नवी मुंबई महानगरपालिका वृक्षगणनेसाठी ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करणार !
नवी मुंबई, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे २०२३ या वर्षात वृक्षगणनेसाठी ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याविषयी वृक्ष प्राधिकरण अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर यांनी दिली. मागील वृक्षगणना वर्ष २०१५ मध्ये जी. आय.एस्. आणि जी.पी.एस्. तंत्र प्रणालीद्वारे करण्यात आली होती. यामध्ये शहरात ८५ लाख ७२ सहस्र २९५ इतके वृक्ष आढळून आले होते.
प्रत्येक वर्षी पर्यावरण दिनानिमित्त महापालिका आणि विविध पर्यावरणवादी संस्था यांच्या माध्यमातून सहस्रो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षी वृक्षगणना झाल्यावर निश्चितच दीड कोटीहून अधिक वृक्ष असतील, असा विश्वास पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केला आहे.