अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांचा भांडाफोड करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !
४ आणि ६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकामध्ये ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांचा ‘दोष परकीय धनाचा ?’, असा सुरेख लेख आला आहे. त्या लेखात त्यांनी ‘‘अमुक क्रीम लावली की गोरेपणा येतो’, अशा विज्ञापनाविरुद्ध शाम मानव का उभे रहात नाहीत ?’, असा प्रश्न विचारला आहे. श्री. तोरसेकर सांगतात त्याप्रमाणे त्यांचे यात आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. त्याचप्रमाणे मानव यांचा धर्माचा अभ्यास नाही, हेही दिसून येते.
समर्थ रामदासस्वामी यांनी दासबोधात ४०० वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे, ‘‘काळें माणुस गोरें होयेना । वनाळास येत्ना चालेना । मुक्यास वाचा फुटेना । तो सहजगुण ॥ (दासबोध, दशक १४, समास ६, ओवी २) अर्थ : काळा माणूस गोरा होऊ शकत नाही. जन्मखुणा, व्रण इत्यादी काढता येत नाही. मुक्या माणसाला बोलता येत नाही, कारण तो त्याचा सहज गुण आहे.
याचा अभ्यास शाम मानवांनी केला असता, तर त्यांनी विज्ञापन वितरण करणार्यांना प्रश्न विचारला असता; पण ते आर्थिक मोहात अडकले नसते. यापुढे जाऊन समर्थ म्हणतात, ‘‘रूप लावण्य अभ्यासितां न ये । सहजगुणास न चले उपाये । कांहीं तरी धरावी सोये । अगांतुक गुणाची ॥ (दासबोध, दशक १४, समास ६, ओवी १) अर्थ : आपले रूप आणि लावण्य हे गुण अभ्यासाने साध्य होत नाहीत; कारण ते जन्मजात असतात. तेथे काही उपाय चालत नाही, म्हणून आगंतुक गुण प्राप्त करण्यासाठी जरूर प्रयत्न करावेत.
याचाही अभ्यास शाम मानवांनी करावयास पाहिजे, म्हणजे ते या अंधश्रद्धेच्या मायेतून बाहेर पडतील. त्याचप्रमाणे पानिपतच्या लढाईत सदाशिवराव भाऊ प्राणपणाने लढले, तसेच श्री. भाऊ तोरसेकर आपल्या शक्तीप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांच्या विरुद्ध लढत आहेत. आपण हिंदूंनी अशा लढ्यात आपली शक्ती उभी केली पाहिजे, हीच त्या श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
जय जय रघुवीर समर्थ ।
– श्री. विद्याधर नारगोलकर, पुणे. (११.२.२०२३)
हे वाचा –
♦ दोष परकीय धनाचा ? (शाम) मानव आहेत पराधीन !
https://sanatanprabhat.org/marathi/651180.html