उतारवयातही तळमळीने सेवा करणारे आणि स्वतःत पालट करण्याची तीव्र तळमळ असलेले पुणे येथील श्री. शरद गोपाळराव गणेश यांची साधिकांना जाणवलेली सूत्रे !
उतारवयातही तळमळीने सेवा करणारे आणि स्वतःत पालट करण्याची तीव्र तळमळ असलेले पुणे येथील श्री. शरद गोपाळराव गणेश (वय ७१ वर्षे) यांची तेथील साधिकांना जाणवलेली सूत्रे !
१. श्रीमती शीतल नेर्लेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)
१ अ. सेवेची तळमळ : ‘श्री. गणेशकाका वयस्कर असूनही ते रहात असलेल्या ठिकाणी सनातनचे पंचांग आणि सात्त्विक उत्पादने यांचे वितरण करणे अन् अर्पण मिळवणे या सेवा करतात.
१ आ. स्वीकारण्याची वृत्ती : पूर्वी काकांना सेवेतील पालट स्वीकारता येत नसत; परंतु आता त्यांना एखादे सूत्र सांगितले, तर ते ऐकून घेतात. काकांना त्यांची चूक सांगितल्यावर ते लगेच स्वीकारतात.’
२. सौ. चारुलता पानघाटे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)
२ अ. स्वतःला पालटण्याची तळमळ : ‘काका व्यष्टी साधनेच्या आढाव्याला नियमित आणि वेळेत उपस्थित असतात. ते आढाव्यात प्रतिमा न जपता सर्व प्रसंग प्रांजळपणे सांगतात आणि त्यावर सांगितलेले प्रयत्न ते त्वरित कृतीत आणतात. ते सतत उत्तरदायी साधकांना विचारतात, ‘‘मी आणखी कसे प्रयत्न करू ?’’ ते गावाला गेल्यावर त्यांना आढावासत्संगाला जोडता आले नाही, तर ते लिखित स्वरूपात आढावा देतात.’
३. सौ. अश्विनी ब्रह्मे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)
३ अ. साधनेची तळमळ : ‘काही मासांपूर्वी काकांच्या पाठीला एक छोटी गाठ झाली होती. त्यांचे शस्त्रकर्म दुपारी एक वाजता होणार होते. त्या स्थितीतही काकांनी दुपारी १२.१५ वाजता भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘आज मी व्यष्टी साधनेच्या आढाव्याला उपस्थित राहू शकणार नाही.’’ शस्त्रकर्म झाल्यावर २ दिवसानंतर त्यांनी आढावा देण्यास प्रारंभ केला.’
४. सौ. संगीता जागडे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)
४ अ. ‘काका उच्चशिक्षित (डिझायनर इंजिनीयर) असूनही त्यांच्या वागण्यात सहजता आहे.’
५. सौ. राधा सोनवणे
‘काका साधनावृद्धी सत्संगात ‘स्क्रीन शेअरिंग’ची (संगणकावर सत्संगाची जोडणी करण्याची) सेवा मनापासून करतात.’
(सर्व सूत्रांचा दिनांक जुलै २०२२)