संभाजीनगर घरकुल घोटाळ्याची ‘ईडी’कडून चौकशी !

महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या अडचणीत वाढ !

मुंबई – केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा ‘प्रधानमंत्री आवास योजने’त संभाजीनगर येथे घोटाळा उघडकीस आला आहे. शहरात गोरगरिबांसाठी अनुमाने ४० सहस्र घरे बांधतांना महापालिकेने अनुमाने ४ सहस्र ५०० कोटी रुपयांच्या कामात नियमबाह्यपणे ठेकेदारावर मेहेरनजर दाखवल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रधानमंत्री कार्यालयाने याची गंभीर नोंद घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘ईडी’ने पत्राद्वारे सरकारकडून या प्रकरणाशी संबंधित दस्तावेज मागवले असून त्यानुसार संबंधित नस्ती त्यांना देण्यात आल्या आहेत, तसेच नगरविकास विभागानेही महापालिका प्रशासकाकडून खुलासा मागवल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठेकेदाराच्या मर्जीनुसार प्रकल्प आखणी !

प्रधानमंत्री आवास(शहरी) योजनेंतर्गत संभाजीनगर महापालिका क्षेत्रात आिर्थकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ४ सहस्र ५०० कोटी रुपये व्यय करून ७ ठिकाणी तब्बल ३९ सहस्र ७६० सदनिका बांधण्यात येणार होत्या; मात्र या कामाचे सर्व नियम आणि धोरणे पायदळी तुडवून महापालिकेने केवळ ठेकेदाराच्या मर्जीनुसार प्रकल्पाची आखणी केल्याची आणि त्यात मोठा घोटाळा झाल्याची गोष्ट उघडकीस आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार गृहनिर्माण विभागाने स्थापन केलेल्या चौकशी समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे.