श्रीमती मेघना वाघमारे (वय ६४ वर्षे) यांचे खडतर जीवन आणि त्यांनी पदोपदी अनुभवलेली गुरुकृपा
रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्या साधिका श्रीमती मेघना वाघमारे यांच्याविषयी त्यांचा मुलगा श्री. धैवत वाघमारे आणि मुलगी श्रीमती धनश्री देशपांडे यांना जाणवलेली सुत्रे येथे दिली आहेत.
१. कुटुंबाची पार्श्वभूमी
आमचे वडील भारतीय नौसेनेत होते. नौसेनेत सेवा करतांना त्यांना दारू पिण्याचे व्यसन जडले होते. नौसेनेची नोकरी सोडल्यानंतरही त्यांचे दारू पिणे थांबले नव्हते. दारू पिऊन ते आईला पुष्कळ मारहाण करायचे. मी ४ वर्षांचा होतो. तेव्हा आम्ही वडिलांसमवेत वर्धा येथे रहात होतो. माझे वडील दिवसभर दारूच्या नशेतच असायचे. एकदा दुपारी दारू पिऊन त्यांनी आईला मारहाण केली आणि ते बाहेर निघून गेले. त्या वेळी मी आणि आई आम्ही दोघेच घरी होतो. मी बाहेरच्या खोलीत पलंगावर झोपलो होतो. मी अचानक उठून स्वयंपाकघरात गेलो. त्या वेळी तिची मनस्थिती ठीक नव्हती. मला पाहिल्यावर ती मला कुशीत घेऊन पुष्कळ रडली.
१ अ. प्रतिदिन होणार्या जाचाला कंटाळून मुलांना समवेत घेऊन आजोळी जाणे : प्रतिदिन आईला मारहाण सहन करावी लागत होती. एक दिवस आम्ही शाळेत गेलो असतांना आई शाळेत आली आणि आम्हा दोघा भावंडांना समवेत घेऊन ती अमरावती येथे आजोळी आली. त्यानंतर २ – ३ वेळा वडिलांनी आम्हाला त्यांच्या समवेत नेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतर ती कधीही त्यांच्या समवेत गेली नाही.
१ आ. माहेरी आर्थिक स्थिती जेमतेम असली, तरी साधनेचे संस्कार लहानपणापासून झालेले असणे : आमच्या आजोळी आर्थिक स्थिती बेताचीच होती; परंतु आजी आणि आजोबा शिस्तबद्ध, व्यवस्थित, नीटनेटके आणि काटकसरी होते. आजी-आजोबा सर्व कुळाचार करायचे. आजीला प.पू. व्यंकटनाथ महाराज यांची दीक्षा मिळाली होती. त्यामुळे आईवर लहानपणापासूनच साधनेचे संस्कार झालेले होते.
२. साधनेत येण्यापूर्वीचे खडतर जीवन
२ अ. नोकरी मिळवण्यासाठी वणवण भटकावे लागणे आणि विनाकारण पैशांचा व्यय होऊ नये; म्हणून नोकरीच्या शोधात पायीच फिरणे : अमरावतीला आल्यानंतर पोटापाण्याचा प्रश्न समोर उभा होता. आम्हा दोघांनाही शिक्षण द्यायचे होते. त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी आई सकाळी बाहेर पडायची. तिला त्यासाठी प्रतिदिन दिवसभर उन्हातान्हात ७ – ८ घंटे कितीतरी अंतर पायी फिरावे लागायचे; कारण सायकल रिक्शाने जायचे, तर तेवढे पैसे गाठीला नसायचे. आमचे आजोबा निवृत्त झाले होते. आजी शाळेत शिक्षिकेची नोकरी करायची. तिच्या तुटपुंज्या वेतनावरच घर चालत होते. त्यामुळे घरून दिलेले पैसे आई शक्यतो खर्च करत नसे.
२ आ. शाळेतून मिळणार्या तुटपुंज्या वेतनाचे तीन भाग करून महिन्याचा खर्च चालवणे : आईला अमरावती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात दैनंदिन वेतनावर (डेली वेजेस) नोकरी मिळाली. २ – ३ महिने नोकरी केल्यानंतर राज्यशासनाने नियम पालटला आणि आईची ती नोकरी गेली. त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी पुन्हा वणवण चालू झाली. काही आठवड्यांनी अमरावती येथील एका कॉन्व्हेंट शाळेत तिला नोकरी मिळाली. त्या वेळी तिचे वेतन होते केवळ ७०० रुपये ! ‘या वेतनाचे ३ भाग करून एक घरखर्चासाठी, दुसरा बचतीसाठी आणि तिसरा स्वतःचा अन् मुलांचा खर्च भागवण्यासाठी वापरायचा’, असे आजोबांनी आईला सांगितले.
२ इ. प्रपंच चालवण्यासाठी पहाटे ४ वाजल्यापासून दिवसभर अखंड राबणे : ७०० रुपयांत मासिक खर्च भागत नसल्याने आईने शिकवणी वर्ग चालू केले. ती सकाळी ९ वाजता घरातील स्वयंपाक करून आमची शाळेत जाण्याची सिद्धता करून नोकरीवर जायची आणि संध्याकाळी ५.३० वाजता घरी परतायची. घरी आल्यानंतर लगेच शिकवणी वर्ग असायचे. ते रात्री ८ वाजेपर्यंत असायचे. त्यानंतर पुन्हा स्वयंपाक आणि सर्वांचे जेवणं होऊन रात्री १०.३० ला झोपली की, पुन्हा सकाळी ४ वाजता उठून घरातील कामे करायची. असा तिचा नित्याचा दिनक्रम होता.
