आंतरिक साधनेच्या बळावर मुलगा आणि यजमान यांच्या निधनाच्या वेळी स्थिर राहून संयमाने कृती करणार्या प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी !
फाल्गुन शुक्ल तृतीया (२२.२.२०२३) या दिवशी प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांची कन्या श्रीमती मनीषा गाडगीळ यांनी प.पू. फडकेआजींविषयी केलेले लिखाण येथे पाहूया.
प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. मुलाचे आजारपण आणि निधन या प्रसंगी स्थिर रहाणे
१ अ. प.पू. फडकेआजींच्या मुलाला कावीळ झाल्याने त्याला रुग्णालयात भरती करणे आणि त्या वेळी प.पू. फडकेआजींचे यजमान नोकरीनिमित्त नागपूर येथे असल्याने प.पू. आजींना एकट्यानेच रुग्णालयात थांबावे लागणे : ‘२१.१.१९७५ या दिवशी सकाळी ११ वाजता प.पू. (श्रीमती) विमल फडकेआजींच्या मुलाला (अभय नारायण फडके याला) रुग्णालयात भरती केले होते. त्याला कावीळ झाली होती. तेव्हा तो केवळ २४ वर्षांचा होता. त्या वेळी रुग्णालयात त्याच्याजवळ प.पू. आजी एकट्याच होत्या. माझे वडील (नारायण शंकर फडके) यांचे कार्यालयीन कामानिमित्त स्थलांतर झाल्यामुळे ते त्या कालावधीत नागपूर येथे होते.
१ आ. मुलाची प्रकृती अत्यंत गंभीर होणे, प.पू. फडकेआजींनी ‘मुलाला त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पहाता यावे’, अशी केलेली विनंती आधुनिक वैद्यांनी मान्य करणे, दुपारी मुलाचे निधन होणे : २३.१.१९७५ या दिवशी दुपारी १२.३० वाजता प.पू. आजींच्या मुलाची (अभयची) प्रकृती अधिकच गंभीर झाली. रुग्णाजवळ ३ -४ आधुनिक वैद्य आल्यावर परिचारिकेने प.पू. आजींना बाहेर बसण्यास सांगितले. प.पू. आजींना अभयच्या गंभीर स्थितीची जाणीव झाली. प.पू. आजींनी आधुनिक वैद्यांना विनंती केली, ‘‘मला मुलाला पहायचे आहे. मी रुग्णालयाला कोणताही दोष देणार नाही. मला केवळ पाहू द्या.’’ प.पू. आजींची ही विनंती त्या आधुनिक वैद्यांनी मान्य केली. दुपारी १ वाजता अभयचे निधन झाले. अभयने शेवटचा श्वास घेईपर्यंत प.पू. आजी त्याच्याजवळ होत्या. स्वतःच्या तरुण मुलाचा प्राण जात असल्याचे पहातांनाही प.पू. आजी शांत आणि स्थिर होत्या.
१ इ. मुलाचे निधन झाल्याविषयी घरी कळवायचे असल्याने प्रवासी चारचाकी वाहनचालकाला वाहन गतीने चालवायला सांगणे आणि वाहनचालकाने ‘आयुष्यात पहिल्यांदाच इतकी धीट महिला पहात आहे’, असे सांगून प.पू. फडकेआजींचे कौतुक करणे : प.पू. आजी रुग्णालयात एकट्याच होत्या. ‘अभयचेे निधन झाले आहे’, असे घरी सांगण्यासाठी त्या रुग्णालयातून घरी जाण्यासाठी निघाल्या. प.पू. आजी रुग्णालयातून बाहेर पडल्यावर प्रवासी चारचाकी वाहनात (टॅक्सीमध्ये) बसल्या. त्यांनी चालकाला सांगितले, ‘‘वाहन जरा गतीने चालव. माझ्या मुलाचे आताच रुग्णालयात निधन झाले आहे आणि त्याविषयी कुटुंबियांना सांगण्यासाठी मला लवकर घरी जायचे आहे.’’ घरी आल्यावर प.पू. आजींनी वाहनचालकाला पैसे द्यायला शेजारच्या घरातील व्यक्तीला पाठवले. त्या वेळी वाहनचालकाने त्या व्यक्तीला सांगितले, ‘‘या बाईंची कमाल आहे ! त्यांनी मला ‘स्वतःच्या मुलाचे निधन झाले आहे’, असे सांगून वाहन गतीने चालवायला सांगितले. मी आयुष्यात पहिल्यांदाच इतकी धीट महिला पहात आहे !’’
१ ई. मुलाचे निधन झाल्याचे दूरच्या नातेवाइकांना कळवायचे असल्याने प.पू. फडकेआजींनी मुलाच्या मित्रांना त्याविषयीची माहिती आणि ‘ट्रंककॉल’साठी लागणारे पैसे देणे अन् या सर्व कृती त्यांनी संयमाने आणि स्थिर राहून केल्याने शेजार्यांना आश्चर्य वाटणे : ‘प.पू. आजींनी घरी आल्यानंतर शांतपणे अभयचे निधन झाले आहे’, असे उपस्थित सर्वांना सांगितले. त्या वेळी घरात आजींच्या मुलाचे काही मित्र आले होते. त्या वेळी आमच्या घरात अन्य कुणीही पुरुष व्यक्ती नव्हती. ‘आमचे सर्व नातेवाईक विदर्भात आहेत. त्या सर्वांना कळवायला लागेल. तिथे ‘ट्रंककॉल’ (दूरवर असलेल्या लोकांशी संपर्क करण्यासाठी लागणारा दूरभाष) करावा लागतो’, असे सांगून प.पू. आजींनी नातेवाइकांचे दूरभाष क्रमांक मुलाच्या मित्राला दिले. एवढेच नाही, तर प.पू. आजींनी त्यांना ‘ट्रंककॉल’ करण्यासाठी लागणारे पुरेसे पैसेही दिले. काही शेजार्यांना प.पू. आजींची ही कृती पाहून पुष्कळ आश्चर्य वाटले. प.पू. आजींनी या सर्व गोष्टीही अगदी संयमाने केल्या.
२. यजमानांचे निधन आणि त्याकडे साक्षीभावाने पहाणार्या प.पू. फडकेआजी !
२ अ. सकाळी चालण्याचा व्यायाम करण्यासाठी जाण्याचे प.पू. आजींनी रहित करणे आणि त्याच कालावधीत यजमानांचे निधन झाल्याने देवानेच योग्य विचार दिल्याचे प.पू. फडकेआजींनी नंतर सांगणे : ८.४.१९९३ या दिवशी माझ्या वडिलांचे (नारायण शंकर फडके) सकाळी ७.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प.पू. फडकेआजी दादर येथील शिवाजी पार्क जवळ रहात असल्याने त्या नियमित सकाळी चालण्यासाठी बाहेर जात असत. त्या दिवशी त्यांना काय वाटले, ते ठाऊक नाही; परंतु त्या बाहेर गेल्या नाहीत. माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्या मला म्हणाल्या, ‘‘बरे झाले. आज देवानेच माझ्या मनात योग्य विचार दिला. त्यामुळे मी बाहेर गेले नाही आणि यजमानांच्या निधनप्रसंगी मला तेथे थांबता आले.’’ (त्या वेळी मला ‘कृतज्ञता’ हा शब्दही ठाऊक नव्हता; परंतु प.पू. आजींच्या मुखातून सहजतेने देवाच्या प्रती कृतज्ञताच व्यक्त झाली, हे आता लक्षात येते.)
२ आ. ‘यजमानांच्या निधनाच्या दिवशी कितीही विलंब झाला, तरी परात्पर गुरु डॉ. आठवले भेटण्यास नक्की येतीलच’, अशी दृढ श्रद्धा असणार्या प.पू. (श्रीमती) विमल फडकेआजी ! : त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजता वडिलांच्या मृतदेहाला अग्नि दिल्यावर काही परिचित घरी गेले. रात्री ९ वाजल्यानंतर घरी आलेले नातेवाईक आणि परिचित आपापल्या घरी गेले. त्या वेळी मी प.पू. फडकेआजींना म्हणाले, ‘‘आता मी मुख्य दाराची वरची कडी लावून घेते. आता रात्र होत आली. कुणी येणार नाही.’’ इतक्यात त्या लगेच म्हणाल्या, ‘‘थांब, थांब. डॉक्टर (परात्पर गुरु डॉक्टर आठवले) आल्याविना रहाणारच नाहीत. त्यांना पुष्कळ सेवा असतात; परंतु विलंब झाला, तरी ते नक्की येतीलच.’’
