प्रेमभाव, शिकण्याची वृत्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणार्या फोंडा (गोवा) येथील सौ. प्राजक्ता विशाल पुजार (वय ३८ वर्षे) !
फाल्गुन शुक्ल तृतीया (२२.२.२०२३) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्या सौ. प्राजक्ता विशाल पुजार यांचा ३८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे यजमान श्री. विशाल पुजार यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. प्राजक्ता पुजार यांना ३८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. ‘सौ. प्राजक्ता सतत आनंदी रहाण्याचा प्रयत्न करते.
२. प्रेमभाव : मला पोटाच्या त्रासामुळे प्रत्येक २ – ३ घंट्यांनी थोडे थोडे खायला लागायचे. तेव्हा प्राजक्ता न कंटाळता मी जे सांगेल, ते मला खायला करून देत असे. त्या वेळी ती स्वयंपाक मनापासून करत असे. त्यामुळे मला सकारात्मक रहाण्यास साहाय्य होत होते.
३. व्यवहार किंवा साधना यांसंदर्भात कोणतेही निर्णय घायचे असल्यास ती तटस्थ राहून योग्य विचार करते आणि इतरांना विचारून, तसेच इतरांना सामावून घेऊन निर्णय घेते.
४. कुठलीही नवीन गोष्ट करायची असल्यास प्राजक्ता घरातील सर्वांना प्रोत्साहन देते आणि स्वतःही आनंदाने शिकते.
५. प्राजक्ताने आश्रमात आल्यावर नवीन सेवा लगेच आत्मसात केली. तिला नवीन सेवा शिकायला आवडतात.
६. प्राजक्ताचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून तिला जर्मन आणि जपानी या भाषाही येतात. ‘या शिक्षणाचा लाभ गुरुसेवेसाठी व्हावा’, असा तिचा विचार असतो.
७. ती घरातील काम किंवा कुठलीही सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असते. साधकांनी सांगितलेली कोणतीही सेवा प्राजक्ता स्वीकारते आणि पूर्ण करते.
८. नामजपादी उपायांविषयीचे गांभीर्य : प्राजक्ता नामजपादी उपाय भावपूर्ण करते. कु. शौर्याला (मुलीला) वेळ देणे आणि घरातील कामे यांमुळे प्राजक्ताला नामजप आणि सेवा यांसाठी शांतपणा मिळत नसे; म्हणून ती लवकर उठून नामजप आणि सेवा पूर्ण करत असे.
९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव आणि श्रद्धा
९ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर भार सोपवून नोकरी सोडून साधना करण्याचा निर्णय घेणे : प्राजक्ता मोठ्या पगाराची नोकरी करत होती; पण याचा तिच्या वागण्यात कधीच अहंकार जाणवला नाही. ‘आपल्याला साधनाच करायची आहे’, या निश्चयाने तिने वर्ष २०१९ मध्ये नोकरी सोडून गोवा येथे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी आमची मुलगी कु. शौर्या २ वर्षांची होती. त्यामुळे ‘हे कसे जमणार ?’, असा विचार तिच्या मनात कधीच आला नाही. तिने प.पू. गुरुदेवांवर पूर्णपणे भार सोपवून निर्णय घेतला.
९ आ. मला शारीरिक त्रासामुळे नेहमी मानसिक आधाराची आवश्यकता वाटायची. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टरांविना कोण आपला आधार असणार ?’, असा तिचा भाव असायचा.
९ इ. शारीरिक त्रासामुळे यजमानांच्या मनातील काळजीचे विचार वाढल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे आपल्याकडे लक्ष आहे’, असे त्यांना सांगणे : माझ्या शारीरिक त्रासामुळे माझे स्वतःकडे लक्ष असायचे. त्या वेळी माझ्या मनातील काळजीचे विचार वाढायचे. तेव्हा प्राजक्ताशी बोलल्यावर ती नेहमी मला सकारात्मक दृष्टीकोन द्यायची. ‘आपण परात्पर गुरु डॉक्टरांजवळ आहोत आणि त्यांचे आपल्याकडे लक्ष आहे’, असे मला सांगून ती निश्चिंत असायची.
९ ई. ‘परात्पर गुरु डॉक्टर समवेत आहेत’, असा भाव असणे : माझ्या शारीरिक त्रासामुळे अनेक वेळा आम्हाला माझ्या वैद्यकीय तपासणीसाठी पणजी आणि मडगाव येथे जावे लागत होते. तेव्हा प्राजक्ता कोणताही ताण न घेता स्वतः चारचाकी गाडी चालवायची. ‘प.पू. गुरुदेव समवेत आहेत’, असा तिचा भाव असायचा.
‘गुरुदेवांच्या कृपेने मला प्राजक्तामधील गुण पहाता आले. ‘हे सर्व गुण मला शिकता येऊ दे आणि प्राजक्ताची साधनेत जलद उन्नती होऊ दे’, अशी प.पू. गुरुदेवांच्या सुकोमल चरणी कृतज्ञतापूर्वक प्रार्थना !’
– श्री. विशाल पुजार, ढवळी, फोंडा, गोवा. (५.३.२०२२)