अध्यात्म-ज्ञान यांचा संगम साधल्यास जीवन परिपूर्ण करण्यास साहाय्य होईल ! – पद्मश्री डॉ. हिमतसिंह बावस्कर
‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवा’तील आरोग्यविषयक सत्र
कोल्हापूर – सिद्धगिरी मठावर होणारा पर्यावरण आणि आरोग्याचा जागर हा जगाला परिपूर्ण आरोग्याची दिशा देणारा ठरणार आहे. नैसर्गिक सोयीसुविधा, आहार-विहार-विचार आचरणात आणल्यास आरोग्यदायी जगण्यासमवेतच मृत्यूही वेदनारहित होऊ शकतो. आरोग्य हे बाजारात विकत मिळत नाही, ते स्वतःलाच कमवावे लागते. त्यामुळे वेळीच पर्यावरण आणि आरोग्य यांकडे लक्ष द्या. सप्ताहातून किमान १ दिवस भ्रमणभाषचा उपवास अमलात आणावा. अतिरिक्त विचारांना विराम देऊन अध्यात्म-ज्ञान यांचा संगम साधल्यास जीवन परिपूर्ण करण्यास साहाय्य होईल, असे प्रतिपादन जागतिक किर्तीचे डॉ. हिमतसिंह बावस्कर यांनी केले. सिद्धगिरी मठ, कणेरी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव येथे पहिल्या दिवशीच्या आरोग्यविषयक सत्रात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सुरेंद्र जैन, हरीश बोटले, विनय हसबनीस, प्रकाश पाटील उपस्थित होते.
डॉ. हिमतसिंह बावस्कर म्हणाले की,
१. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवण्यासाठी अनेक साधने आहेत, तसेच शैक्षणिक गरजाही पूर्ण करण्यासाठी विविध साधने आहेत; पण आरोग्य विषयक संपन्नता ही बाजारात कुठेही विकत मिळत नाही, ती कमवावी लागते. त्यामुळे आरोग्य हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
२. आजच्या ‘फास्टफूड’च्या अतिरिक्त सेवनाने आरोग्याचा तोल ढासळून तणावपूर्ण जीवन वाढत आहे. मधुमेह, अल्प वयातील हृदयविकारांचे वाढते प्रमाण, अनेक आजारांचे प्रमाण हे व्यायामाच्या अभावाची लक्षणे आहेत. व्यायामासमवेत मानसिक स्वास्थ्यही चांगले असणे आवश्यक आहे.
३. भ्रमणभाषच्या अतिरिक्त वापरामुळे शरिराची भरून न निघणारी हानी होत आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भ्रमणभाषच्या अतीवापरामुळे स्मृतीभ्रंश सारख्या समस्या वाढत आहेत.