२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले प.पू. फडकेआजींना भेटायला येणे आणि त्यांनी प.पू. फडकेआजींचे कौतुक करणे
आमचे बोलणे पूर्ण होत नाही, इतक्यात दारावरील घंटा वाजली. मी दार उघडून पाहिले, तर खरेच परात्पर गुरु डॉ. आठवले प.पू. आजींना भेटण्यासाठी आले होते.
२ इ १. प.पू. आजींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना यजमानांच्या निधनाविषयी थोडक्यात सांगून त्यांच्याशी समष्टी सेवेविषयीच सहजतेने बोलणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीमध्ये प.पू. फडकेआजींनी केवळ २ ३ मिनिटांतच ‘यजमानांचे निधन कसे झाले ?’, याविषयी त्यांना सांगितले. त्यानंतर त्या म्हणाल्या, ‘‘मी दोन ठिकाणी लहान प्रवचने आयोजित केली आहेत. ‘यजमानांचे तेरा दिवस पूर्ण झाल्यानंतर मी ती प्रवचने घेईन’, असे मी संबंधितांना कळवते.’’
२ इ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘आजी प्रत्यक्षात अध्यात्म जगत आहेत’, असे सांगणे : परात्पर गुरुदेवांनी त्यांच्या समवेत आलेल्या काही साधकांना विचारले, ‘‘आता आजी जे बोलल्या, त्यातून काय लक्षात येते ?’’ तेव्हा साधकांनी सांगितले, ‘‘येथे कुणाचे निधन झाले आहे’, असे वाटत नाही. आजी पुष्कळ स्थिर आहेत.’’ त्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘यजमानांचा सहवास अनेक वर्षे असतो. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर इतके स्थिर रहाणे पुष्कळ कठीण असते; पण आजींनी ते सहज साध्य केले. आजी प्रत्यक्षात अध्यात्म जगत आहेत. आजींनी यजमानांच्या मृत्यूकडे साक्षीभावाने पाहिले.’’
– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), (प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके यांची मुलगी) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१२.२०२२)
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अनुभूती लिहिलेला कागद द्यायचा असल्याने ‘तो कागद चुरगळू नये’, यासाठी बसमधील गर्दीतही कागद स्वतःजवळ धरून ठेवून परात्पर गुरुदेवांप्रतीच्या अपार भावाचे दर्शन घडवणार्या प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी !‘वर्ष १९९४ मध्ये एकदा मी प.पू. फडकेआजी यांच्या समवेत सनातनच्या मुंबई येथील सेवाकेंद्रात जाणार होते. प.पू. आजींना स्वतःची अनुभूती लिहिलेला कागद परात्पर गुरुदेवांना द्यायचा होता. ‘परात्पर गुरु डॉक्टर हे लिखाण वाचणार आहेत’, या भावाने प.पू. आजींनी चांगल्या अक्षरात खाडाखोड न करता ‘फुलस्केप पेपर’वर अनुभूतीविषयी लिहिले. तो मोठ्या वहीचा कागद (फुलस्केप पेपर) प.पू. आजींनी हलकेच वर्तमानपत्राच्या मधल्या पानात घातला आणि ते वर्तमानपत्र अलगद पिशवीत ठेवले. बसस्थानकाच्या ठिकाणी मी प.पू. आजींना म्हणाले, ‘‘मी पिशवी धरते.’’ तेव्हा त्यांनी पिशवी माझ्याकडे दिली नाही. बसमध्ये चढतांनाही त्यांनी अगदी हळूवारपणे पिशवी स्वतःजवळ धरली. आम्ही बसमध्ये बसल्यावर प.पू. आजी म्हणाल्या, ‘‘ही अनुभूती प.पू. डॉक्टरांनी मला लिहून द्यायला सांगितली. त्यांच्या हातात घडी घातलेला किंवा चुरगळलेला कागद कसा देणार ?; म्हणून मी पिशवी तुझ्या हातातही दिली नाही. बसमध्ये कुठेही त्याला धक्का लागायला नको; म्हणून मी ती पिशवी जवळ धरून ठेवली.’’ त्या वेळी माझ्या अल्प मतीला प.पू. आजींमध्ये असलेल्या परात्पर गुरुदेवांप्रतीच्या भावाविषयी कल्पना आली नाही. केवळ ‘तिने पुष्कळ चांगली कृती केली’, असे मला वाटले. ‘प.पू. फडकेआजींमध्ये परात्पर गुरुदेवांप्रती किती उच्च कोटीचा भाव होता !’, हे आता लक्षात येते.’ – श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), (प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके यांची मुलगी) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१२.२०२२) |