भारत-चीन सीमेवर भारताकडून सर्वांत मोठ्या सैन्यबळाची नियुक्ती हे ऐतिहासिक पाऊल !

  • राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्र्यांवर केलेल्या टीकेचे प्रकरण

  • परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे काँग्रेसला रोखठोक प्रत्युत्तर !

डॉ. एस्. जयशंकर

नवी देहली – मी अथवा पंतप्रधान मोदी चीनचे नाव घ्यायला घाबरत नाही.  आज भारत-चीन यांच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतीकाळात भारताकडून सर्वांत मोठे सैन्यबळ तैनात करण्यात आले आहे. हे ऐतिहासिक असून ही कार्यवाही राहुल गांधी यांनी केली नसून पंतप्रधानांनी केली आहे. लक्षात घ्या, ‘चायना !’ असे रोखठोक वक्तव्य परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी काँग्रेसला दिलेल्या प्रत्युत्तरात केले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अनेक वेळा पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांच्यावर टीका करत म्हटले होते की, हे दोघेही कधीच चीनचे नाव घेत नाहीत. चीनचा विषय आला की, ते दोघेही गप्प बसतात. यावर परराष्ट्रमंत्र्यांनी त्याचा प्रतिवाद केला.

विदेशी प्रसारमाध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अनेक लेख लिहिले आहेत. अमेरिकी व्यावसायिक जॉर्ज सोरोस (भारतविरोधी विचारसरणी पुढे रेटण्यासाठी अब्जावधी रुपये व्यय करणारे व्यावसायिक) यांनीही पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलीन झाल्याचे म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांच्या या प्रश्नावर परराष्ट्रमंत्री म्हणाले की,

१. वेगळ्या माध्यमांतून युद्ध करण्याची ही पद्धत आहे. यावर विचार करा ! हे एक प्रकारचे राजकारण आहे.

२. अचानकपणे भारतविरोधी अहवाल आणि विचार यांचा पूर कसा काय आला ? असे या आधीपर्यंत का होत नव्हते ?

३. बीबीसीने बनवलेल्या हिंदुविरोधी माहितीपटाविषयी विचारलेल्या प्रश्नावर डॉ. जयशंकर म्हणाले की, वर्ष १९८४ मध्ये देहलीमध्ये पुष्कळ काही घडले होते. यावर माहितीपट का बनवण्यात आला नाही ? आपण म्हणता की, या माहितीपटाची वेळ केवळ एक योगायोग आहे. मला सांगा की, हे का होत आहे ? मला ठाऊक नाही की, देहली अथवा भारत येथे निवडणुकीचे वर्ष चालू झाले कि नाही; परंतु लंडन आणि न्यूयॉर्क येथे ते चालू झाले आहे.

(‘भारताच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रनिष्ठेला खीळ बसवण्यासाठी पाश्चात्त्य राष्ट्रांनी आतापासूनच कंबर कसायला आरंभ केला आहे’, असे सुतोवाच डॉ. जयशंकर यांनी या वक्तव्याच्या माध्यमातून केले आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)