडगार्डन पुलाजवळ एक पुरातन इमारत आहे. त्या इमारतीमध्ये सध्या लोहगाव, पोलीस अधीक्षक कार्यालय, पुणे शहर पोलिसांचे दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा आणि पोलीस यंत्रणेतील संबंधित कार्यालये आहेत. याच इमारतीच्या आवारामध्ये आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक उभारले आहे; परंतु ते स्मारक सध्या अनेक समस्यांनी ग्रस्त होऊन दुर्लक्षित झालेले दिसून येत आहे. या स्मारकाशेजारी मेट्रोच्या कामाचे साहित्य पडलेले दिसून येते. तसेच स्मारकाशेजारी वाढलेले बेसुमार गवत, धुळीचे थर, केरकचरा आणि सिगारेट, तसेच मद्याच्या बाटल्याही आढळून आल्या.
या स्मारकाची निर्मिती २१ फेब्रुवारी २००६ या दिवशी पूर्ण झालेली आहे. हे स्मारक ‘फायबर’मधून उभारलेले असून सध्या अनेक ठिकाणी त्यावरील रंग उडून जाणे, ओरखडे उठलेले असणे, तसेच अनेक ठिकाणी खपल्याही पडल्याचे दिसून येत आहे. स्मारकावर धूळ आणि झाडांची पाने पडलेली आहेत.
या स्मारकामध्ये आद्य क्रांतीकारक फडके यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचे शिल्प रेखाटले आहे. त्यामध्ये फडके यांचे कुस्ती कौशल्य, तलवारबाजी, इंग्रज अधिकार्याचा वध, आपल्या सहकार्यांसोबत चर्चा करतांना, तसेच ‘एडन’च्या कारागृहात डांबलेले असतांनाचा प्रसंग अशा सर्व प्रसंगांचे रेखाटन या शिल्पाच्या आतील भागात करण्यात आले आहे.
फडके यांना १७ जुलै १८७९ ते ९ जानेवारी १८८० या कालावधीत याच इमारतीतील एका खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. ती वास्तू अशीच धूळखात पडलेली आहे. या खोलीच्या समोरच कचरा गोळा करून ठेवलेला दिसून आला. काही वेळेस तो कचरा तेथेच जाळूनसुद्धा टाकण्यात येतो, असे दिसून येते.
ज्या ठिकाणी स्मारकाची निर्मिती केली आहे, त्याच्या आजूबाजूला मोठी झाडे आहेत. त्या झाडांच्या फांद्यांमुळे हे स्मारकही झाकून गेलेले दिसून येते. अगदी स्मारकासमोर गेल्यानंतरच हे स्मारक असल्याचे दिसून येते. तेथील कार्यालयामध्ये याविषयी चौकशी केली असता असे समजते की, या स्मारकाचे दायित्व कुणाकडेही नाही. तरीही लोहगाव पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचार्यांनी ‘मेट्रो’कडे पत्रव्यवहार केला आहे. तेव्हा ‘मेट्रो’चे म्हणणे असे की, आमचे काम संपल्यानंतर आम्ही तो परिसर स्वच्छ करू. त्याची डागडुजी करून ते स्मारक चांगल्या पद्धतीने सजावट करून देऊ.
महानगरपालिकेचे म्हणणे आहे की, ते स्मारक सरकारी कार्यालयाच्या हद्दीमध्ये आहे. त्यामुळे त्याचे दायित्व आमच्याकडे येत नाही. आम्ही जर स्मारक किंवा स्तंभ उभा केला, तरी त्याचे दायित्व त्या सामाजिक संस्थांकडे दिलेले असते.