३. बालपणापासून आलेल्या अनुभूती
१. वयाच्या ६ व्या वर्षी ‘भावजागृती म्हणजे काय ?’, हे कळत नसतांना सप्तश्रुंग गडावर गेली असतांना पायथ्यापासूनच दिसणारी सप्तश्रुंगी देवीची भव्य मूर्ती पाहून तिचा भाव जागृत झाला.
२. नवरात्रीत देवीची आरती करतांना भावजागृती होऊन तिच्या डोळ्यांतून अश्रू झरझर वहायचे.
३. आमची आजी एकांतात बसून देवीवरची पदे गात असतांना आईला घरामध्ये घुंगरांचा आवाज ऐकू यायचा.
४. गुणवैशिष्ट्ये
४ अ. नियमितपणा
४ अ १. प्रतिदिन व्यायाम करणे : आई प्रतिदिन सकाळी उठल्यावर नियमितपणे व्यायाम करायची. धावपळीचे जीवन असतांनाही कधी आईचा व्यायाम चुकला नाही, तसेच साधनेत आल्यावरही तिने ती सवय टिकवून ठेवली होती. वर्ष २०१८ मध्ये आलेल्या आजारपणाचा काळ सोडला, तर ती अजूनही नियमितपणे व्यायाम करते.
४ अ २. पहाटे नियमितपणे नामजप करणे : तिला पहाटे लवकर जाग येते. त्या वेळी ती नियमितपणे नामजप करते. सकाळी तातडीची सेवा नसेल, तर सकाळी सात-साडेसात वाजेपर्यंत तिचा २ घंटे नामजप झालेला असतो.
४ आ. तत्त्वनिष्ठता
४ आ १. देवाच्या कृपेने जेवढे मिळेल, त्यात समाधानी रहाणे : हालाखीची स्थिती असूनही तिने कधी तत्त्वांशी तडजोड केली नाही. कुणाकडेही स्वाभिमान गहाण टाकला नाही. देवाच्या कृपेने तिची जेवढी मिळकत होती, त्यात ती भागवत असे. ती आम्हाला कधी बाजारात घेऊन गेली, तर आम्ही पायी जाण्यास नकार द्यायचो; पण ती आम्हाला ‘थोडे अंतर चालत जाऊ’, असे म्हणत चालत घेऊन जायची. त्यामुळे एका विशिष्ट अंतरापर्यंत गेल्यास रिक्शाचा खर्च अल्प करावा लागायचा.
४ आ २. पाल्यांच्या भवितव्यासाठी त्यांना मातृभाषेतूनच शिक्षण देण्याचा समादेश पालकांना देणे : आई स्वतः ‘कॉन्व्हेंट’मध्ये शिकवायची. तिच्याकडे शिकवणीला येणार्या मुलांना इंग्रजी समजत नसल्याने त्यांना शिकतांना पुष्कळ कठीण जायचे. त्यामुळे ती तिच्याकडे येणार्या पालकांनाही ‘आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण द्या’, असेच सांगायची. आईने मातृभाषेतून शिक्षण देण्याचे महत्त्व ओळखून आम्हाला मातृभाषेतूनच शिक्षण दिले. आम्ही आठवीत गेल्यावर आम्हाला इंग्रजी माध्यमात घातले. तेथेही केवळ विज्ञान आणि गणित हेच विषय इंग्रजीतून होते.
४ इ. राष्ट्रासाठी चांगले नागरिक घडवण्याचा प्रयत्न : आई शाळेत असतांना काही पालक ‘आमच्या पाल्याला पास करून द्या, त्याला परीक्षेत येणारे प्रश्न आधीच सांगा, जेणेकरून तो अधिक गुणांनी उत्तीर्ण होईल’, असे म्हणत असत. त्या वेळी तिने कधी तत्त्वांशी तडजोड केली नाही. ती त्या पालकांना सांगायची, ‘मुलांना स्वतःच्या कष्टाने गुण मिळूव द्या, तरच ते पुढे जीवनात प्रामाणिक आणि चांगले नागरिक बनतील.’
४ ई. काटकसरीपणा आणि नीटनेटकेपणा : आई जेव्हा स्वतःसाठी साड्या विकत घ्यायची, तेव्हा त्या महागातल्या नसायच्या; मात्र त्या टिकाऊ आणि दिसायला सुंदर असायच्या. तिची प्रत्येक साडी १० – १२ वर्षे टिकायची, एवढे तिचे वापरणे नीटनेटके आणि व्यवस्थित असायचे. एखाद्या साडीचा रंग विटल्यास आई ती साडी टाकून देत नसे. ती साडी रंगवून आणून तिचा वापर करत असे. त्यामुळे नवीन साडी खरेदी करावी लागत नसे. अजूनही ती साडी खरेदी करते, तेव्हा ती कपड्याच्या गुणवत्तेशी तडजोड करत नाही. विकत घेतांना एकच घेईल; पण अशी घेईल की, पुढची १० – १२ वर्षे पहावे लागत नाही.
– श्रीमती धनश्री रवींद्र देशपांडे (मुलगी) आणि श्री. धैवत विलास वाघमारे (मुलगा) , सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१.२०२३)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/656444.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |